



by : Rajendra Mardane
वरोरा : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदींच्या वतीने शहरात ढोल ताशाच्या गजरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुनिल सरोदे, नगर संघचालक मनोज रेलकर, कार्यवाह नरेन्द्र बोराटने, भाजपाचे जेष्ठ नेते बाबा भागडे, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, भाजयुमोचे प्रदेश सचिव करण देवतळे आदींच्या हस्ते भारत माता पूजन व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्वतच शहींदाना आदरांजली अर्पण करण्यात आली.
नागपूर नाका शहीद डाहुले चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, सावरकर चौक, नेहरू चौक, मित्र चौक मार्गे गांधी चौकापर्यंत गौरव यात्रा काढण्यात आली. यात्रेत ढोल- ताशे, भजन मंडळ, पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथक, चित्ररथ आकर्षक ठरले. असंख्य महिला – पुरुष यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेत सहभागी प्रत्येक सावरकर प्रेमींनी ” मी सावरकर ” अशा टँग लाईनच्या टोप्या देखील घातल्या होत्या. गांधी चौकात यात्रेची सांगता होऊन सभा घेण्यात आली.
यावेळी मंचावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विश्व हिंदू परिषदचे पांडे महाराज, सावरकर अभ्यासक विवेक सरपटवार, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,भाजपा युवा मोर्चाचे करण देवतळे, सुवर्णरेखा पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अहिर म्हणाले की, देश शस्त्रसज्जतेमध्ये स्वयंपूर्ण असावा ही स्वातंत्र्यवीरांची विचारधारा होती. देशाची सनातन संस्कृती अबाधित रहावी व हा देश सकल हिंदुराष्ट्र म्हणून उदयास यावा, असे त्यांचे स्वप्न होते. सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेसाठी वेचले. देशात सावरकरांच्या त्यागाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
सावरकर अभ्यासक विवेक सरपटवार यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिका करणाऱ्या प्रवृत्तीचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.
प्रास्ताविकात सुवर्णरेखापाटील यानी सावरकरांचे विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात पांडे महाराज यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन राजू दोडके यानी केले.
कार्यक्रमात भाजपाचे सुरेश महाजन, गजानन राऊत, मिलिंद देशपांडे, जगदीश तोटावार, ओम मांडवकर अमित चवले, विनोद लोहकरे, विलास गहनेवार, राहुल बांदूरकर, संजय राम, महेश श्रीरंग, बबलू राय, सागर कोहळे, कादर शेख, शकील शेख, विवेक मुराटे, कीर्ति कातोरे, सुजाता दुर्गापुरोहित, सायरा शेख, सुषमा कराड, स्वाति गौरकार, कावडे यांचे सह विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.