चिचपल्‍ली नजिकच्‍या भिषण अपघातातील मृतकांच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री निधीतुन 5 लाख रु चे अर्थसहाय्य जाहीर करावे – आ सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.

  • लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

  • दिनांक १९ मे २०२२ रोजी चंद्रपूरकडे येणा-या डिझेल टॅंकर व लाकुड भरलेल्‍या ट्रकच्‍या घडकेत झालेल्‍या भिषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या ९ व्‍यक्‍तींना तातडीने प्रत्‍येकी ५ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन जाहीर करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली .त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

दिनांक १९ मे रोजी चिचपल्‍लीजवळ लाकुड भरलेल्‍या ट्रकच्‍या आणि डिझेल टॅंकर मध्‍ये जोरदार धडक झाली. दोन्‍ही वाहनांचे चालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्‍याने झालेल्‍या धडकेत डिझेल टॅंकरचा स्‍फोट होवून दोन्‍ही वाहनांना आग लागली व या आगीमध्‍ये लाकुड भरलेल्‍या ट्रकमधील सात व्‍यक्‍ती व डिझेल भरलेल्‍या टॅंकरमधील दोन व्‍यक्‍ती अशा एकूण ९ व्‍यक्‍ती जळून मरण पावल्‍या. ही अतिशय भिषण घटना आहे. या अपघातात दोन्‍ही वाहनांचे चालक कारणीभूत आहेत. त्‍यांच्‍यामुळे निरपराध व्‍यक्‍तींना प्राण गमवावे लागले. त्‍यामुळे तातडीने या मृतकांच्‍या कुटूंबियांना प्रत्‍येकी ५ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन जाहीर करण्‍याची आवश्‍यकता आहे. मुख्‍यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने अर्थसहाय्य जाहीर करावे अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

दरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. भारतिय जनता पार्टी पूर्ण शक्तिनिशी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना दिली.

राज्‍यात रस्‍ते अपघात दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. दारू पिऊन बेधुंदपणे वाहने चालविली जातात. या मद्यपी चालकांमुळे निरपराध लोकांचे जीव जातात व त्‍यांची कुटूंबे उघडयावर पडतात. अशा परिस्‍थीतीत मद्यपी वाहन चालकांमुळे नाहक आयुष्‍य उध्‍दवस्‍त झालेल्‍या अनेक निराधार कुटूंबांना नुकसान भरपाई म्‍हणून आर्थीक मदत शासनाच्‍या महसुल उत्‍पन्‍नातुन देण्‍याची मागणी करणारे अशासकीय विधेयक येत्‍या विधानसभा अधिवेशनात आपण मांडणार असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *