षड रिपू…

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार – प्रकाश फासाटे.
21 फेब्रुवारी 2022

जीवनात प्रत्येकाला शत्रू असतात. कोणी त्यांच्याशी निधड्या छातीने लढतो तर कोणी शरणागती पत्करून मोकळा होतो. शत्रू बाहेरचा असो किंवा आपल्यातला सगळे सारखेच !

आपण दिसणाऱ्या शत्रूबरोबर दोन हात करू शकतो, पण जर शत्रू ओळखुच येत नसेल किंवा अदृश्य स्वरूपात तुमच्याशी लढत असेल तर ती लढाई तुम्ही कशी लढणार ? तुम्ही ती जिंकाल का ? ती किती कठीण असू शकते याचा अंदाज लावू शकता का ?
तो शत्रू गनिमी काव्याप्रमाणे जर तुमच्या वर हल्ला करत असेल तर ती लढाई जिंकणे जवळजवळ अशक्यच आहे.

अशीच लढाई दररोज लढावी लागते ती आपल्या मनाला !!

आपल्या मनालाही शत्रू असतात हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्याशी लढतांना आपल किती नुकसान करतात याची कल्पना तुम्हाला वाचल्यानंतर येईल.

आपल्या मनाचे जे सहा शत्रू आहेत त्यांना षड रिपू म्हणतात.
षड म्हणजे सहा आणि रिपू म्हणजे शत्रू. !!
पण गंम्मत अशी आहे की हे सहाही शत्रू आयुष्यभर आपल्या मनाशी लढत असतात अगदी अदृश्यपणे !!
मनाला कधी कधी हे ओळखुही येत नाही आणि हेच आपले मित्र आहेत असे वाटते. कधी तो त्यांचा स्वीकार करतो पण एकदा की त्यांना आसरा दिला की मग चालते ती त्याच्याशी अस्तित्वाची लढाई !!

ज्याचं मन सतर्क आहे तो मात्र यांना ओळखू शकतो. ज्याच्याकडे ज्ञान, शांती, धीर, ध्यान, सामंजस्य ही हत्यारे आहेत तो यांच्यावर नक्की विजय मिळवू शकतो यात शंका नाही !!

हे सहा शत्रू कोणते ?
1) काम (Lust or desire)
2) क्रोध (Anger )
3) मद (Arrogance or pride)
4) मत्सर (Jealoysy or envy)
5) लोभ (Greed)
6) मोह (Delusion)

या सहापैकी प्रत्येक दोष (शत्रू ) आपल्या शरीरात सुप्त अवस्थेत असतो. जस जसे आपण मोठे होतो तसतसे हे शत्रू आकार घ्यायला लागतात. अध्यात्माची संगत आणि वैचारिक पातळी फक्त यांचा प्रभाव कमी करू शकतात.

1) काम (इच्छा) :
काम म्हणजे इच्छा. याला कामना असेही म्हणतात. अगदी लैंगिक इच्छा सुद्धा याच प्रकारात मोडते.
खाण्यापासून ते खरेदी पर्यंत किंवा काही मिळवण्याची इच्छा मनुष्याच्या मनाला नेहमीच अस्वस्थ आणि दुःखी करून सोडते.
‘ इच्छा ‘ आणि ‘ आवश्यकता ‘ यात खूप फरक आहे. आम्ही इच्छेला जेव्हा आवश्यकता समजतो तेव्हाच आम्ही चूक करतो .

मनाची आणखी एक गंम्मत सांगतो, जेव्हा तुमच्या इच्छेची पूर्ती होते तेव्हा मन त्या इच्छेवरून उडून दुसऱ्या इच्छेवर जाऊन बसते. आणि हे आयुष्यभर चालु असते.
म्हणूनच दुकानात घेतलेली साडी घरी येऊन कपाटात पडली की तिचे इतके आकर्षण उरत नाही जितके खरेदी करतांना असते आणि मन दुसऱ्या इच्छे कडे निघून जाते.
नवीन घेतलेले घर किंवा गाडी यांचं सुद्धा आकर्षण हळू हळू कमी होऊन जाते.

म्हणूनच जेव्हा इच्छा निर्माण होईल तेव्हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, ही इच्छा आहे की गरज ?
ही इच्छा आहे की आवश्यकता ?
शत्रू बद्दल लढतांना सावध असणे गरजेचे !!!
आम्ही सतर्क नसतो आणि इच्छेलाच गरज समजून चूक करतो हा प्रत्येकाचा अनुभव असेल.
घरामध्ये अनावश्यक वस्तूंचा ढीग, चपला बुटांचे डझन भर जोडे, कित्येक कपड्यांनी भरलेली कपाटे, पैशानी भरलेल्या तिजोऱ्या, लॉकर मधील अमाप दागिने हे इच्छेचेच उदाहरण !!!

एका इच्छेतून दुसरी अगदी वेली सारखी वाढत जाते. आपण एखाद्या झाडासारखे कधी तिच्या विळख्यात अडकत जातो ते आपल्याला कळत पण नाही.
इच्छेची पूर्ती न झाल्यास मग नैराश्य, क्रोध उत्पन्न होतात.
एकाचे दमन करायला गेलो की दुसरा जागा होतो.
मन यांच्याशी हरले की मग हे शत्रू त्याला गुलाम बनवतात आणि वाट्टेल तसे वापरून घेतात.

आपल्या चंचल मनावर विजय मिळवायचा असेल तर ध्यान, योगासन, प्राणायाम खूप आवश्यक आहेत. एकदा की मन मजबूत झाले की ते सक्षमपणे कोणत्याही शत्रू शी लढू शकते.
फक्त आपले मन च यांचा नाश करू शकते.
आपल्या मनाची एक खासियत आहे त्याला सगळं सुख भोगायचं असत, पण त्याची एक कमजोरी ही आहे की ते स्वतः कोणतेही सुख किंवा दुःख एकटे भोगू शकत नाही त्याला इंद्रियांची मदत घ्यावी लागते.
आणि मग मन इंद्रियांचा वापर आपल्या इच्छा पूर्ती साठी करत.
पण हे मन पूर्णतः इंद्रियांवर अवलंबून असत. इच्छा भोगतांना कष्ट इंद्रियांना होतात मात्र सुख मनाला मिळतं.

उदाहरणं म्हणून सांगतो, मनाला एखादे दृश्य खूप बघण्याची इच्छा होते तेव्हा ते डोळ्यांचा वापर करून त्या दृष्याचे सुख घेते, पण काही वेळाने डोळे थकले की ते बंद होतात आणि त्याच बरोबर मनाची सुख घेण्याची प्रक्रिया सुद्धा आपोआप थांबते. आपले मन हे परावलंबी आहे.त्याच वेळी मनही आपली इच्छा भोगणे बंद करते.
मनावर ताबा मिळवला की सगळ्या समस्या सुटतात. याचाच अर्थ मनावर ताबा तर इंद्रियांवर ताबा !!

2) क्रोध :
क्रोध (राग) हा मनाचा दुसरा शत्रू !!
क्रोध हा मनावर सर्वात लवकर विजय मिळवतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही प्रकारे मनुष्याचे क्रोधामुळे नुकसान होते. वास्तविक इच्छेची जेव्हा पूर्ती होत नाही त्यावेळी सुद्धा क्रोधाचा जन्म होत असतो. आपल्या मनासारख्या न घडणाऱ्या प्रत्येक घटना, व्यक्ती, परिस्थिती वातावरण हे सर्व आपल्या क्रोधाला कारणीभूत असतात.

बहुतेक वेळा क्रोध आपल्या शरीरात छोट्या घडून गेलेल्या घटना आणि सूडभावना ह्या स्वरूपात सुप्त अवस्थेत दडून बसलेला असतो आणि अचानक कधी तो ज्वालामुखीच्या उद्रेका सारखा बाहेर पडतो. त्यावेळी मात्र तो स्वतःही जळतो आणि दुसऱ्यालाही इजा करतो. आलेला क्रोध शरीरात तसाच ठेवला तरी तो आतल्या आत शरीरावर विपरीत परिणाम करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडतात.

क्रोधाने सर्व शरीरातील नसा आणि पेशी यांच्यावर वेगळा ताण पडतो व वेळप्रसंगी काही अवयव सुद्धा निकामी होतात.
क्रोध हा मनुष्याला विनाशाकडे घेऊन जातो हे मात्र नक्की !! त्यामुळे आपले मानसिक संतुलन तर बिघडतेच पण आपण नाती सुद्धा तुटली जातात. अश्या व्यक्तीपासून बहुतेक लोक मग दूर राहणेच पसंद करतात. कालांतराने मग असे लक्षात येते की आपण एकटे पडलोय.

क्रोधामुळे आपला वाणी आणि शरीरावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे क्रोध हा हात आणि पायावाटे बाहेर पडतो. समोरच्याचे ऐकू येत असून सुद्धा आपण मोठ्याने बोलतो. आपले भान राहत नाही हे वास्तविक सत्य आहे.
जेव्हा मनुष्य पंचेंद्रियांच्या वस्तूंचा सतत विचार करतो तेव्हा त्या वस्तूंबद्दल आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा (तृष्णा) जन्माला येते आणि इच्छेतून क्रोध जन्माला येतो. रागातून भ्रम निर्माण होतो, भ्रमातून स्मरणशक्ती नष्ट होते. स्मरणशक्ती नष्ट झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो, ज्यामुळे संपूर्ण शरीराचा नाश व्हायला वेळ लागत नाही. क्रोध म्हणजे हातात जळता कोळसा घेऊन दुसऱ्याच्या अंगावर फेकणे होय अस एका बौद्ध म्हणीत म्हणतात. म्हणजे यात जो रागावतो त्याचेच जास्त नुकसान होत असते.

3) मद (अहंकार) :
मद किंवा अहंकार प्रत्येकामध्ये असतो. पण जेव्हा तो उग्र रुप धारण करतो तेव्हा मात्र विनाशाचे कारण बनतो.
अहंकार जरूर असावा, असलाच पाहिजे, परंतु किती ?
भाजीत जेवढे मिठाचे प्रमाण असते ना तसे अगदी अल्प प्रमाणात !!
अहंकार म्हणजे ” मी ” मी पणा वाढला की मनुष्यामध्ये मी, माझ्यामुळे, मी आहे म्हणून, मीच करू शकतो, माझे, हा अहंभाव वाढत जातो आणि तोच नेमका नाशाचे कारण ठरतो.

जी व्यक्ती अहंकारी असते ती फक्त स्वतः भोवती केंद्रित असते. त्यांना फक्त मानपान, प्रतिष्ठा, स्वतः चा गौरव, स्वतःची प्रशंसा यात आनंद मिळत असतो. या गोष्टी डावलून जर कोणी वागत असेल तर यांचा अहंकार जागा होतो, अहंकारातून मग क्रोध निर्माण होतो आणि मनुष्य मग नको असलेली कृत्य करतो.

4) मत्सर (Jealoysy or envy) :
मत्सर हा अगदी सर्व सामान्यात बघायला मिळतो. हा ही एक मनाचा शत्रूच.
मनुष्याला दुसऱ्याची चांगली कृती बघून त्या बद्दल मनात स्पर्धा निर्माण होते आणि आपण जेव्हा ते प्राप्त करू शकत नाही तेव्हा मत्सर होणे हे स्वाभाविक आहे.
जेव्हा मत्सर वाढतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल राग मनात वाढत चालतो.
एकाच ठिकाणी काम करतांना आपल्या सोबत काम करणाऱ्या मित्राचा पगार वाढला की आपल्याला मत्सर होतो किंवा आपल्या कडे गाडी नसतांना शेजाऱ्यांकडे नवीन गाडी आली की आपल्याला नकळत मत्सर होणे हे साहजिक आहे कारण तो एक मानसिक दोषच आहे. पण निर्माण झालेला मत्सर तुम्ही कसा विझवता याला खूप महत्व आहे.

आपण हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येकाला त्याच्या ज्ञान आणि कुवतीप्रमाणे मिळत असते शिवाय त्याचे ते नशीबही असते. प्रत्येकाला त्याचा नशिबाप्रमाणे आणि केलेल्या कष्टाचे फळ आणि योग्य वेळ आली की मिळत असते आणि ते मिळवण्यामागे त्याने कष्ट ही केलेली असतात, जर आपल्याला हे समजले तर मत्सर कमी होण्यास नक्की मदत होईल.
हे सहाही षडरिपू तस बघितलं तर एकातून दुसरा जन्म घेतो आणि एका मधून दुसरा निर्माण होतो.

प्रत्येक दोषा वर एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे या सर्वांकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन आणि अध्यात्मिक ज्ञान !!!
तुमचा एखाद्या घटनेकडे बघण्याचा कसा दृष्टीकोन आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी किती अध्यात्मिक ज्ञान वापरता यावर त्या दोषाचा प्रभाव अवलंबुन असतो.
जेव्हा मत्सर निर्माण होईल तेव्हा बहिर्मुख न होता अंतर्मुख व्हा. स्वतःला बघा. आपण आयुष्यात कोठे होतो आणि आज आपण किती प्रगती केली आहे याचा लेखाजोखा घ्या. स्वतःच्या झालेल्या परिस्थितीतील सुधार याचा आलेख स्वतः समोर मांडा व स्वतःलाच शाबासकी द्या,आणि बघा तुमचा मत्सर केव्हाच निघून गेलेला असेल.

5) लोभ ( Greed) :
लोभ म्हणजे आपल्या जवळ मुबलक, गरजेपुरते असतांना ( पैसा, सत्ता, संपत्ती, वस्तू, दागिने इ.) त्यांची आणखी मिळवण्याची ईच्छा करणे…आणि मग जे जवळ आहे त्याचा वापर न करता, उपभोग न घेता पुन्हा जास्त मिळवण्याचा व रात्र दिवस तोच विचार मनात ठेवून ते मिळवण्यासाठी पळत राहणे म्हणजे लोभ…
जे आहे ते भोगत नाही आणि जे नाही ते मिळवण्यासाठी फक्त मनाने पळत राहणारा लोभी !!!
लोभी व्यक्ती वर्तमानात कधीच सुखी नसतो. तो नेहमी चिंता करत असतो की मी माझी संपत्ती आणखी कशी वाढवू शकतो. त्याचा हा लोभ हाच खरा त्याचा शत्रू…
लोभ आणि लालच हे जणू दोन भाऊच !!!
एकदा लोभ झाला की लालच ही आलीच…
एखादी वस्तू तुमच्या घरात असतांना सुद्धा दुकानात ती आवडणे म्हणजे लोभ आणि ती मिळवण्यासाठी ती चोरी करण्याची किंवा हासील करण्याची कल्पना मनात येणे म्हणजे लालच..
लोभी मनुष्य फक्त पैसा जमा करतो पण खर्च करत नाही. फक्त संचय करतो व रात्रंदिवस त्याचाच विचार करत असतो.
तुम्ही कोणताही प्राणी बघा त्याला जेवढी भूक आहे तेवढीच शिकार तो खातो, संचय करत नाही, फक्त मनुष्य च लोभी असल्याने गरजेपेक्षा जास्त जमा करत बसतो.

6) मोह (Delusion) :
मोह म्हणजे समाजातील व्यक्ती, संपत्ती, सत्ता, वस्तू, मालमत्ता, पैसा यांचे आकर्षण आणि ती मिळवण्याची तीव्र कामना !!!
आपल्या आप्तस्वकीया बद्दल असलेला मोह.. आपल्याला हा ठराविक असेल तर योग्य पण तोच जर वाढला तर मात्र मनुष्य दुर्बल होतो.
मोह म्हणजे असे आकर्षण जे सुटता सुटत नाही, मग ती सत्ता असो की पैसा, व्यक्ती, संपत्ती…
आम्ही समजतो की मोह हे एक प्रेमाच रुप आहे परंतु प्रेम आणि मोह या मध्ये अंतर आहे.
प्रेमामध्ये दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न असतो.
मोहा मध्ये त्या वस्तू, व्यक्ती कडून स्वतः सुख घेण्याचा स्वार्थ असतो.
प्रेमात मी पणा नसतो. मोहात मी पणा असतो, स्वार्थ असतो.
प्रेमात आम्ही स्वतःला योग्य बनविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मोहात मनुष्य सुखाचा आधार मानून ती व्यक्ती, सत्ता, पैसा काहिही करून मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा तो समाजाला किंवा कोणालाही हानी पोहचवतो.
मोहाला प्रेमात परिवर्तीत करणे हाच मोहावर विजय मिळवण्याचा उपाय आहे. स्वार्थ सोडला की परमार्थ आपोआप घडतो.

मग, करू या ना आपण प्रयत्न, या षड रिपूंवर विजय मिळविण्याचा ?

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *