महाराष्ट्रासह ८ राज्यांना केंद्राचा अलर्ट, ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

——-
नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने ८ राज्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने करोना विरोधात कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला आज पत्र लिहिले आहे. आरोग्य सचिवांनी या ८ राज्यांना करोनाविरोधात कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. यासोबतच करोना चाचणी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण ९६१ रुग्ण आढळले आहेत. देशात २९ डिसेंबरला करोना रुग्णांमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ ओमिक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. ३३ दिवसांत देशात प्रथमच १० हजार रुग्ण देशात ३३ दिवसांत प्रथमच १० हजारांहून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशाने अलर्ट राहणं गरजेचं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात देशात रोज ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. २६ डिसेंबरनंतर रोज १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक १० हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने आज सकाळी आकडेवारी जाहीर केली. गेल्या २४ तासांत करोनाचे १३ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत ही संख्या ४ हजारांनी अधिक आहे. त्याच वेळी एका दिवसात २६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे बिघडत चाललेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये रात्रीचा कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच या ७ राज्यांमध्ये कोविड प्रोटोकॉलही लागू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here