वशीम रिजवी व फैयाजमामा

इस्लाम मधून सनातन धर्मात प्रवेश करून खळबळ उडवून देणारे वशीम रिजवी यांची धर्मांतराची बातमी चवीने देण्याचे काम सुरू आहे ..त्यांचा धर्मांतरोत्सव उत्तरप्रदेश निवडणुकी पार पडेपर्यंत असाच सुरू राहील असेच काहीसे वाटत आहे …इलेक्ट्रॉनिक्स मीडिया त्यांचे धर्मांतर विधी असे दाखवीत आहेत की काही दिवसातच रिजवी शंकराचार्यांच्या पंगतीला बसतील की काय ..हिंदूंच्या कुठल्या जातीत त्यांचा प्रवेश होईल हे सुद्धा आता स्पष्ट होणे गरजेचे आहे ..100 कोटी हिंदूंच्या देव्हाऱ्यात त्याला बसविणार काय..रिजवीचे धर्मांतर विधी बघताच मला फैयाज मामा आठवले ..त्यांना आम्ही भैयामामा म्हणायचो..कोण होते फैयाज ….तर
अमरावती – दर्यापूर मार्गावर जसापुर हे गाव लंकाबाई भडागे या माझ्या गर्भश्रीमंत आत्याचं ..तन ,मन , धनाची तिची श्रीमंती पंचक्रोशीत वाहत होती ..कळाशीची सोन्याची लंका जसापूरच्या श्रीमंत बाजीराव पाटील भडांगे यांना दिली ..गोरी गोमटी अतिशय देखणी , धार्मिक वृत्ती अशा एक ना अनेक सद्गुणांनी ओतप्रोत लंकाआईला कमी वयात वैधव्य आले ..रामकृष्ण नावाचा एकुलता एक मुलगा ..मुलगा लहानच होता ..एवढा मोठा कारभार सांभाळावा कसा ..तिच्या समोर पेच उभा झाला …तिने आपली अडचण माहेरी म्हणजे काळाशीत मांडली ..तिला भक्कम आधार हवा होता ..संकटकाळात बाहेर काढणारा मार्ग म्हणून मग माझे बाबा उत्तमराव पाटील गावंडे पुढे आले ..उंचपुरे धीप्पाड देहयष्टीचे माझे बाबा बहिणीचा कारभार जसापूरात इमाने इतबारे पाहू लागले ..आम्हा सर्व भावंडांचे जन्म मग जसापूरचे .लंकाआईला आम्ही आत्या कधी म्हटलेच नाही ..आमचे आतेभाऊ रामकृष्ण पाटील तिला आई नाहीतर मा म्हणायचे. त्यामुळे आम्ही अवघे तिला आई हणत होतो ..आतेभाऊ रामकृष्ण पाटील यांना आम्ही अण्णा म्हणून हाक मारायचो ..आमच्यापेक्ष्या वयाने ते मोठे होते.. त्यांची मुले माझ्या वयाची ..अण्णा हा शब्द वऱ्हाडात प्रचलित आहे ..वास्तविक अण्णा मूळ शब्द तेलगू आहे ..आंध्रत अण्णा म्हणजे मोठा भाऊ ..तेलगू शब्द मराठीत कसा तर निजामशाहीत उत्तर दडलं आहे ..वऱ्हाडात निजामाचा प्रभाव होता ..वऱ्हाडी भाषेत तेलगू ,उर्दूचे अनेक शब्द सापडतील ..ऋणमोचन यात्रेला आम्ही लहान असतांना नित्यनेमाने जात होतो ..गाडगेमहाराजांच्या ऋणातून मुक्त करणारे ऋणमोचन अशी व्याख्या या तीर्थ क्षेत्राची होणे गरजेचे होते ..पण तसे झाले नाही ..माझी आई रूनमोचनला सत्यनारायण कथा करायची ..मस्त पैकी खमंग वांग्याची भाजी , शिरा अन रोडगे सोबत साजूक तूप व घट्ट वरण ..हा मेनू समुद्र मंथनातून बाहेर पडला …अमृता सोबत असे वाटत होते ….अमृताची गोडी या मेनूला ..रूनमोचनला अण्णाचा सुद्धा टेंट असायचा ..लंकाआई व अण्णांचे संपूर्ण कुटूंब यात्रेत येत ..सोबत म्हातारे मुसलमान असलेले फैयाजमामा फकीर आवर्जून ..ते कुठून आले ..कोण होते माहीत नाही पण भडंगे व गावंडे कुटुंबियांसोबत 100 वर्षांपासून जोडले गेले असावेत..अण्णा व माझ्या .कुटुंबाचे घटकच होते ..चेहऱ्यावर एखाद्या संत महात्म्या समान तेज , कंबरे भोवती शुभ्र लुंगी , अंगावर शुभ्र पंचा असा त्यांचा वेष राहत असे..पायात मात्र खडाऊ हिंदू संत घालतात तसे ..नाव मात्र फैयाज ..तेंव्हा फैयाज हा उच्चार अवघड वाटत असल्यामुळे आम्ही त्यांना फैयाजचे भैयामामा केले .फैयाज मामा रूनमोचनला महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून परत येत तेंव्हा विलक्षण तेजस्वी दिसायचे ..आम्ही लहान मोठी मंडळी त्यांच्या पाया पडायचो ..आमचे पाहून इतरही त्यांच्या चरणी लोटांगण घालायचे ..जसापूरला अण्णा कडे आले की लंकाआई देव्हारा त्यांच्याकडे सुपूर्द करायची ..त्यांची देवपूजा पाहण्यासारखी व वाखाणण्यासारखी होती . पंचक्रोशीत ना मुसलमानांनी कधी त्यांचा विरोध केला ना आम्ही मुसलमान म्हणून त्यांच्याकडे कधी पाहिले ..ते एक फकीर होते ..कबिरासमान वाटायचे.अतिशय शांततेने देवपूजा आटोपली की ते सूर्याकडे पाहून पाणी द्यायचे ..काही दिवस जसापूर तर काही दिवस काळाशीत मुक्काम ठोकून मग कुठल्या तीर्थक्षेत्री निघून जात होते ..वसीम रिजवीचे फाईव्ह स्टार धर्मांतर पाहून मला फैयाजमामाची आठवण झाली ..ना त्यांना आमची ऍलर्जी होती ना आम्हाला त्यांची ..ते आमच्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते..आता वसीम रिजवी सनातन झालेत ..धर्मात दाखल होताच ते संघाची भाषा बोलत आहेत ..म्हणतात हिंदू संकट मे है ..हिंदूंना निष्काळजीपणा सोडावा लागेल ..स्वरक्षणासाठी हिंदूंनो तयार राहा म्हणत आहेत ..वसीमचे जितेंद्र नारायण झाले..आमचे भैयामामा अखेरपर्यंत फैयाजच राहिले .. वशीम हा 12वी पास पद पैशाने वेडा झालेला माणूस ..तो आधी सौदीत एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता ..त्यापूर्वी वसीम जपान व अमेरिकेत गेला होता ..नंतर भारतात परतला व राजकारण्यांच्या मदतीने ववफ बोर्डाचा सदस्य झाला ..मग शिया ववफ बोर्डाचा चेअरमन झाला …सनातन्यांनी त्याची शोभायात्रा काढण्याचे मिशन सुरू केले ..उत्तर प्रदेशच्या निवडणुकी आटोपल्या अन भाजपचे पानिपत झाले तर हाच वशीम औषधीला दिसणार नाही हे तेवढेच खरे ..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *