

By : Mohan Bharti
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना आणि परिसरातील शेतकरी अस्मानी – सुलतानी संकटाने त्रस्त आहेत. शेतकऱ्याचे नगदी पीक असलेले कापसावर बोंळ अडी चे संकट आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी भुईसपाट होत आहे. ग्रामीण भागातील अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून असते. मात्र सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तुरीचे नगदी पीक शेतकरी घेत असतो त्यामुळे थोडाफार आधार त्यांना मिळतो परंतु सध्या तुरीवर सुद्धा फार मोठं संकट आलेले आहे. अवकाळी पावसामुळे सगळे तुरीचे पीकं सुकून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पादनातही फटका बसलेला आहे. शेतकऱ्यावर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा व पुढील शेती कशी करावी काहीच समजेनासे झाले आहे म्हणून सरकारने अडचणीच्या या घडीला शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहावे व नुकसानग्रस्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मदत करावी अशी मागणी कळमनाचे सरपंच, काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी शासन प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी परिसरातील शेतशिवारी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची वस्तूस्थिती जानून घेतल्यावर स्वतः शेतकरी असल्याने एक शेतकरी म्हणून परिस्थिती खूप चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.