वरोऱ्यात श्रीरामनवरात्रौत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

by : Rajendra Mardane

वरोरा : श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी व श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती, वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० मार्च रोजी आयोजित श्रीराम शोभायात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी श्री राम मंदिर देवस्थान परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस म्हणाले की, श्रीराम मंदिर देवस्थान येथे श्रीराम जन्म नवरात्रौत्सव निमित्ताने दहा दिवसीय व्याख्यानमालेसह, पहाट पाडवा, सुश्राव्य भजन, श्रीराम रक्षा पठन, व्याख्यान, दैनंदिन श्रीराम उपासना, श्रीराम शोभायात्रा, गोपाल काल्याचे भजन, श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३० मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीराम मंदिर देवस्थान येथे जन्मोत्सव कीर्तन साजरा होईल व संध्याकाळी भव्य शोभायात्रा श्रीराम मंदिर देवस्थान येथून निघून वीर सावरकर चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पं. नेहरू चौक, मित्र चौक, डोंगरवार चौक, विठ्ठल मंदिर यामार्गे श्रीराम मंदिर देवस्थानात पोहचेल.
शोभायात्रेत भव्य रोशणाईयुक्त रथयात्रा, वारकरी भजन मंडळी, आकर्षक देखावे, चौका – चौकात चितारलेल्या रांगोळ्या आदी प्रमुख आकर्षण असणार आहे. शोभायात्रेत भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे, पेयजलाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. ३१ मार्चला या सोहळ्याचा समारोप गोपाळकाल्याच्या भजनाने होईल. संपूर्ण धार्मिक कार्यक्रमात वरोरा शहरातील विविध समाजाचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती ही आयोजकांनी दिली.
शहरात मागील काही वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून हजारो भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेतात. यावर्षी सुद्धा शोभायात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस, डॉ. विवेक तेला अन्य संस्थेचे पदाधिकारी मुकुल सायंकार, विजय जुनघरे, पंकज खाजोने, शुभम गोल्हर, डॉ. सौरभ ढवस, जितेश कायरकर, गौरव मेले इ. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *