जासुसी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी महत्वाची : खासदार बाळू धानोरकर

खासदार बाळू धानोरकर व शिवसेना खासदार लोकसभाध्यक्षांना भेटले

चंद्रपूर : भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा मौलिक अधिकार दिला असताना पेगासस स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील ठराविक महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठीत करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व शिवसेनेच्या संसदीय गटाने आज लोकसभाध्यक्षांकडे केली आहे.

‘पेगासस’ जासुसी प्रकरणामुळे दोन दिवसांपासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज त्यामुळे स्थगित होत आहे. शिवसेनेच्या संसदीय दलाने मंगळवारी दुपारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन जेपीसी गठीत करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचे लोकसभा नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बिरला यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गजाजन किर्तीकर, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, कृपाल तुमाने, धैर्यशील माने आणि सदाशिव लोखंडे याशिवाय कॉँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, इस्त्रायलच्या पेगासस स्वॉफ्टवेयरच्या माध्यमातून जगभरातील ५० हजारांवर लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. त्यात भारतातील किमान ४० महत्वाच्या लोकांचे फोन टॅप करण्यात आले आहेत. त्यात विरोधी पक्ष नेते, मंत्री, संपादक, पत्रकार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उद्योगपती, सुरक्षा संघटनेतील विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला घेरले. विरोधकांकडून करण्यात आलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सातत्याने तहकूब करण्यात आले.

काय आहे ‘पेगासस’?

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पेगासस सॉफ्टवेअर चा वापर करून भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि अन्य महत्वाच्या लोकांचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील महत्त्वाचे सुमारे ५० हजार मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा आहे. ‘पेगासस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

शिवसेना आणि खा. बाळू धानोरकर!

शिवसेनेच्या शिष्टमंडळात आज कॉँग्रेसचे खा. बाळू धानोरकर होते. ते सातत्याने शिवसेनेच्या खासदारांसोबत वावरत असतात. लोकसभाध्यक्षांना शिवसेनेच्या लेटरहेडवर निवेदन देण्यात आले. यासंदर्भात धानोरकर यांना विचारले असता ते म्हणाले, शिष्टमंडळ कोणाचे आहे हे महत्वाचे नाही. विषय अत्यंत गंभीर आहे. कॉँग्रेसही जासुसी प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून सरकारला जाब विचारत आहे. तसेही कॉँग्रेस आणि शिवसेना ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे.

धानोरकर आमचेच- खा. राऊत

खा. बाळू धानोरकर हे कॉँग्रेसचे खासदार असले तरी त्यांच्या धमण्यांमध्ये शिवसेनेचे रक्त आहे. सरकारकडून न्यायाची अपेक्षा असते तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. त्यात धानोरकर सोबत असतातच. राज्यात आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे शिष्टमंडळ कोणाचे हा विषय नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खा. विनायक राऊत यांनी दिली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *