

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– तहसील कार्यालय, राजुरा येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जनसुविधा केंद्राचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या जनसुविधा केंद्राचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेव निधीतून करण्यात आले असून यावर ३४ लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. यात महिला प्रसाधनगृह, पुरुष प्रसाधनगृह, हिरकनी कक्ष, उपहारगृह अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. रेनवाटर हार्वेस्टिंग सिस्टीम चा वापर करून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे सुविधा केंद्र राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वनविभाग, बसस्थानक, परिसरातील शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय येथे येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांसाठी आधार ठरणार आहे. जनतेने याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी या जनसुविधा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, नायब तहसीलदार गांगुर्डे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, राधेश्याम अडानिया, प्रभाकर येरने, विकास देवाळकर, अॅड चंद्रशेखर चांदेकर, धनराज चिंचोलकर, ईरशाद शेख, एजाज अहमद, अशोक राव यासह पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.