



By : Shankar tadas
कोरपना :
डुक्कर, रोही, हरीण आणि माकडे हे वन्य प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरपना तालुक्याचा बहुतांश भाग जंगलालगत असल्यामुळे सदर प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात येताना दिसतात. मूळ निवारा जंगल असतानाही तेथे अन्नपाणी मिळेनासे झाल्याने डुक्कर, रोही, हरीण आणि माकडे या वन्य प्राण्यांनी शेतातील पिकाकडे मोर्चा वळवीला आहे. विविध उपाय करूनही त्यांच्यापासून पीक वाचविणे कठीण होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरित सर्वे करून नुकसान भरपाई करावी तसेच प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
वन्यप्राण्यापासून पिकाचे नुकसान झाले तर वन विभागाच्या वतीने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाते. त्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी शेतकरी पैसा खर्च करून ही प्रक्रिया पार पाडतो मात्र भरपाई मिळेलच याची खात्री नसते. या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येत नाही. काही शेतकरी विजेच्या तार टाकून वन्यप्राण्यापासून बचावाचा टोकाचा उपाय करतात. त्यामुळे प्रसंगी जिवहानीसुद्धा होताना दिसून येते. रात्रभर रखवाली करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे उपाय योजना करण्यासाठी प्रभावित क्षेत्रात वन विभागाने शेतकऱ्यांना योग्य मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.