पंचकर्माद्वारे शरीराचे शोधन आणि संरक्षण करणे शक्य* – *डॉ. डिंपल घुबडे मोटघरे*

लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. पंचकर्माद्वारे शरीराचे शोधन आणि संरक्षण करणे शक्य आहे. पंचकर्म चिकित्सेबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहे. समाजातील प्रचलित गैरसमज दूर करून सगळ्यांनी पंचकर्माचे मूलभूत ज्ञान घेणे अत्यावश्यक आहे. धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थ प्राप्तीचे साधन शरीर आहे म्हणून पंचकर्मासारखा आयुर्वेदिक प्रक्रियेचा अवलंब करून शरीर संरक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. डिम्पल घुबडे मोटघरे यांनी येथे केले. श्रीमती विमला देवी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि श्रीमती वसुधा झाडे नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती विमला देवी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल वांढरी, चंद्रपूर येथे ‘ पंचकर्म चिकित्सा मूलभूत ज्ञान ‘ या विषयावर आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संदेश गोजे होते.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूरच्या स्नेहल पाटील शेख प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. डिंपल घुबडे पुढे म्हणाल्या की, पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतो. शरीराच्या शुद्धीसाठी पंचकर्म हे अतिव उपयोगी आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.गोजे म्हणाले की, आजच्या या धावपळीच्या जीवनात स्वास्थ टिकून राहण्यासाठी आयुर्वेद व पंचकर्म हा राजमार्ग आहे. त्यांनी पंचकर्म विषयी सविस्तर माहिती देताना त्याद्वारे कोणत्या आजाराचे समूळ उपचार होतात हे ही स्पष्ट केले.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले.
सूत्रसंचालन विकास रोकडे यांनी केले तर आभार मृणाल थोडे यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here