• एकविसाव्या शतकालाही ‘भानामती’ पोखरतेय…

लोकदर्शन 👉By Avinash poinkar

एकविसावे शतक विज्ञान-तंत्रज्ञानासोबत आधुनिक विचारधारा रुजवणारे, मानवी प्रगतीचे विश्व व्यापक करणारे असल्याचे ढोल आपण पिटतो. समाज हा अनिष्ट रूढी-प्रथा-परंपरा बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासणारा, कार्यकारणभाव समजून घेणारा होत असल्याचे सुशिक्षितांच्या ओठावर सहज येते. आपण जागतिकीकरणाच्या मोहजाळात फसले जात असतांना गाव-गाड्यातूनच शहरी विकासाची प्रक्रिया होत असल्याचे का विसरतो ? स्वत:ला सुशिक्षित समजणारे ग्राम प्रबोधनाला किमान एक टक्का देखील सामाजिक दायित्व देवू शकत नसेल तर भानामतीचे भूत पिढ्यानपिढ्या मानगुटीवर बसून लचके तोडत राहील, यात नवल असे काही नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती तालुका हा कायम तसा दुर्लक्षितच. तालुक्यापासून १२ कि.मी अंतरावरील वणी खुर्द गावात शनिवार २१ आगष्टला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. गावात अचानक दोन महिलांच्या अंगात देवी येते आणि काही लोकांनी जादूटोणा-भानामती केल्याची बतावणी करून गावातील ७ लोकांची स्पष्ट नावे घेते. नंतर गांव एकत्र येवून त्या सातही लोकांचे गावातील चौकात दोरखंडाने हात पाय बांधले जाते. गावात होणाऱ्या अघोरी प्रकाराला जबाबदार समजून जीवघेणी मारहाण केली जाते. हा प्रकार सुरू असतांना गावातील सभ्य लोक मूकदर्शक बनून बघत असतात, कुणीही या प्रकाराला भीतीने विरोध करण्याची हिम्मत करत नाही. विशेषत: इतकी मोठी व भयावह घटना चक्क दोन दिवसानंतर उजेडात येते. नेमकं काय चाललंय ?

राहायला एकदाचे घर नसेल तरी चालेल पण स्मार्ट फोन आता प्रत्येक कुटुंबात आला. माहितीची आदान-प्रदानता काही सेकंदात शेकडो लोकांपर्यंत पोहचते. मात्र या घटनेची माहिती पोलिस विभागाकडूनही गुप्त ठेवण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात कुटुंबांना वाळीत टाकणं, गावाच्या बाहेर काढणं हे प्रकार नवे नाहीत. यात जीवतीतील वणी खुर्दच्या प्रकाराने यात अधिक भर घातली. हा प्रकार केवळ एका जाती-धर्मापुरता मर्यादित नाही तर एकविसाव्या शतकाला वाकुल्या दाखवत समस्त माणुसकीला काळिमा फासणारा आहे.

शांताबाई भगवान कांबळे(वय ५३), शिवराज कांबळे(वय ७४), साहेबराव एकनाथ हुके(वय ४८), धम्मशीला सुधाकर हुके(वय ३८), पंचफुला शिवराज हुके(वय ५५), प्रयागबाई हुके(वय ६४), एकनाथ हुके(वय ७०) ही भानामतीच्या आरोपातील निरपराध पिढीत लोक. सर्व याच गावातील रहिवासी. वर्षानुवर्षे गावात राहणाऱ्या माणसांची ओळख गावकऱ्यांना असते. मात्र कुणाच्यातरी अंगात देवी येणे आणि तिने सदर लोकांनी करणी केल्याचे सांगितल्यावर सर्व गावांचाच विश्वास बसणे हे सर्वात भयाण आहे. जर पिढीत सातही लोक अशा प्रकारचे भानामतीचे प्रयोग करत असल्याचे पुरावे असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. मात्र सामूहिक गावाने केलेली अशी घृणास्पद शिक्षा कायद्याला अनुसरून नाही. या पिढीतावर गावकऱ्यांनी जो सामूहिक अन्याय केला त्याची भरपाई कुणीही करू शकणार नाही. शिवाय वयाने जेष्ठ असलेल्या मंडळींना इतक्या क्रूर पद्धतीने खांबाला दोरीने हात-पाय बांधून चौकात जबर मारहाण करणे ही आपली संस्कृती नाही. मानवी मनावर संपूर्ण गावाने केलेला हा आघात पचवून आता हे लोक गावात सन्मानाने राहू शकतील ? कितीही समुपदेशन केले तरीही मनाचे घाव भरून निघातील ? या ७ लोकांपैकी ५ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. काहीची हाडे मोडली आहेत. हा हादरवणारा प्रकार पोलिसांनी वेळीच आवरला नसता तर याचे परिणाम किती तीव्र झाले असते, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील या गावाच्या घटनेने समाजमन हादरले असले तरीही हे सामाजिक अपयश आपणा सर्वांचे आहे, हे स्वीकारून प्रबोधनाचा लोकजागर करण्याची जवाबदारी देणारे आहे.

समाजात भूतबाधा होणे, जादूटोणा करणे असे प्रकार ग्रामीण भागात नित्याचेच आहे. अभ्यासक्रमातही काळी जादू, पांढरी जादू शिकवली जाते. मात्र यावर प्रबोधनाचे पाठ शालेय स्तरावर गिरवण्यात शासनही नापास आहे. इग्नू विद्यापीठाने तर ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता देवून कहर केला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्यापरीने या सर्व बाबीवर काम करून ढोंगी पितळ उघडे करत असले तरीही प्रबोधनाचा ठेका केवळ या चळवळीच्या लोकांनीच घेतला आहे का ? समाजातील घटक म्हणून सर्वसामान्य माणसाची कुठलीच भूमिका नाही ?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा अंमलात आणावा यासाठी १६ वर्ष संघर्ष केला, मात्र त्यांच्या हत्येनंतरच सरकारला जाग येवून कायदा लागू करावा लागला, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा अन काळा जादू अधिनियम २०१३” या कायद्यातील कलमानुसार भूत उतरवण्याच्या बहाण्याने चमत्काराचा प्रयोग, गुप्तधन, करणी-भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य करणे, नरबळी देणे, एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, शैतान आहे असे जाहीर करणे, भूत-पिशाच्च यांना आवाहन करून घबराहट निर्माण करणे, स्वत:मधे अलौकिक शक्ती आहे अथवा आपण कोणाचे तरी अवतार आहोत असा दावा करणे अशा प्रकारवर बंदी आहे. मात्र तरीही जिवती तालुक्यात घडलेला हा प्रकार महाराष्ट्रात ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने धगधगत असल्याचा पुरावा आहे.

नरेंद्र दाभोळकर व माधव बागवे यांनी लिहिलेल्या काळी जादू अर्थात भानामती या पुस्तकात ते अधोरेखित करतात की ‘गेल्या २५ वर्षात हे प्रकार कमी झालेले आहेत; परंतु बंद झालेले नाहीत. १० मे २०११ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हाण यांच्या कराड तालुक्यातील कराडपासून अवघ्या ११ किमीवर असलेल्या धोंडेवाडी या गावात अचानकपणे भानामतीचे प्रकार घडू लागले. टाकीतील पाणी तांबळे होणे, बंद कपाटातील वस्तु आपोआप बाहेर येणे, कपडे फाटणे व जळणे अशा स्वरूपाच्या या भयचकित करणाऱ्या गूढ घटना होत्या. ही भानामती आपला ५ वर्षाचा नातू करतो हे देवऋषीचे म्हणणे प्रमाण मानून भानामतीचे प्रकार थांबवण्यासाठी सख्ख्या आजीने गळा दाबून ५ वर्षाच्या नातवाचा बळी घेतला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी ११ मे २०११ ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मुंबईहून काही काळासाठी घरी आलेल्या तरुणाने लग्नानंतर चार वर्षे आपल्याला मुलबाळ नाही, याचे कारण आपल्या चुलत बहिणीने करणी केलेली आहे, हे भगताचे म्हणणे खरे मानून थंड डोक्याने बहिणीच्या डोक्यात काठी मारून तिचे आयुष्य संपवले. तर १३ मे २०११ ला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात धाकट्या जावेने आपल्यावर करणी-भानामती केली या संशयाने थोरल्या जावेने धाकटी जाऊ व तिचे एक महिन्याचे मूल यांचे जीवन संपवण्यासाठी त्यांना विष पाजले. परंतु त्यापासून बोध एवढाच घ्यावयाचा की, एकविसाव्या शतकात विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असतांनाही भानामतीची झापडे लावून माणसे आपले जीवन जगत आहेत.’

जिवती हा आदिवासीबहुल मागास तालुका आहे. या तालुक्याच्या विकासाच्या अनुशेषाबाबत सारेच गप्प आहेत. अजूनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातदेखील बऱ्याच गावात जायला रस्ते नाहीत. दळण-वळणाच्या सुविधा, वीज, नेटवर्क नाहीत. या ग्रामीण भागातील लोकांचे अठरा विश्व दारिद्रयात परंपरागत जगणे अजूनही सुरू आहे. यांच्या जोरावर काम करणारे संधीसाधू मात्र गब्बर झालेत. शासनाच्या योजना कितपत प्रभावी ठरत असतील, हे अशा प्रकरणावरून लक्षात येते.

हा घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. गावाच्या इतिहासाला छेद देणारा आहे. खरेतर जादूटोणा कायद्याने अंगात देव येण्याचे सोंग घेवून निरपराध कुटुंबांना भानामती करत असल्याचा आरोप करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. असे प्रकार अंधश्रद्धेतून किंवा पूर्ववैमनस्यातून होत असल्याचे अंनिसने बऱ्याचदा उघड केले. तरीही समाजमन जागृत होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. प्रत्येक गावात यंत्रणा असते. हा प्रकार घडला तेव्हा गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, सुशिक्षित, जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक नेमके काय करत होते ? त्यांनी प्रकाराला आळा घालण्यासाठी पुढाकार का घेतला नाही ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने अनुत्तरित राहतात. हे सामाजिक अंध:पतनाचे लक्षण आहे.

भारत हा सुधारणावादी विचारांचा देश आहे. त्यातही महाराष्ट्राला प्रबोधनकारी विवेकशील व तर्कनिष्ठ संतांची परंपरा आहे. संत तुकाराम महाराजा पासून तर संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारांनी गावे जागवली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भजन, कीर्तनातून प्रबोधनाचा रथ पुढे नेला. याच महाराष्ट्रात भानामतीच्या कारणाने असे प्रकार घडत असतील तर प्रबोधनाची चळवळ गावखेड्यात नव्याने व्यापक व सशक्त उभी करण्याचे हे मोठे आव्हान आहे. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शासनच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनी एकत्र येवून अश्या अंध-विचारांचे उच्चाटन करणाऱ्यांना परांपरांना छेद देण्याची गरज आहे.

 

– अविनाश पोईनकर
संपर्क – ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

•••••••••

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *