चंद्रपूर जिल्हात वेकोलीकडून पर्यावरणाची राखरांगोळी ; कोट्यावधी रुपयाचा महाघोटाळा झाल्याचा आमदार सुभाष धोटेंचा आरोप…* *⭕भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याची लक्ष्यवेधी सूचनेद्वारे राज्य विधानमंडळाकड़े आमदार सुभाष धोटे यांची मागणी.*

 

लोकदर्शन 👉 मोहन.भारती

राजुरा :– पर्यावरण संरक्षण ही आमची जबाबदारी आहे, आम्ही कामगार व नागरीकांच्या सुरक्षेला तसेच प्रदुषण मुक्त वातावरणाला प्रथम प्राधान्य देतो हे ठिकठिकाणी फलक- पोस्टर लावून वेकोली प्रशासन दर्शवित असते मात्र वास्तविक परिस्थिती काहीसे वेगळेच आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील वेकोलीच्या ४ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिपत्याखालील चंद्रपूर, माजरी, ताडाळी, बल्लारपूर क्षेत्रांच्या अंतर्गत खाण परिसरात एकुण १०, ७४, ४३५ झाडांवर एकुण रु. १८,४३,४५,८२० रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा वेकोलीने केला आहे. मात्र प्रत्यक्षात पर्यावरण संरक्षणासाठी झाडे न लावताच कोट्यावधींच्या बिलांची उचल ठेका कंपनीने वेकोली अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून केली असल्याचा आरोप आ. सुभाष धोटे यांनी केला आहे. चंद्रपूरच्या जिल्ह्यातील या ४ उपक्षेत्रातील वृक्षलागवड व संवर्धनाचा ठेका मध्यप्रदेश राज्यातील मध्य प्रदेश राज्य वन विकास निगम लिमिटेड छिंदवाडा आणि भोपाळ या मध्यप्रदेश सरकार च्या उपकृत कंपनीकडे देण्यात आला असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात वेकोलीकडून पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून वायु व जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भ्रष्ट वेकोली अधिकाऱ्यांच्या प्रतापाची व या महाभ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधीद्वारे राज्य विधिमंडळाच्या चालू हिवाळी अधिवेशनात सरकारकडे केली आहे.
या ठेका कंपनीच्या माध्यमातून चंद्रपूर वेकोली प्रशासनाने विविध प्रकारची झाडे लावली असून यात फळझाडे, जांभूळ, चिंच, सीताफळ, बेल, आंबा, औषधी वनस्पती, निम, करंज, हराभरा, आवडा, अर्जुन शिकाकाई, कुसुम, महुआ, टिंबर झाड- सागवान, सीवन, सिसो, काला सिरस, सफेद सिरस, बांबू, पेंटाफार्म, बाभुळ, अमलतास, गुलमोहर, सप्तपर्णी, गावालिया, विपुल, पाम ट्री इत्यादी झाडे लावल्याचा दावा केलेला आहे मात्र प्रत्यक्षात यातील एकही वृक्ष दिसून येत नाही.
चंद्रपूर वेकोलीच्या या चारही उपक्षेत्रात एकही झाड शोधून सुध्दा सापडत नाही. या परिसरात माझे सहकारी कामगार प्रतिनिधि विजय ठाकरे यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत ही बाब उघड़ केली आणि परिसरातील नागरिक – शेतकरी यांनी सत्यता पुढे आणली त्यांनाच सोबत घेऊन आपण स्वतः पाहणी केली असता एकही झाड मौक्यावर आढळून आले नाही. ही पुर्ण झाडे केवळ कागदावर असून या संपूर्ण प्रकरणाची वेकोली वणी नार्थ – माजरी वेकोली – वणी ताडाली – चंद्रपूर वेकोली – बल्लारपुर वेकोली चे महाप्रबंधक व खान पर्यावरण विभागीय कर्मचारी आणि ठेकेदार कंपनी मध्य प्रदेश राज्य वन विकास निगम छिंदवाड़ा यांची कसुन चौकशी केली तर फार मोठा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राज्य शासनाने याची गंभीर दखल घेऊन सदर प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण एजेंसी कडून चौकशी करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्य हिवाळी अधिवेशन नागपुर येथे लक्षवेधी सूचने द्वारे केली असल्याची माहिती दिली आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *