काजव्याचा सुर्यप्रकाश : गोपाल शिरपूरकर

By : Avinash Poinkar

काही माणसं मनस्वी कलावंत असतात. प्रसिद्धी पराड:मुख असतात. सभोवतालच्या जगाचं अवलोकन करत असतांना ते संयमाने त्यांच्या नोंदी घेतात. आत्ममग्नतेचा गुणधर्म रुजवून संतांच्या विचारांच्या पावलांवर हळुवार पाऊले टाकत मार्गक्रमण करतात. पण हे असं मनस्वी कलंदरपण सा-यांनाच शक्य नाही. ज्यांना शक्य आहे ते गोपाल शिरपूरकर सारखे शुद्ध अभिव्यक्तीतून साद घालत पुढे येतात.

वेदनांचं गाठोळं खोलून उगीच आसवांची रूंजी घालत बसण्यात राम नाही. आव्हानांना प्रतिउत्तर देण्यातही हनुमान नाही. आव्हाने देखील शांत व संयमाने पेलता येतात. यातून नवा अध्याय तयार होतो. अगदी तीन वर्षांपूर्वी ओळख झालेले चंद्रपूरचे गोपाल शिरपूरकर इतके जवळ आणि हृदयाचा कप्पा आरपार करून गेलेत की तासभर गप्पांचा फड कसा रंगून जातो हे देखील कळत नाही. माणसांच्या विचाराची आणि स्वभावाची ही जादू असावी. वयाचे मोठे अंतर असले तरी मैत्रीचे सख्ख्य एका समान धाग्यात गुंतलेले जाणवते.

गोपाल शिरपूरकर हे खरेतर हरहुन्नरी प्राथमीक शिक्षक. त्यांची आई देखील शिक्षिका. वडील मिळेल ते काम करणारे अस्सल कष्टकरी. चंदनखेडा या मूळ जागी जन्मलेले गोपाल शिरपूरकर यांना ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा विधायक सूर वसुधैव कुटुम्बकम सारखाच. प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांचे जन्मगाव असलेल्या बेलोरा गावात ते अध्यापनाचे सेवाकार्य करीत आहे. त्यांना इंजिनिअर व्हायचं होतं. पण काही घटना मनावर इतक्या कोरल्या जातात की त्याचे पडसाद हयातभर विसरता येत नाहीत. तरुणावस्थेत त्यांच्या मोठ्या बहिणीचे दुःखद निधन झाले. त्याचा मोठा फटका कुटुंबाला बसला. तेव्हा दहावीत शिकणारे गोपाल शिरपूरकर हे कौटुंबिक सल्ल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण न घेता अध्यापक पदविकाकडे वळले. कुंभार जसा ओल्या मडक्यांना आकार देतो, तसाच कोवळ्या मुलांना मागील २५ वर्षापासून ज्ञानोदयाचा आकार देण्याचे काम शिक्षक म्हणून ते नित्यनेमे करत आहे.

माणसात अभिजात कौशल्य असले की त्याची चमक समाजाला जाणवते. शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या बेलोरा शाळेत ‘किलबिल’ नावाचे विद्यार्थ्यांसाठी मासिक सुरू केले. यातून विद्यार्थ्यांनाच लिहिते केले. डोक्यावर भगवी टोपी घालणारा हा शिक्षक राष्ट्रसंतांच्या विचाराचा खराखुरा पाईक आहे. स्वतः ‘ग्रामगीताचार्य’ या उपाधीने गौरवलेला हा माणूस कधीही आपली स्वतःची ओळख सांगताना कुठेही दिसत नाही. आत्ममग्नतेच्या ध्यासातून अभिजात निर्मितीसाठी स्वतःच स्वतःला खोदणारा, तपासणारा हा शिक्षकी पेशातील हळवा समीक्षक आहे.

गोपाल शिरपूरकर हे नाव आता सर्वार्थाने मराठी साहित्यात परिचित झाले आहे. कुठल्याही कंपूशाहीत सामील न होता रोज वाचन, मनन व चिंतनातून अभिव्यक्तीला कागदावर मोकळी वाट करून देण्याचं कसब त्यांना साधलं. यातून लेखणीचा कोलाज समाजमाध्यमात गडद झाला. ‘माहृयी परदेस वारी’ हे प्रवासवर्णन त्यांचे मागील वर्षी प्रकाशित झाले. त्याची दखल सर्वसामान्य माणसांसोबत व-हाडी बोलीभाषीकांनी विशेष घेतली. साहित्य जगणारे लेखक फार थोड्या प्रमाणात असतात. गोपाल शिरपूरकर हे व्रतस्थ लेखक आहे. लेखनातील सातत्य त्यांचे कमालीचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या वेदनावरील आगामी ‘कादंबरी’ त्यांची प्रकाशनाधीन आहे. ‘मोहोरपाला’ हा ललीत व स्फुट लेखसंग्रह वर्षभरात वाचकांपुढे दाखल होईल. दीर्घकथा आपल्याला का लिहिता येऊ नये, हा विचार त्यांना अस्वस्थ करायचा. याच अस्वस्थ विचारातून त्यांनी ‘गोची’ हा दिर्घ कथासंग्रह साकारला. सर्वसामान्य माणसांच्या जगण्या-भोगण्याचे विषय, सभोवतालच्या टिपलेल्या अस्वस्थ नोंदी, आत्ममग्नेच्या दारातून आलेलं चिंतन आणि आशयाभिव्यक्ती हे त्यांच्या लिखाणाचे विशेष.

गोपाल शिरपूरकर हे रसायन प्रत्येकालाच सहज गवसेल असं नाही. हा माणूस सत्याच्या मोहातला. सत्वशील जगण्याचा गुणधर्म त्यांना आपला वाटतो. कधीही स्वतःविषयी न बोलता दुसऱ्यांना ऐकून घेणं, जाणणं यांचं नित्यनेमे ठरलेलं. मोठ्या माणसांची नेमकी लक्षणे कोणती ? अशी प्रश्ने भीडतात तेव्हा गोपाल शिरपूरकर यांचा मानवी स्वभाव आणि त्यांच्या जगण्याकडे माझी नजर जाते. ते कुठल्याही गोष्टीकडे फार आकर्षित होत नाहीत. मात्र ज्या गोष्टीत ते नाळ जोडतात, त्याचा इमाने-इतबारे साक्षमोक्ष लावतात. याचे चांगले उदाहरण विदर्भ साहित्य संघाची गोंडवन शाखा. या शाखेचे साहित्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि नव्या उपक्रमाचे आव्हान स्वीकारत गोंडवन शाखेला चैतन्य बहाल केले.

गोपाल शिरपूरकर हे नाव साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात जोरकस झाले असताना प्रयोगशील विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची भूमिका तितकीच लक्षणीय आहे. त्याचे दाखले त्यांचे सहकारी शिक्षक व सुहदयी राजेंद्र घोटकर सांगतात. हा माणूस कधीही पुरस्काराच्या रांगेत दिसत नाही. कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होताना पुढच्या रांगेत चुकूनही बसलेले जाणवत नाही. एखाद्या कविसंमेलनात कवींचा तोच तो पांचटपणा लक्षात आला की ‘बासुंदी’ सारखी हास्य कविता सादर करून रसिकांना अलगद जिंकणारे हेच गोपाल शिरपूरकर असतात.

गोपाल शिरपूरकर यांचे कौटुंबिक जगणे देखील समर्पित आहे. नुकताच दहावी झालेला त्यांचा मुलगा कबीर हा अव्वल दर्जाचा व्हायोलिन वादक. त्याच्या छंदाची जोपासना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्हायोलिन वादक कला रामनाथ यांच्याशी संपर्क करून कबीरला प्रशिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिले. मागील पाच वर्षापासून कबीर रोज पाच ते सहा तास रियाज करतो. त्याची फलनिष्पत्ती आगामी काळात महाराष्ट्र व देश अनुभवेल, याचे श्रेय कुटुंबवत्सल शिरपूरकर दांपत्याला जाईल, हे कुणीही नाकारणार नाही. माणसाला नितळ आणि निर्मळ जगता यावे, किमान साहित्यातून समाज संवर्धनाचे बीजारोपण करता यावे, ही धडपड गोपाल शिरपूरकर नावाचा कलंदर माणूस, शिक्षक सातत्यपूर्ण परिश्रमातून करतो आहे. प्रयत्नात परमेश्र्वर शोधणारे खरे अवलिया असतात. हा लख्ख अंधारातील काजव्याचा तेजोमय सूर्यप्रकाश आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *