*कोकणातील वानरे आणि रानडुक्करांचा उपद्रवासंदर्भात उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची समिती : सुधीर मुनगंटीवार* *वन विभाग तीन हजार नवीन पदभरती करणार* *विधानसभा लक्ष्यवेधी वरील चर्चेच्या उत्तरात दिली माहिती.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

नागपूर, दि. 27 डिसेंबर 2022 :

कोकणात रानटी वानरे आणि रानडुकरे यांच्यामुळे होणारे शेती फळबागा आणि घरांचे नुकसान टाळण्याकरता उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती नियुक्त करण्यात येईल असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच वनविभागात यासाठी आवश्यक अशी तीन हजार पदांची भरती लवकरच केली जाईल असेही ते म्हणाले. या विषयात विधानसभा सदस्य श्री योगेश कदम यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव गेली काही वर्षे वाढला आहे. त्याविषयी ही लक्ष्यवेधी होती. या लक्ष्यवेधीवरील चर्चेला उत्तर देताना ना.श्री. मुनगंटीवार म्हणाले की रानडुकरांची कृषी क्षेत्रात पारध करण्याची परवानगी जिल्हा स्तरावर देण्याचे निर्देश दिले आहेत. वानरांचा उपद्रव कमी करण्याकरता हिमाचलप्रदेश पॅटर्न राबवायचा असेल तर केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी संबंधित विधानसभा सदस्यांची एक समिती गठित करण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर कोकणातील जंगलात उंबर, रान अंजीर, बांबू आणि शेवगा हे वानरांची आवडती झाडे वाढवून त्यांना गावे व शेतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी एका सूचनेवर प्रतिसाद देतांना सांगितले.

फळबागांना वाढीव नुकसान भरपाई

कोकणातील आंबा, काजू, राळ, पोफळी इत्या. फळबागांचे वानर जे नुकसान करतात, त्याची नुकसान भरपाई सध्या फारच तुटपुंजी आहे. ती राज्यातील इतर शेतीबाबत जशी दिली जाते त्याधर्तीवर देण्यासाठी सध्या समिती काम करत आहे, असे सांगून ना.श्री मुनगंटीवार म्हणाले की ही नुकसान भरपाई लवकरच वाढवता येईल. तसेच आंबा व काजू चा मोहोर, नारळ पोफळीचे कोवळी फळे यांचे नुकसान कसे मोजावे आणि भरपाई कशी द्यावी याची पद्धत ठरविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठित करण्यात येईल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर नुकसान भरपाईची पद्धत सोपी करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.

या लक्ष्यवेधी सूचनेवरील चर्चेत सर्वश्री योगेशजी कदम, भास्करजी जाधव, नितेशजी राणे इत्यादि विधानसभा सदस्यांनी सहभाग घेतला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *