दिव्यांगांना हव्या असलेल्या संधी निर्माण केल्यास जीवन सुकर होईल* – *सदाशिवराव ताजने*

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने

*वरोरा* : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी दिव्यांगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. संवेदनाहीन यंत्रणेमुळे दिव्यांगाच्या समान संधीच्या हक्कास हरताळ फासल्या जात असल्याने पुनर्वसनाच्या सुविधा शेवटच्या थरापर्यंत पोहोचल्यास त्यांचे जीवन खर्‍या अर्थाने सुकर होईल, असे परखड प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, स्वरानंदवन ऑर्केस्ट्राचे व्यवस्थापक तथा राज्य शासनातर्फे राज्य अपंग पुरस्कारप्राप्त समाजसेवक सदाशिवराव ताजने यांनी येथे केले. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून स्वरानंदवन ऑर्केस्ट्राच्या चमुंतर्फे आनंदवनातील स्वरानंदवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून स्वरानंदवनचे ज्येष्ठ कलाकार अरुण कदम, नाना कुळसंगे, नरेश चांदेकर, संतोष रामटेके उपस्थित होते.
ताजने पुढे म्हणाले की, ते महारोगी सेवा समिती, आनंदवनात ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहे. या कालावधीत दिव्यांगांना त्याच्या हक्काच्या सोयी सुविधेसाठी मोठी लढाई लढावी लागली. ते म्हणाले की, मुळातच दिव्यांगांना आपल्या देशात कमी लेखलं जातं. दिव्यांगाच्या हक्क संरक्षणासाठी चांगले कायदे, योजना आहेत. परंतु दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. दिव्यागांचा बॅकलॉग १०० टक्के भरला गेला पाहिजे, सरकारी योजना ह्या ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सर्वांनी दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना मदत करण्याची, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ‘ समानसंधी ‘ तत्त्वावर असलेल्या योजनांची सक्तीने अंमलबजावणी करण्याची व कर्तव्यात हयगय करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांवर जरब बसेल अशा शिक्षेची तरतूद करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
अरूण कदम यांनी दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्यावर उहापोह करीत अन्य व्यक्तींनी त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, असे सांगितले.

सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग डॉ हेलन ऍडम्स केलर व लुई ब्रेल यांचे विशेष स्मरण करण्यात आले. यानिमित्ताने ‘ माणूस माझे नाव ‘ व ‘ श्रृंखला पायी असू दे ‘ सह लुई ब्रेल यांच्या जीवनावरील चार ‘अपंग गीतांचे ‘ गायन करण्यात आले.
याप्रसंगी जगदीश दिवटे, संतोष कोहळे, गजानन भगत, बंडू तेलंग, क्षमा पठाण, धर्मराव बारसे, मंगेश चौधरी, मेघराज भोयर इत्यादींची विशेष उपस्थिती होती.
सूत्रसंचालन सुधीर कदम यांनी केले तर आभार हेमा भोयर यांनी मानले.
कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *