लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा लोकनेता अन् संवेदनशील माणूस…*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

सुधीर मुनगंटीवार म्हणजे सुधीरभाऊ किंवा फक्त ‘भाऊ’ हे एक नाव नाही, तर ‘भाऊ’ आहेत लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाचे धनी. राजकारणात वावरत असताना राजकारणाच्या नियमांना कुणीही अपवाद नाही, तसे ‘भाऊ’पण नाहीत. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन, लोकांची कामे करण्याची हातोटी त्यांच्यातील संवेदनशील माणसाचा परिचय देते. भाऊंची काम करण्याची पद्धतच निराळी. ‘स्ट्रॉंग फॉलोअप’ हा भाऊंचा विशेष गुण. उल्लेखनीय म्हणजे भाऊंना कॉल केला आणि त्यांच्याशी बोलणे झाले नाही, असे कधी होतच नाही. दोन तासांनी, चार तासांनी नाहीतर अगदी रात्री १० वाजता तरी भाऊंचा कॉलबॅक येतो आणि त्यांच्याशी बोलणे होते. प्रवासातील वेळेचा सदुपयोग ते मिस्ड कॉल अटेंड करण्यासाठी करतात. अगदी अर्थमंत्री असतानाही भाऊंनी ही गोष्ट पाळली. त्यांच्यामध्ये असलेल्या अनेक गुणांपैकी हासुद्धा एक महत्वाचा गुण आहे की, ज्याने त्यांना लोकांच्या मनांवर अधिराज्य करणारा लोकनेता बनवले.

गेले ३० वर्ष सुधीरभाऊ राजकारणात आहेत. सत्तेवर दीर्घकाळ राहिल्यानंतर अनेक जण वरच्या हवेत जातात, त्यांना मग्रुरी येते. असे नेते मग सामान्यांना भाव देत नाहीत. पण भाऊंची तऱ्हाच निराळी. सध्या आणि पूर्वीही आमदार असताना ते जास्तीत जास्त काळ मतदारसंघातच राहात. मंत्री असतानाही एक-दोन दिवस तरी ते मतदारसंघातच असत. यावरून आपल्या जबाबदाऱ्यांप्रति ते किती जागरूक आहेत, याची कल्पना यावी. या माणसाच्या व्यक्तिमत्त्वात एक असे आकर्षण आहे, की एकदा भेटलेला व्यक्ती आयुष्यभरासाठी त्यांचा होऊन जातो. राजकारणात वावरताना हे प्रत्येकालाच जमते असे नाही. ‘पोटात एक आणि ओठांवर दुसरे’, असे भाऊंचे काम नाही. त्यामुळे आज लोकांना भाऊंबद्दल आपुलकी आहे. मतदारसंघात नवनवीन प्रकल्प आणण्याचा ध्यास त्यांना लागलेला असतो. सतत नवनवीन संकल्पना मांडणे आणि त्या पूर्णत्वास नेणे, यासाठी ते धडपडत असतात. दिलेर स्वभाव, राजकीय नेता आणि संवेदनशील माणूस असा परफेक्ट मिलाफ भाऊंच्या व्यक्तिमत्वात झालेला आहे.

ग्रामसेवकापासून ते मंत्रालयाच्या मुख्य सचिवापर्यंत प्रत्येकाकडे पत्र आणि कामाची विनंती जाणार. त्यानंतर त्यांची यंत्रणा त्या कामाचा ‘तगडा’ पाठपुरावा करणार. ते काम होवो अथवा न होवो, संबंधित व्यक्तीलाही तसे पत्र पाठविले जाते आणि त्यातली अडचण आणि काम केव्हा होईल, याची माहिती दिली जाते. दिलेला शब्द पाळणे हा भाऊंचा स्वभाव… चंद्रपूरकरांना हादरवून सोडणारी एक घटना शहरातील बाबुपेठ परिसरात घडली होती. वनश्री अशोक आंबटकर या १७ वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून निर्घृण खून करण्‍यात आला होता. याप्रकरणी मृतक वनश्रीच्‍या कुटुंबीयांना सांत्‍वनपर भेट देताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री निधीतुन अर्थसाहाय्य मंजूर करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. सदर आश्‍वासनाची पूर्तता नुकतीच झाली. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतक वनश्रीच्‍या कुटुंबीयांना विशेष बाब म्‍हणून २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे.

लोकशाहीच्या राजकारणात विकास साधायला व जनतेची कामे करायला सत्ता हवीच. मात्र त्याचबरोबर समाजाप्रति असलेली तळमळ फार महत्वाची आहे. सत्ता असताना कामे वेगाने होतात, परंतु लोकाभिमुख काम करणाऱ्या लोकनेत्यांना सत्ता नसली तरी विशेष फरक पडत नाही. असे नेते सत्तेतून पायउतार झाल्यावरही सदैव लोकसेवेत. लोकांच्या संपर्कात असतात. सन १९९५ पासून पासून सुधीर मुनगंटीवार विधानसभेचे सदस्य आहे. १९९५ ते १९९९ भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. १९९९ पासून सलग १५ वर्षे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. त्यादरम्यान सुधीरभाऊ आमदार होते. सत्ता नसताना विविध संसदीय आयुधांचा वापर करत राज्यशासनाला अनेक निर्णय घेण्यास त्यांनी भाग पाडले. केवळ मतदारसंघाचा विकासच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा मार्ग त्यांनी सुकर केला.

यात महत्त्वाचे महात्मा जोतिबा फुले यांच्या वंशजांच्या मागण्या. मातंग समाजासाठी आयोग नेमणे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला नाव देण्याचा प्रश्न मार्गी लावणे, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न
सोडविण्यासाठी राज्यसरकारला आमदार मुनगंटीवार यांनी भाग पाडले. हे तत्कालीन सत्ताधारी आजही मान्य करतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी सत्तेत नसतानाही सोडविले व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व
आजही करत आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आपण दिनक्रम बघितला तर अत्यंत व्यस्त असतो. सामान्यांना न्याय देण्यासाठी ते कायम अग्रणी असतात. त्यांचा जनसंपर्क बघितला तर हे आपणास ते लक्षात येईल. ज्येष्ठ नेते असूनही तरुण लोकप्रतिनिधींना लाजवेल, असा त्यांचा झंझावात आणि लोकसंवाद केवळ आणि केवळ थक्क करणारा आहे. सत्ता गेल्यावरही सुधीर मुनगंटीवार हे शांत बसले नाहीत, तर जनतेच्या महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या पूर्ण होई पर्यंत पाठपुरावा करत असतात. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, विभागांचे सचिव, अनेक अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेत समस्या समजावून सांगत त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड सुरूच असते.

विकासाच्या सर्व धारणा या औद्योगिक क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र सुधीरभाऊ हे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र विचार करत असतात. या भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस, धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार नेहमीच दिसून आला. कोरोनाच्या संपूर्ण विपरीत काळात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वतःच्या प्रजाहितदक्ष कार्यपद्धतीचा परिचय दिला. तसेच तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेत रुजू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे हें नेतृत्व चंद्रपूरकरांना बघायला मिळाले. याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रलंबित प्रश्न सकारात्मकरीत्या मार्गी यासाठी, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विनय यांच्यासोबत बैठक घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न त्यांना समजावून सांगितला.

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे कनेक्शन थकबाकी असल्याने कापण्याचे प्रकरण असो की, चंद्रपूर व मूल येथील बस स्थानकाचे बांधकाम लवकर पूर्ण करणे यासाठी वारंवार बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचित करत अशा नागरी समस्यांवर ते सतत लक्ष देताना दिसतात. नागरी सुविधांच्या अपूर्णतेमुळे समाज जीवनात अपघात होतात. असाच एक अपघात म्हणजे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे दुर्गापूर येथील श्री रमेश लष्करे यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना मुख्यमंत्री निधीतून ६ लक्ष रुपये आमदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत धनादेश मिळवून दिला. केमतूकुम विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन लवकरच गुन्हेगाराला शिक्षा व्हावी व तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, यासाठीही सुधीर मुनगंटीवार यांनी तत्परतेने पुढाकार घेतला.

चंद्रपूर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या विविध खनिजांच्या साहाय्याने लघू व मध्यम उद्योग विकसित करावे यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्याचवेळी विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या घटकांचा शासकीय पातळीवर योग्य बंदोबस्त ते करतात. भद्रावती कर्नाटक एम्टा कंपनीविरोधात शंखनाद करत, मागण्या मान्य झाल्या नाही तर कंपनीला फटाके लावणार, असा सूतोवाच केले होते. त्याची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी तत्काळ घेतली. आता यावर लवकरच यावर तोडगा निघणार आहे व यासंबंधीच्या न्याय मागण्या पूर्ण होणार आहेत.

याबरोबरच बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला दहा कोटी रुपये मंजूर करण्यात सुधीरभाऊंची मोठी भूमिका आहे. औद्योगिक दृष्ट्य़ा महत्त्वाच्या असलेल्या बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहराचा समावेश ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पात करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे. हे सर्व कार्य वेगाने सुरू असतानाच पक्ष संघटनेच्या बाबतीत ते सजग असतात विविध संघटनात्मक अभियानांत कार्यकर्त्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवत संघटना बळकट राहील, याची काळजी ते घेत असतात.

आज महाराष्ट्राच्या सत्तेत आमदार सुधीर मुनगंटीवार नाहीत. तरीही विकासाचा वेग खंडित होणार नाही, याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, राज्यपाल व राज्यातील विविध खात्याचे मंत्री यांच्याशी समन्वय साधून असतात. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच स्थान मिळाले, ही खरी त्यांच्या संघटन कार्याची पावती म्हणावी लागेल. विकासासाठी सत्ता हवी हे मान्य असले तरी सत्तेत नसताना आपला आक्रमकपणा त्याला प्रामाणिकतेची व सचोटीची जोड असली तर कुणीही तुमच्या विकास प्रक्रियेला थांबवू शकत, नाही याचे उत्तमोत्तम उदाहरण म्हणजे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार.

तुम्हाला आज तुमच्या शाळेतील मित्र तुमच्या संपर्कात आहेत का, तुम्ही लोक भेटता का, असा प्रश्‍न विचारल्यावर जास्तीत जास्त लोकांचे उत्तर नकारार्थी येईल. पण सतत मित्र जोडणे, मैत्री टिकवणे, हा सुधीर भाऊंचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांचे शाळकरी मित्र आजही त्यांच्याशी जुळून आहेत. मित्र जोडण्याचा आणि मैत्री जपण्याचा स्वभाव त्यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात उपयोगी पडला आणि। त्यांना लोकांच्या मनांवर अधिराज्य करणारा लोकनेता बनविले.

– *देवराव भोंगळे*
*भाजपा,जिल्हाध्यक्ष चंद्रपूर*

 

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *