धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा

By : Mohan Bharti

१०१ लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तक्रार

पूर्वसूचना न देता घेण्यात आली बयाने

कोरपना – तालुक्यातील धामणगाव येथील संतोषी माता महिला बचत गटाकडून ९० टक्के आदिवासी असलेल्या धामणगाव व नैतामगुडा या गावातील लाभार्थ्यांकडून तीनपट रक्कम घेऊन नियतनापेक्षा कमी धान्य देण्यात येत होते. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर दुकान निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर धामणगाव व नैतामगुडा या दोन्ही गावातील १५० पैकी १०१ लाभार्थ्यांनी स्वतंत्ररीत्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे अर्ज करून हे दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली होती. दोनदा याबाबत अर्ज दिल्यानंतरही पुरवठा विभागाकडून अजूनपर्यंत रास्तभाव दुकानाची स्वतंत्ररीत्या चौकशी करण्यात आली नाही. दिनांक १७ जुन २०२१ रोजी शिधापत्रिकाधारकांना पूर्वसूचना न देता तहसिल कार्यालयाकडून पुरवठा निरिक्षकाने अचानक गावात येऊन बयाने घेतले असून घेण्यात आलेली बयाने संशयास्पद वाटत आहे.
ज्यांच्याविरुद्ध नागरिकांची तक्रार होती त्या दुकानदारांच्या उपस्थितीत व बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत बयाने घेण्यात आल्याने बयान घेणाऱ्या अधिकाऱ्याविषयी लाभार्थ्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुरवठा विभागाकडून चौकशी लाभार्थ्यांना अपेक्षित आहे.
सदर दुकानातून लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कधीच २ रुपये प्रति किलोप्रमाणे गहू व ३ रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ मिळाले नाही. तसेच लाभार्थ्यांकडून सरसकट ८०, १००, १५०, २००, २५० अशा पद्धतीने रक्कम घेण्यात येत होती. संतोषी माता महिला बचत गटाकडून तब्बल १० वर्ष अशिक्षित आदिवासींची मोठ्या प्रमाणात लूट झाली असून लाभार्थ्यांकडून आजपर्यंत घेण्यात आलेली अतिरिक्त रक्कम दुकानदारांकडून वसूल करून देण्याची मागणीही निवेदन देणाऱ्या लाभार्थ्यांनी केली आहे. एका वर्षापासून दुकान निलंबित असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दुकान कायमस्वरूपी रद्द करावे अशी मागणी १०१ लाभार्थ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. मात्र निवेदनाची योग्य दखल न घेतल्याने लाभार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
येथील शिधापत्रिकाधारकांना नियमाप्रमाणे धान्य न देता कमी धान्य देत असून आगाऊची रक्कम कार्डधारकांकडून वसूल करीत आहे. येथील 90 टक्के ग्राहक हे आदिवासी असून त्यातील अनेक लोक अशिक्षित आहे. त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन या दुकानदाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासी ग्राहकांची लूट सुरू आहे. याबाबतची तक्रार दिली असून कारवाईकरिता जिल्हापुरवठा अधिकारी यांचेकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.
धामणगाव येथील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याऐवजी थातूरमातूर कारवाई करून परवाना निलंबित केल्याने दुकान कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी १०१ शिधापत्रिकाधारकांनी दिलेली तक्रार थंड बस्त्यात टाकली आहे. आता जुन्याच दुकानदाराला रास्तभाव दुकान जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. ही बाब धामणगाव व नैतामगुडा येथील शिधापत्रिकांच्या लक्षात आली असून लाभार्थी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *