वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतक-यांना संरक्षण द्या – आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar 

आ. मुनगंटीवार यांनी मा. जिल्‍हाधिकारी व वनाधिकारी यांना दिले निर्देश.

चंद्रपूर जिल्‍हयातील मुल तालुक्‍यातील मारोडा, पडझरी, करवन, काटवन, रत्‍नापूर व भादुर्णा व भद्रावती तालुक्‍यातील कोकेवाडा (तु) व सोनेगाव (बु) या गावांमध्‍ये अनेक शेतकरी ब-याच वर्षांपासून शेती करतात व तिथे राहतात. गेल्‍या काही दिवसांपासून त्‍यांना वनविभागाने जागा रिकामी करण्‍यासंदर्भात नोटीस पाठविली. असे सर्व शेतकरी महाराष्‍ट्राचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांना भेटले व आपली व्‍यथा त्‍यांना सांगीतली. आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात ताबडतोब मा. जिल्‍हाधिकारी श्री. अजय गुल्‍हाने व ताडोबा अंधारी क्षेत्राचे उपसंचालक श्री. गुरूप्रसाद यांच्‍याबरोबर सर्व शेतक-यांची एक बैठक आयोजित केली व दोन्‍ही अधिका-यांना सर्वप्रथम वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतक-यांना ताबडतोब संरक्षण देण्‍याचे निर्देश बैठकीत दिले.

 

या प्रश्‍नाशी संबंधित ३० मिनीटांची चर्चा विधानसभेत घडवून आणेन असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले. यावेळी बोलताना श्री. गुरूप्रसाद म्‍हणाले की, यासंदर्भात एक जनहित याचीका उच्‍च न्‍यायालयात दाखल आहे व या याचिकेशी संबंधित प्रत्‍येक सुनावणीदरम्‍यान याच्‍याशी संबंधित माहिती न्‍यायालयाला द्यावी लागते. यावर मा. जिल्‍हाधिकारी यांनी अशा सर्व शेतक-यांना त्‍यांच्‍याकडे पुनर्विलोकन याचिका दाखल करण्‍यास सांगीतले. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे शेतक-यांनी तयार करून मा. जिल्‍हाधिका-यांकडे पुनर्विलोकन याचिका दाखल करावी असे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

जोपर्यंत या सर्व गोष्‍टींचा निकाल लागत नाही तोपर्यंत शेतक-यांना कुठल्‍याही प्रकारचा त्रास देवू नये असे स्‍पष्‍ट निर्देश आ. मुनगंटीवार यांनी मा. जिल्‍हाधिकारी व ताडोबा अंधारी क्षेत्राचे उपसंचालक श्री. गुरूप्रसाद यांना दिले. यावेळी भागवत कुमरे, मधुकर पोहीनकर, मोतीराम शेंडे व अन्‍य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here