आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

By : Shankar Tadas
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.
यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के), प्रितिका जंगु करपाते, रा. भारी (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला.
मिशन शिखर 2023-2024 अंतर्गत जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी चा क्रॅश कोर्स प्रकल्पात राबविला जात असून त्यामध्ये यावर्षी सीईटी करीात 85, जेईई 27, नीट 54 आणि एनडीए साठी 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पात्र करणे हा आदिवासी विकास प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार यांनी सांगितले. प्रकल्पात पहिल्यांदाच ऐवढ्या संख्येने आश्रम शाळेतील विदयार्थी जेईई सारख्या परीक्षेत पात्र झालेले आहेत. आदिवासी विद्यार्थीसुद्धा कोणत्याही परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन करू शकतो, हे या यशाने दाखवून दिले आहे. मे 2024 ला होणा-या विविध मेडिकल / इंजिनिअरींग परीक्षेकरीता मिशन शिखर अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील, असा विश्वास प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मिशन शिखर उपक्रमास भेट देणारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा या सर्वांचे कौतुक करण्यात आले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर, समर कॅम्प, ताडोबा शैक्षणिक सहल, भारत दर्शन, परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, शिक्षकांकरीता भविष्यावेधी प्रणाली नुसार प्रशिक्षण, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासपूरक प्रशिक्षण असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *