माणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे!

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
3 मार्च 2022.

हे शीर्षक बराच विचार करून असे दिले आहे कारण तारखांचा आणि तिथ्यांचा घोळ ह्यावर आजकाल लोकांच्या भावना आणि इतर बरच काय काय दुखायला लागलंय. पु.ल.नी असामी असामी मध्ये म्हटलय की “सुटीशी संबंध आल्या शिवाय तिथीची भांडण सुरु होत नाहीत…”

आता ह्या वाक्याला विनोदी संदर्भ आहे, पण हे वाक्य आठवायला कारण झाले ते वर्षातल्या दुसऱ्या शिवजयंतीचे!

सरकारी (!) शिवजयंती १९ फेब्रुवारीला झाली. पण अजून एक शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी होते. आता हि गोष्ट कोणीही मान्य करेल की छत्रपती शिवाजी महाराज एकदाच जन्माला आले होते. मग हा दोन दोन शिवजयंत्यांचा घोळ काय आहे?

आणि इतकी वर्षे हा अव्याहत चालूच का आहे? त्याचे खरे कारण म्हणजे ह्या इतक्या साध्या प्रश्नाचे राजकारण्यांनी चालवलेले राजकारण. आता त्याबाबत फारसे काही बोलण्यात अर्थ नाही पण हे राजकारणी आणि त्यांचे पित्तू ज्या गोष्टीचा आधार घेतात आणि कापूस पिंजत बसतात ती गोष्ट म्हणजे आपले पंचांग आणि आपण सध्या वापरत असलेले इंग्रजी कॅलेंडर आणि त्यांच्या मधील तफावत.

आता आता पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १० एप्रिल १६२७ ला झाला की, १९ फेब्रु १६३० ला झाला ह्यावरच वाद होता आणि त्यावरून इतिहासकारांमध्ये टोकाचे मतभेद-वाद होते, पण आता १९ फेब्रु १६३० किंवा फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ हि छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख/तिथी आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

ह्याचा सरळ सरळ अर्थ असा कि १९ फेब्रु १६३० ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या दिवशी हिंदू किंवा भारतीय पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ ही तिथी होती.

आता ह्या तारखा आणि तिथ्या दरवषी काही एकमेकांशी जुळत नाही हे ही आपल्याला माहिती आहे. पण असे का होते? एवढेच नाही तर आजकाल गुगल वर जे पंचांग दाखवणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.

त्यात जर आपण फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ हि तिथी टाकून त्यादिवशी इंग्लिश कॅलेंडरमध्ये कोणती तारीख येते हे पहिले तर ती येते ९ मार्च १६३०.

आता आहे का नाही कटकट! (हे मी दोन तीन वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये करून पहिले आहे आणि ही सोफ्टवेअर काही चूक नसतात. मग हा घोळ आहे काय?) ह्या मागची शास्त्रीय कारणं जरा समजावून घेऊ.

त्याचे मुख्य कारण आहे काल गणना करण्यची पद्धती. सध्या भारतात ज्या दोन प्रकारच्या काल गणनेच्या पद्धती प्रचलित आहेत (म्हणजे आपण त्या वापरतो) आपण त्यांच्यातील मुलभूत फरक आधी समजावून घेऊ.

आपण म्हणजे भारतीय लोक पूर्वीपासून काल गणना करताना दिवस-महिने-वर्ष हे चंद्राच्या अवस्थे प्रमाणे म्हणजे कले प्रमाणे मोजत आलो आहोत. ह्यालाच चांद्र-वर्ष असे म्हणतात. साध्या माणसालाही रात्री आकाशात चंद्राकडे पाहून तिथी कळते.

दिवसागणिक चंद्राच्या स्थिती आणि कलेत फरक पडतो. (एक सांगायची गोष्ट म्हणजे चंद्र जसा पृथ्वी भोवती फिरतो तसाच स्वत:भोवतीही फिरतो,

पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याची एक बाजू कायमची पृथ्वी कडे रोखलेली असते ह्यालाच gravitational lock असे म्हणतात –अर्थात ह्याचा आत्ता आपल्या कालगणनेशी संबंध नाही)त्यामुळे तिथी कळणे सहज सोप्पे होते.

हे आता आता पर्यंत फार महत्वाचे होते ते अशा करता की, आज आपल्याकडे कालदर्शिका, अगदी सहज आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत पण पूर्वी हे नव्हते. त्यामुळे चंद्राच्या कला पाहून काल निश्चिती करणे निरक्षर आणि गरीब माणसालाही अत्यंत सोपे होते.

तर हा चंद्र पृथ्वी भोवती आपली फेरी साधारण २७.३२३ दिवसात पूर्ण करतो, पण चंद्र स्वयंप्रकाशित नाही आपण चंद्राचा सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला भाग फक्त बघू शकतो.

आणि तो रोज थोडा थोडा बदलत असतो (कला) त्या हिशेबाने पहिले तर २९.५५ दिवस चंद्राला आपल्या कलांचे आवर्तन पूर्ण करायला लागतात. हाच चंद्र महिना. आता असे का होते? ते जरा समजावून घेऊ.

पृथ्वी आणि सूर्य ह्यांच्या केंद्राला जोडणारी एक काल्पनिक रेषा काढली आणि त्याच रेषेवर चंद्राचाही केंद्र आहे असे गृहीत धरले (हि अमावास्या किंवा पौर्णिमा असेल) तर त्याच ठिकाणी परत म्हणजे तिन्ही गोलाकांचे केंद्र बिंदू एकाच रेषेत यायला २७.३२३ दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी लागेळ.

जरी चंद्र आपली पृथ्वी भोवतीची प्रदक्षिणा २७.३२३ दिवसात पूर्ण करत असला तरीही. ह्याचे कारण आपली पृथ्वी सूर्या भोवती फिरत थोडी पुढे गेलेली असते. त्यामुळे सुरुवातीला असणारी पृथ्वी-सूर्य केंद्र जोडणारी रेषा आपला कोन थोडा बदलून पुढे गेलेली असते.

हे जास्त अंतर कापायला चंद्राला थोडा अधिक कालावधी लागतो आणि घोळ असा की हे अंतर प्रत्येक महिन्याला थोडे थोडे वेगळे येते, कारण पृथ्वी सूर्याभोवती गोल नाही तर लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते.

त्यामुळे सूर्यापासून लांब लंब वर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून जवळ लंब वर्तुळाच्या कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होते.

म्हणून हा जो २९.५ दिवसांचा कालावधी सांगितला आहे तो सरासरी आहे. काही महिने ह्या पेक्षा जास्त कालावधीचे तर काही महिने कमी कालावधीचे असतात.

असो तर चंद्र आपल्या सर्व कलांचा(!) हिशेब जमेला धरून ३५४ दिवसात आपले १२ महिने पूर्ण करतो . हेच ते चंद्र वर्ष पण पृथ्वीला आपली सूर्याभोवतीची नियोजित फेरी पूर्ण करायला अजून ११ दिवस जास्त लागतात.

(जास्त अचुक सांगायचे तर ११.२५ दिवस) तुम्ही म्हणाल अख्ख्या वर्षात ११.२५ दिवस मागे पुढे काय विशेष?! पण नाही ह्याचे फार मोठे परिणाम होऊ शकतात.

दर वर्षी ११.२५ दिवस मागे पडत काही वर्षांनी श्रावण महिना उन्हाळ्यात आणि मग हिवाळ्यात जाईल, कारण पृथ्वीवरचे ऋतू सूर्याच्या आणि पृथ्वीच्या परस्पर स्थितीमुळे घडतात, चंद्राच्या नाही.

म्हणून मग आपण अधिक मासाची निर्मिती करून हे त्रांगडे निस्तरून घेतले आहे. त्यामुळे आपले महिने आणि त्यांच्याशी निगडीत ऋतू आणि पर्यायाने येणारे सण स्थिर राहतात.

मुसलमानी काल गणनेत ही सोय नसल्याने त्यांचा रमजानचा महिना ( म्हणजे सगळेच महिने खरतर) सरकत सरकत हिवाळा ते कडक उन्हाळा असा प्रवास करतो.

आता दुसऱ्या प्रकारची काल गणना म्हणजे सौर वर्ष! सध्या सौर वर्षावर आधारलेल्या दोन कालदर्शिका प्रचलित आहेत.

१. ज्युलिअन कालदर्शिका आणि

२.ग्रेगरींयन कालदर्शिका

ह्या दोन्ही प्रकारच्या काल दर्शिका पाश्चात्य- ख्रिश्चन लोकांनी वापरत आणल्या. ग्रेगरींयन कालदर्शिका इंग्रजांनी १७५२ साली स्वीकारली त्या आधी ते जुलिअन कालादार्शिका वापरत होते . का? त्यांनी असे का केले? काय फरक आहे ह्या दोन प्रकारच्या कालदर्शिकांमध्ये? आता ह्यातला फरक काय आहे तो समजावून घेऊ .

पृथ्वी स्वत:भोवतीची प्रदक्षिणा २४ तासात पूर्ण करते. हा एक दिवस हे आपण जाणतो पण तिने एक प्रदक्षिणा पूर्ण केली हे आपण कसे ओळखणार ? सूर्याच्या स्थानावरून.

म्हणजे उदा. सूर्य अगदी माथ्यावर असताना दिवस सुरु केला तर परत जेव्हा तो बरोबर माथ्यावर येईल तेव्हा एक दिवस पूर्ण होईल. बरोबर? नाही…चूक, कारण जेव्हा असे होईल तेव्हा पृथ्वी ने स्वत: भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून ती (३६० अंशाच्या ) थोडी पुढे गेली असते कारण स्वत: भोवती फिरताना ती सूर्याभोवती ही फिरत असते. त्यामुळे सूर्य बरोबर परत माथ्यावर यायला तिला थोडा अजून वेळ लागतो. कारण पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते आणि लंब वर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून जवळ लंब वर्तुळाकाच्यारा कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होते.

थोडक्यात काय हा जास्तीचा कालावधी काही स्थिर नसतो. असो… दिवसाच्या वेळेतल्या ह्या फरकाचा आपल्या आताच्या विवेचनाशी संबंध नाही फक्त अवांतर पण महत्वाची माहिती म्हणून विषयांतराचा दोष पत्करून ती इथे दिली आहे.

समजा १ मार्च ला दुपारी १२.०० वाजता आपण दिवस मोजायला चालू केले तर बरोबर ३६५.२५ दिवसांनी २८ फेब्रुवारीला पृथ्वी त्याच ठिकाणी परत येईल. पण आपण वरचा ०.२५ दिवस न मोजता वर्ष ३६५ दिवसांनी पूर्ण झाले असे मानतो आणि हा जो पाव दिवसाचा जास्तीचा वेळ आहे तो आपण दर चार वर्षांनी फेब्रुवारीत एक दिवस जास्त वाढवून compensate करतो. त्याला लीप वर्ष म्हणतात. ही अगदी सर्वसाधारण माहिती आहे.

एखादे वर्ष लीप वर्ष आहे हे कसे ठरवायचे?

अगदी सोप्पे आहे. त्या वर्षाच्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जायला हवा उदा २०१६, २०१२ वगैरे हे सगळ आपल्याला महिती असते, पण खरी गम्मत आता पुढे आहे. आपण आता वर म्हटले की पृथ्वी ३६५.२५ दिवसात एक फेरी पूर्ण करते, पण ते खरे नाही खरा कालावधी आहे ३६५.२४२१८१.दिवस म्हणजे ०.२५ ला अगदी थोडा कमी कालावधी.

आता ह्याचा फरक लगेच जाणवत नाही पण जुलिअन कालदर्शिका सुरु झाल्यानंतर जवळपास १५०० वर्षांनी ह्याचा फरक जाणवू लागला होता. ख्रिश्चनान्चा इस्टर हा मोठा सण असतो.

त्यादिवशी वसंत ऋतू चालू होतो म्हणजे आकाशात सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे सरकू लागतो. जुलिअन कालदर्शिकेप्रमाणे ५ एप्रिलला हे होते, पण प्रत्यक्षात असे दिसले की सूर्याने विषुवृत्त आधीच ओलांडले आहे, ते पण २३ मार्च ला म्हणजे तब्बल ११ दिवस आधी.

ह्याला धार्मिक महत्व त्या काळी असल्याने हा घोळ कसा होतो ह्याच्यावर खूप विचार केला गेला आणि खगोलशास्त्रज्ञांना हे जाणवले की गेल्या साधारण १५०० वर्षात आपले वर्ष मोजणे थोडे थोडे पुढे पुढे सरकत गेल्याने हे घडले आहे. म्हणून त्यांनी अफलातून युक्ती शोधली.

दर चार वर्षांनी लीप वर्ष येते आणि १०० ला ४ ने पूर्ण भाग जातो, म्हणून प्रत्येक १००वे वर्ष हे पूर्वी लीप वर्ष असायचे. पण आता नवीन नियमानुसार कोणतेही १०० वे वर्ष जर ४०० ने पूर्ण भाग जाणारी संख्या असेल तर आणि तरच ते लीप वर्ष असेल नाहीतर नाही.

म्हणून १७००,१८००,१९०० ही लीप वर्षे नव्हती पण २००० हे लीप वर्ष होते २१०० लीप वर्ष असणार नाही. आता हा घोळ इथून पुढे निस्तरला गेला पण आधी जो ११ दिवसांची चूक आली होती त्याचे काय? म्हणून मग ख्रिश्चनांचा धर्म गुरु पोप ग्रेगरी ह्याने ४ ऑक्टोबर १५८२ ला ही चूक दुरुस्त करून घेतली आणि एक फर्मान काढून सांगितले की उद्या म्हणजे ५ ऑक्टोबरला ५ ऑक्टोबर न म्हणता १५ ऑक्टोबर म्हणण्यात यावे हो!.

आता जे देश पोपचे ऐकत म्हणजे स्पेन, पोर्तुगाल वगैरे त्यांनी ऐकले पण इंग्रज आधीच पोप पासून काडीमोड घेऊन लांब झाले होते (आठवा, आठव्या हेन्रीचे प्रताप) त्यांचे चर्च ऑफ इंग्लंड आणि आर्च बिशप ऑफ कॅनटरबरी काही ऐकायाल तयार नव्हते.

पण अखेरीस त्यांना ह्याचे महत्व कळले आणि त्यांनी १७५२ च्या सप्टेंबर मध्ये ही सुधारणा केली आणि ग्रेगोरियन कालदार्शिका स्वीकारली.ज्यामुळे जुलिअन आणि ग्रेगरियन कालदर्शिकेत हा ११ दिवसांचा फरक आढळून येतो त्याचे शास्त्रीय कारण आपण आता पर्यंत समजावून घेतले.

आता अख्ख्या होल वर्ल्ड ने जरी ही ग्रेगरियन कालदर्शिका स्वीकारली असली तरी जुनी जुलिअन कालदर्शिकच ग्राह्य मानणारे लोकही आहेत. आडमुठे लोक सगळ्याच समाजातून असतात.

जेरुसलेम, पोलंड, रशिया, सर्बिया मोन्तेनेग्रो इथली Orthodox church अजूनही जुनी जुलिअन कालदर्शिककाच वापरतात. त्यामुळे सगळे जग जेव्हा तारीख २२ मार्च २०१७ सांगत असते तेव्हा ह्यांची तारीख ९ मार्च २०१७ असते, (१७५२ पासून आजपर्यंत ११ दिवसांचा फरक आता १३ दिवसांचा झालाय… आहे कि नाही ह्यांच्या कर्मठपणाची कमाल!)

तर इथे फक्त (भारतीय) चंद्र वर्ष आणि सौर वर्ष ह्या कालगणनेतील फरक समजावून सांगितला आहे . आता ज्याकारणामुळे हा लेख लिहायचे सुचले त्याबद्दल थोडे लिहिणे अगदीच अप्रस्तुत होणार नाही.

श्रावण वद्य चतुर्दशी शालिवाहन शके १८६९ किंवा माघ शुक्ल अष्टमी शालिवाहन शके १८७१ ह्या दिवसांना भारतीयांच्या जीवनात काय महत्व आहे? असे विचारले तर त्याचे उत्तर देणे कुणाला पटकन जमेल असे वाटत नाही. पण हे दिवस फार महत्वाचे आहेत.

हे दिवस आहेत १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५०. ह्या दिवसांचे महत्व मी इथे काय विषद करून सांगणार! पण आपण आज इंग्रजी कॅलेंडर अंगिकारले आहे आणि ते फक्त आपणच नाही तर सगळ्या जगाने अंगीकारलेले आहे.

खुद्द शिवाजी महाराजांनी पंचांगात सुधारणा करण्यासाठी आणि योग्य कालगणना करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केलेले होते. त्यांनी देखिल सुधारित कालगणना सूर्य सिद्धांतानुसार केलेली आढळते. त्या तज्ञांनी ह्या निमित्ताने ‘करण कौस्तुभ’ ग्रंथ रचला.

ह्यावरून छत्रपती शिवरायांनीसुद्धा कालगणनेसाठी सूर्यसिद्धांताचा पुरस्कार केला हे स्पष्ट आहे. (संदर्भ: वेध महामानवाचा – श्रीनिवास सामंत).

shivaji-maharaj-marathipizza
www.pinterest.com
इंग्रजी कालगणनेने देखिल सूर्यसिद्धांताचाच पुरस्कार केला आहे. शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या, त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी कमीत कमी ह्याबाबतीत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रागतिक विचारसरणी अंगीकारायला हरकत नसावी.

हिंदूंचे सगळे सण, देव दैवतांचे जन्मदिवस तिथीने साजरी करायची प्रथा आहे हे खरे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला दैवती करण करायचे आहे काय?

छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर पुरुष होते हे खरेच पण दैवतीकरण करून आपण त्यांना आपले प्रेरणास्थान न मानता मर्मस्थान मानु लागलो आहोत. त्यांच्या चरित्राचे, कार्याचे मूल्यमापन, संशोधन आणि चिकित्सा करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

अशात त्यांच्या कार्याची महती आणि प्रासंगिकता सोडून देऊन जयंतीचा वाद घालत बसणे हे समाजाच्या दृष्टीने अजिबात हितावह नाही. तज्ञांच्या सहमतीने आणि शासनाने पूर्ण विचारांती १९ फेब्रु १६३० ही तारीख शिवजयंती म्हणून स्वीकारली आहे.

तिचा यथायोग्य मान आपण राखला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढायला, त्यांच्या चरित्रापासून स्फूर्ती घ्यायला कोणताही दिवस शुभ आणि योग्यच आहे की, त्यादिवशी शिव जयंती असो वा नसो…!

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *