लवकरच खुला होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट.

 

 

*आ. मुनगंटीवार यांनी दिले वनाधिका-यांना निर्देश.*
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत येणा-या बफर झोनमधील पद्मापूर गेट नागरिकांसाठी खुला करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिका-यांना शनिवार (१२ जून) ला झालेल्‍या एका बैठकीत दिले असून पदमापूर गेट आता लवकरच खुला केला जाणार आहे. सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचे कारण पुढे करून वनाधिका-यांनी नागरिकांना प्रवेश नाकारला होता. त्‍याचा फटका तेथील ग्रामवासियांनाही होत होता. याची तक्रार नागरिकांनी केल्‍यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनअधिका-यांसोबत एक बैठक घेवून महत्‍वपूर्ण निर्देश दिले.

या बैठकीत ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प कोअर प्रमुख रामगांवकर, मोहुर्ली आगरझरी या गावातील सुप्रसिध्‍द नागरिकांसह, कॉंग्रेस नेते विनोद दत्‍तात्रय, विनोद सातपुते, अशोक चौधरी, सोमनाथ टेंभुर्णे, दिलीप कातकर, रिसोर्ट व होमस्‍टेचे संचालक यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत येणा-या बफर झोनमधील पद्मापूर गेटमधून सर्वसामान्‍य नागरिकांना काही दिवसांपासून वनाधिका-यांनी प्रवेश नाकारला होता. याचा त्रास मोहुर्ली आगरझरी येथील नागरिकांना होत असताना या क्षेत्रात असलेल्‍या बटर फ्लॉय गार्डन, नॅशनल पार्क इत्‍यादी ठिकाणी पर्यटन करणे कठीण झाले होते. नागरिकांनी आर.एफ.ओ. मून यांच्‍याबाबतही तक्रर नोंदविली होती. विषयाचे गांभीर्य ओळखून आ. मुनगंटीवार यांनी वनाधिका-यांना बैठकीसाठी पाचारण केले. या बैठकीत पदमापूरहून मोहुर्लीला जाणा-या पदमापूरजवळील गेट रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. यासोबतच त्‍या विभागाचे आर.एफ.ओ. बदलविण्‍याचे सुचित करून देश विदेशातुन येणा-या पर्यटकांशी चांगली वागणूक ठेवण्‍यासाठी पदमापूर गेटवर प्रशिक्षीत मुले, मुली ठेवण्‍याच्‍याही सुचना केल्‍या. याच गेटवर ताडोबा बद्दल माहिती देणारी माहिती पुस्तिका क्‍यु.आर. कोडसह पर्यटकांना उपलब्‍ध करून द्यावी. पर्यटकांनी नुसते पर्यटन न करता पर्यावरणाचे योध्‍दे व्‍हावे त्‍यादृष्‍टीने योजना करावी, असेही त्‍यांनी निर्देश दिले.

यावेळी वनअधिकारी रामगावंकर यांनी ताडोबा प्रकल्‍प ताबडतोब सुरू करून जुलै पर्यंत सुरू राहावा अशी विनंती केल्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात भारत सरकारच्‍या पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्‍याचे भरीव आश्‍वासन दिले. मध्‍यप्रदेशच्‍या धर्तीवर हॉट एअर बलुन सुरू करण्‍यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करण्‍यात येईल. या सर्व मुद्दयांवर वनविभागाच्‍या मुख्‍य सचिवांसोबत बैठक घेण्‍याचेही आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *