चंद्रपूरमध्ये ‘लंग्स बिल बोर्ड ‘

By 👉Shankar Tadas

*चंद्रपूर ची हवा अत्यंत धोकादायक

वातावरण फाउंडेशन मुंबई, इको-प्रो चंद्रपुर, चंद्रपूर महानगरपालिका, वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्य, आणि चंद्रपूर कर नागरिक यांच्या वतीने चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोर चंद्रपूरातील प्रदूषणाला समजावून सांगण्यासाठी लंग्स बिल बोर्ड ची स्थापना करण्यात आली. आज चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री राजेश मोहिते यांचे हस्ते या बिल बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले.

चंद्रपूर मधील हवा अत्यंत प्रदूषित आहे, 0 ते 50 एअर क्वलिटी इंडेक्स मनुष्यासाठी चांगला समजला जातो, परंतु या बिल बोर्डवर चंद्रपूर मधील एअर क्वलिटी इंडेक्स हा 210 ते 225 च्या दरम्यान दर्शविला जात होता, याचाच अर्थ हवेमधील धुळीच्या कणांचे प्रमाण चारपट जास्त होते. यामुळे चंद्रपूरची हवा ही अत्यंत धोकादायक या स्थितीत पोचलेली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्यावतीने हे उपकरण प्रमाणित करण्यात आलेले आहे, सावरकर चौकात हे बिल बोर्ड उपकरण लावता क्षणीच चंद्रपूर मधील हवेच्या गुणवत्ता सूचकांक 230 च्या जवळपास होता, त्याच वेळी इंटरनेटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व व इतर संस्थांचा हाच गुणवत्ता सूचकांक 130 च्या आसपास होता, या दोघांतही शंभर गुणांचा फरक यासाठीच दिसतो करण रामनगर पोलीस स्टेशन समोरील हे उपकरण मनुष्याच्या श्वास घेण्याच्या उंचीवर म्हणजे साधारणतः पाच ते सात फूट उंचीवर लावण्यात आलेले आहे, तर इतर शासकीय उपकरणे 30 ते 40 फूट उंचीवर विविध इमारतींवर लावण्यात आलेली आहेत. यावरून दोन्ही उपकरणे बरोबर असले तरी मनुष्य उंचीवर श्वास घेतोय चंद्रपूर मधील ती हवा कशी घातक आहे, हे चटकन समजते.

मायक्रोंस म्हणजे काय ?
एअर क्वलिटी इंडेक्स मध्ये प्रमुख्याने हवेतील धुळीचे प्रमाण 2.5 मायक्रोग्रॅम आणि 10 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर ला किती उपस्थित आहे हे मोजले जाते. 1 मायक्रोमीटर म्हणजेच एक मीटर चा 10 लाख वा भाग. 1 इंच मध्ये साधारणतः 25400 मायक्रोमीटरस असतात. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास मनुष्याच्या केसा पेक्षाही 30 पट लहान धुळीचे कण वातावरणात असतात. मी हे वाक्य लिहिताना जेव्हा शेवट करतो, तेव्हा जो फुल स्टॉप देतोय, त्या फुल स्टॉप मध्ये 10000 धुळीचे कण राहू शकतात, इतके लहान धुळीचे कण म्हणजेच पीएम 2.5 होत.

पीएम 2.5 चा मनुष्य जीवनावर कसा परिणाम होतो ?
धुळीचे कण अत्यंत लहान असल्यामुळेच श्वासनलिकेच्या माध्यमातून फुफुसांत जाऊन पोचतात. यांचा प्रवास फुफ्फुसांतुन रक्तापर्यंत होतो, ते रक्तात मिसळतात. आणि यामुळे चंद्रपूर सारख्या प्रदूषित शहरात विविध श्वसनाच्या रोगांची वाढ होते. एखादा मनुष्य सतत अशा धुळीच्या वातावरणात राहात असेल तर त्याचे डोळे, नाक, घसा, खवखवं करतो. वारंवार शिंका येणे, खोकला येणे, नाकातून द्रव वाहत राहणे, श्वासाची लांबी कमी होणे या सुरुवातीच्या समस्या समस्या सुरू होतात. परंतु काही वर्ष मनुष्य अशा वातावरणात राहिले तर त्याच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते, तो जास्त जोराने फुंकू शकत नाही, श्वासाचा वेग वाढतो, दमा तयार होतो, फुफुसाचा कॅन्सर होत असतो, हृदय विकार आणि स्ट्रोक मोठ्या प्रमाणात वाढतात. मनुष्याचे रक्त जाड होते, म्हणूनही धुळीचे कण जास्त असलेल्या शहरांत, हृदयविकाराच्या पेशंट की संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त असते. लहान मुलं आणि म्हातारे यांच्यावर धुळीच्या कणांचा सर्वात जास्त परिणाम होतो. चंद्रपूर ची हवा परवानगी असलेल्या हवेच्या तुलनेत तब्बल चार ते पाच पट जास्त प्रदूषित आहे. यामुळे येथील लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळेच चंद्रपूर शहरात चामडी चे, डोळ्यांचे, नाक आणि घसा श्वसन नलिका, इत्यादींचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *