महिलांनी त्यांचे अधिकार प्राप्त करावे : व्ही. थंगपंडियन

लोकदर्शन 👉 By : Shankar Tadas

“महानिर्मिती” तर्फे जागतिक महिला दिन साजरा

दि. ०९ मार्च २०२२, मुंबई: ‘महिलांना समानतेचा अधिकार मिळण्यासाठी सरकारकडून खूप प्रयत्न केले जातात. मात्र अधिकार ही देण्याची गोष्ट नाही, तो मिळवावा लागतो. महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून स्वतःचे अधिकार मिळवावेत,’ असे आवाहन महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) श्री. व्ही. थंगपंडियन यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च २०२२ रोजी वांद्रे येथील “प्रकाशगड” कार्यालयाच्या प्रेक्षागृहात “महानिर्मिती” तर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाळासाहेब थिटे, संचालक (मानव संसाधन) डॉ. मानवेंद्र रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

“महिलांमध्ये जन्मतःच प्रचंड ऊर्जा व शक्ती आहे. त्याचा वापर केल्यास महिला त्यांचे ध्येय सहज गाठू शकतात,” असेही श्री. थंगपंडियन म्हणाले. समाजामध्ये अजूनही मुलगा-मुलगी असा भेदाभेद केला जात असल्याबद्दल श्री. बाळासाहेब थिटे यांनी खंत व्यक्त केली. कोरोना काळात महानिर्मितीच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बरोबरीने मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
महिलांमुळे प्रत्येकाच्या जीवनात इंद्रधनुष्याचे रंग आहेत. त्यामुळे महिला दिन केवळ एक दिवस नव्हे तर प्रत्येक दिवशी साजरा करण्याची गरज असल्याचे डॉ. मानवेंद्र रामटेके यांनी सांगितले. सदर प्रसंगी माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे यांच्या शुभेच्छापर संदेशाचे देखील वाचन करण्यात आले.

या अभिनव कार्यक्रमात आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध निवेदिका व रेडिओ जॉकी अनघा मोडक यांनी यावेळी “जगण्याचे गाणे होताना” हा अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. आपल्या ओघवत्या शैलीत अनघा मोडक यांनी महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांसह उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानिर्मितीचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. आनंद कोंत यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सहाय्यक जनसंपर्क अधिकारी श्री. संतोष पुरोहित यांनी केले. मुलगा किंवा मुलगी जन्माला येताच अगदी आनंद व्यक्त करतानाही त्यानुसार पेढे किंवा बर्फी वाटपासारख्या प्रथेतून आपण सर्वच जण एकप्रकारे जन्मजात भेदभाव निर्माण करतो याकडे लक्ष वेधून त्यांनी उपस्थिताना अंतर्मुख केले.

यावेळी महिला कर्मचाऱ्यांसाठी डॉ. रामटेके व सौ. रामटेके यांनी खास संचालित केलेल्या चित्रपटांवर आधारित अभिनव प्रश्नमंजुषा आणि सांस्कृतिक-सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमास महानिर्मितीचे कार्यकारी संचालक वर्ग सर्वश्री. संजय मारुडकर, राजेश पाटील, नितीन वाघ, नितीन चांदूरकर तसेच मुख्यालयातील मुख्य अभियंते, मुख्य महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमास महानिर्मितीच्या महिला कर्मचारी वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महानिर्मितीच्या मानव संसाधन विभागाने व जनसंपर्क कक्षाने विशेष परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *