बाबुपेठ रेल्‍वे उड्डाणपुलासाठी अतिरिक्‍त निधी उपलब्‍ध करण्‍यासाठी १ किंवा २ जून रोजी मुंबईत बैठक घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕५.२६ कोटी रू. निधीअंतर्गत करावयाच्‍या कामांबाबत आ. मुनगंटीवार यांनी घेतली आढावा बैठक.*

*⭕एका महिन्‍यात गडर उपलब्‍ध करण्‍याचे महारेलच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकांचे आ. मुनगंटीवार यांना आश्‍वासन.*

*⭕रेल्‍वे विभागाशी संबंधित अडचणींच्‍या निवारणासाठी रेल्‍वे बोर्डाच्‍या सदस्‍यांना चंद्रपूरात आमंत्रीत करणार.*

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्‍वे उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी आवश्‍यक अतिरिक्‍त निधी रू. ६.४८ कोटी उपलब्‍ध व्‍हावा तसेच रेल्‍वे प्रशासनाकडून जी कामे झाली त्‍या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्‍या सुधारित अंदाजपत्रकानुसार आवश्‍यक २० कोटी रू. निधी मंजूर करण्‍याच्‍या दृष्‍टीने नगरविकास विभागाच्‍या सचिव श्रीमती सेठी, जिल्‍हाधिकारी चंद्रपूर, मनपा आयुक्‍त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक विधीमंडळ लोकलेखा समितीमार्फत दिनांक १ किंवा २ जून रोजी घेण्‍यात येईल. तसेच रेल्‍वे बोर्डाच्‍या सदस्‍यांना पाहणीसाठी चंद्रपूर येथे आमंत्रीत करण्‍यात येईल, अशी माहिती विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सत्‍ताबदल झाल्‍यानंतर अडीच वर्षात सत्‍तारूढ मंडळी निधी उपलब्‍ध करत उड्डाणपुलाचे काम गतीने पुढे नेतील अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा फोल ठरली. बाबुपेठ परिसरात १८.७४ रू. किंमतीच्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम मंजूर झाल्‍यानंतर झालेल्‍या सभेत मी बाबुपेठ वासियांना उड्डाणपुलासाठी निधी मंजूर करत या उड्डाणपुलाच्‍या बांधकामाला गती प्रदान करेल, असे अभिवचन दिले होते. हे वचन पूर्ण करत माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात मंजूर निधीपैकी ५.२६ कोटी रू. निधी मंजूर व वितरीत करू शकलो याचा मला मनापासून आनंद असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

बाबुपेठ येथील रेल्‍वे उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक २६ मे २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार ५.२६ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. त्‍याअनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांसह स्‍थानिक विश्रामगृहात दिनांक २८ मे रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील माहिती दिली. बाबुपेठ उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी प्रशासकीय मान्‍यतेनुसार रेल्‍वेने वहन विभागाकडून १६.३१ कोटी रू. व चंद्रपूर महानगरपालिकेने ५ कोटी रू. तसेच राज्‍य शासनाकडून ४०.२६ कोटी रू. असे एकूण ६१.५७ कोटी रूपयांच्‍या बांधकामासाठी १५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात मंजूरी दिलेली आहे. नगरविकास विभागाच्‍या दिनांक ८ मार्च २०१९ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार ६७ कोटी रूपयांपैकी २४ कोटी रू. निधी अखर्चित असल्‍याने अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचेकडून दिनांक १७.१.२०२२ रोजी एकूण ८ कामांकरीता रू.१८ कोटी ७४ लक्ष रू. निधी मंजूरीकरिता तांत्रीक मान्‍यतेसह जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्‍या दिनांक १८ जानेवारी २०२२ च्‍या पत्रान्‍वये प्रस्‍ताव सादर केला. सदर रस्‍ते बांधकामासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये १८.७४ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला. बाबुपेठ उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी सन २०१८-१९ चा उर्वरित शिल्‍लक राहीलेला ५ कोटी २६ लक्ष रू. निधी जिल्‍हाधिकारी कार्यालयास जमा होता. आपण यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले व हा निधी वितरीत करण्‍याबाबत विनंती केली. त्‍यानुसार दिनांक २६ मे २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये सदर ५.२६ कोटी रू. निधी मंजूर व वितरीत करण्‍यात आला आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

या बैठकीत कार्यकारी अभियंता श्री. अ.ल. भास्‍करवार यांनी या उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी अतिरिक्‍त ६.४८ कोटी रू. निधी आवश्‍यक असल्‍याचे सांगीतले. त्‍याचप्रमाणे सुधारित अंदाजपत्रकानुसार २० कोटी रू. निधी आवश्‍यक असल्‍याचे सांगीतले. यासंदर्भात दिनांक १ किंवा २ जून रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीच्‍या माध्‍यमातुन नगरविकास विभागाच्‍या सचिव श्रीमती सोनिया सेठी, जिल्‍हाधिकारी चंद्रपूर, मनपा आयुक्‍त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांसह संयुक्‍त बैठक घेवून निधी मंजूरीसाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. सदर उड्डाणपुल बांधकामासाठी रेल्‍वे विभागाशी संबंधित ज्‍या अडचणी आहेत त्‍यांच्‍या निवारणासाठी रेल्‍वे बोर्डाच्‍या सदस्‍यांना चंद्रपूर येथे आमंत्रीत करण्‍यात येईल, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. महारेलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. जयस्‍वाल यांचेशी आ. मुनगंटीवार यांनी दुरध्‍वनीद्वारे चर्चा केली असता एका महिन्‍याच्‍या आत गडर उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन श्री. जयस्‍वाल यांनी दिले.

बैठकीनंतर अधिका-यांसह आ. मुनगंटीवार यांनी बाबुपेठ रेल्‍वे उड्डाणपुलाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्‍यांनी बाबुपेठ वासियांना आवाहन केले की नागरिकांना मी जेव्‍हा जेव्‍हा शब्‍द दिला जो प्राधान्‍याने पूर्ण केला. बाबुपेठ रेल्‍वे उड्डाणपुलासाठी मी जे शब्‍द दिले ते सुध्‍दा पूर्ण केले आहे. बाबुपेठ उड्डाणपुलाचे बांधकाम त्‍वरेने पूर्ण व्‍हावे व नागरिकांची गैरसोय कायमची दूर व्‍हावी यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. सदर रेल्‍वे उड्डाण पुल यावर्षी ऑक्‍टोंबर किंवा नोव्‍हेंबरपर्यंत जनतेच्‍या सेवेत रूजु होईल यासाठी आपण सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता अ.ल. भास्‍करवार, उपविभागीय अभियंता चव्‍हाण, माजी महापौर राखी कंचर्लावार, राहूल पावडे, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, सौ. अंजली घोटेकर, रवि गुरनुले, चंद्रशेखर गन्‍नुरवार, संदिप आवारी, रवि आसवानी, सौ. कल्‍पना बगुलकर, प्रदिप किरमे, पुष्‍पा गेडाम, सौ. शिला चव्‍हाण, सौ. माया उईके, प्रज्‍वलंत कडू, संदीप आगलावे, सुनिल डोंगरे, पुरूषोत्‍तम सहारे, आकाश ढुसे, राकेश बोमनवार, दशरथ सोनकुसरे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *