आभार सरकार चे

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार आपल्या भारतातही झाला.या कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गापासून वाचण्यासाठी सरकारने मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहिर केला.अगदी शाळा, महाविद्यालये, सरकारी दप्तरे, खाजगी कार्यालये बंद झाली. सरकारने दाखवलेल्या या औदार्यामुळे अनेकांचे जीव वाचले. आज काही प्रमाणात काही खाती किंवा काही सरकारी ऑफिसेस सुरू आहेत. पण तरीही त्याचे प्रमाण अल्प आहे. शाळा, महाविद्यालयात आज ही विद्यार्थ्यांना शिरकाव नाही.अपवादात्मक काही ठिकाणे अशी आहेत जिथे कोरोना विषाणूचा संसर्ग नाही.तेथे काही प्रमाणात कामकाज सुरू आहे.
या काळात सरकारने जे काम केले ते खरंच मला वाटतं प्रशंसनीय आहे. सर्व सरकारी अधिकारी, राजकीय नेते, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री व इतर अनेक सेवाभावी सहाय्यक व्यक्ती अशा सर्वांचे एकावेळी आभार मानणे अगत्याचे आहे.आपण म्हणतो की आपल्या मित्राने आपल्याला मदत केली तर त्याचे कसले आभार मानायचे, पण आपण कोणाला काही मोठी भेट देऊ शकत नाही, खूप मोठा पैशाचा हातभार लावू शकत नाही पण जर एखाद्याने एखादे चांगले काम केले तर नक्कीच आपण सर्वांनी त्याचे आभार मानावे असे मला मनस्वी वाटते. ही माझी कल्पना वेगळी असेलही पण तरीही ती सर्वांना आनंद देईल अशी माझी अपेक्षा आहे.
एका स्त्रीच्या पगारापेक्षा पुरुषाचा पगार घराची जबाबदारी बनून राहतो. स्त्री जरी कमवती नसली तरी पुरुषाला मात्र घराची जबाबदारी पेलावी लागते.आज समाज बदलला असला स्त्रियाही घरातून बाहेर निघाल्या असल्या तरी नोकरी म्हणजे पैसा कमावणे ही पुरुषांची जबाबदारी आहे. कोरोना काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर काम असणा-यांची तर उपासमारीची पाळी आली.छोटे – मोठे काम करून उदरनिर्वाह करणा-यांना दोन घास मिळणे दुर्लभ झाले.तरी काही संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी, शासनाने अन्नदान, जीवनावश्यक वस्तू वाटप करुन अनेकांना जमेल तशी मदत केली.त्या सर्वांचे आभार.
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी होती. त्यांचा पगार नियमित येत होता.थोडेसे कुठे भय होते, सरकार आम्हाला या महिन्याचा पगार देणार नाही, पण तरीही सरकारने अगदी मायाळू, प्रेमळ भूमिका जिवंत ठेवत शेवटपर्यंत सर्वांना पगार दिला.ज्या घरात पती पत्नी दोघे कमवते होते.तेथे एकमेकांच्या मिळकतीचा, शिल्लक रकमेचा आधार होता.ज्या घरात एकच व्यक्ती कमवती त्यांची परिस्थिती अगदी बिकट होती.त्यातच रोजंदारीवर काम असल्यास हातावर हात धरून बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तरीही सरकारने या दारुण परिस्थितीत आपल्या सोज्वळपणाचा पदोपदी अनुभव दिला. त्यांचे मनापासून आभार.
पोलिस खाते, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनावर मात करण्यास मदत केली.त्यांचे ही आभार. आपल्यावर आलेल्या या वैश्विक संकटावर मात करून सर्वांना आनंदी जीवन लाभावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सरकारने केलेले कार्य प्रशंसनीय आहे आणि एक भारताचा नागरिक म्हणून सरकारचे धन्यवाद मानणे माझे कर्तव्य समजते.

डॉ.सौ.शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *