स्वतःचेच शिल्प साकारणारे जीजी, अर्थात आटपाडीचे पापामियाँ खाटीक.* सादिक खाटीक आटपाडी

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

 

मला बोला – चालायला यायला लागल्या पासून *जीजी* या दोन शब्दांनी माझ्या चोपन्नी पर्यत मोठं गारूड घातल. ईश्वर, अल्ला , देव ,विधाता यांच्या अस्तित्वाची पदोपदी जाणीव व्हावी असे वागले – जगलेले व्यक्तीमत्व अर्थात जीजी . गरीबी म्हणजे काय, ती कशी विदारक असते, गरीबीचे चटके, वेदना, किती भयानक असतात . आणि त्या भोगत, गरीबीच्या महाभयानक आगीतून तावून सुलाखून निघालेल्या या आत्म्याने, त्याचे जग सुंदर बनविलेच तथापी अनेक कुटूंबाचा आधार बनण्याची भूमिका पार पाडली . ४ बहिणी १ भाऊ, आई – वडिल आणि पराकोटीच्या गरीबीत माझ्या जीजीचा अर्थात माझ्या वडिलांचा – पापामियाँ आब्बास खाटीक यांचा जन्म झालेला . चार चौघासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या जीजीच्या परिवाराला अनंत अडचणी, यातनांना तोंड द्यावे लागले . भल्या पहाटे शेजा – पाजारच्या पाच – दहा घराचे दळण दळून देण्यापासून सुरु होणारी या परिवाराची दिनचर्या अगदी उशीरापर्यत हमालीतून काही मिळते का ? हे शोधत विसावयाची . जगण्यासाठी वडिल, आई, काबाडकष्ट करायचे तथापि असह्य बनणारे जगणे, सुसह्य व्हावे म्हणून ही लहानगी भावंडे घरच्या जात्यावर दुसऱ्याच्या दळणाचे पीठ करताना स्वतः च्या जीवनाचेच गीत गायची . दोन वेळचे पोटभर अन्न मिळेल याची शाश्वती नसलेला या परिवाराचा प्रत्येक जण राबायचा . कुणी किराणा दुकानात, कुणी शेता शिवारात, कुणी सुत कातण्यासाठी खादी भांडारात, तर कुणी शेजार्‍या पाजार्‍याची मुले – गुरे ढोरं राखण्यात खपायचा. भाकरीच्या चंद्राने प्रसंगी यांना पावलो पावली आग बरसणाऱ्या यातनांचा सुर्यच दाखवला . दुसऱ्यांनी वापरून दिलेल्या कपड्यांवर ईद – उत्सव साजरा करणाऱ्या या परिवाराने अतोनात कष्टाने आपली दुनिया सावरली . मोजून वांगी शिजविल्यावर दोन तीन भाकरी संपे पर्यत वाटणीला आलेले एक वांगे ढकलून ढकलून ढकल वांग्यासारखे कण कण कुरतडणाऱ्याना, सणादिवशीच दुसऱ्या कडून आलेले गोडधोड किंवा पाव – अर्धा किलो आणलेले मटन, प्रत्येक घासाचे मोल जाणवून द्यायचे . थोडेसे कळायला समजायला लागलेल्या जीजी नावच्या या आत्म्याने वयाच्या १० व्या वर्षापासून घेतलेला अपार कष्टाचा वसा ७२ वर्षाच्या अथक राबण्यानंतर वयाच्या ८२ वर्षाच्या चिरनिद्रेच्या शांतीनेच विसावत सोडला . तीन बटनी घळघळीत अंगरखा, नाडीची घोळदार विजार, पाच पंचवीस खिशांचे जाडजुड बनियन, डोक्याला टोपी, हे सर्व मांजार पाटी बॅन्डचे असायचे .पायात गावठी माठाच्या ठीगळ लावलेल्या चपला, गळ्यात सतत असणारा टॉवेल, दिवसातून अनेक वेळा घासली जाणाऱ्या तपकीरीची डाव्या हातातील पुडी . हीच कळतीपासून मरेपर्यन ओळख बनलेल्या जीजीने पश्चिम महाराष्ट्रातील जत्रा, खेत्रा, उरुस, उत्सव, बाजार यामध्ये स्वतः चा वेगळा ठसा उमटविला होता. सणा सुदीलाही या पेहरावात बदल न केलेल्या माझ्या बापाने, लग्नात सासरकडून त्याला घातलेला कोट – पॅट – बुटाचा पेहराव लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जो बांधून ठेवला , तो आमच्या चाळीशी नंतर चिंध्या बोतऱ्याच्या स्थितीतल्या या सर्व सोपस्कराला आईने उकीरडा दाखविला . वृद्ध आई वडिल यांचे उत्तरार्धातील संगोपन, भाऊ बहीणींची लग्ने, स्वतः चे लग्न, छपराच्या जागी पत्र्याचे घर बांधून, तीन ठिकाणी खरेदी केलेल्या जागा, एकर दोन जमीन विकत घेत, अशी जगरहाटीची कामे करीत हे श्रमकरी जीजी सतत राबतानाच दिसायचे. तरुणाईत व्यापार व्यवसायात उतरलेल्या जीजीने, नंतर त्यांची संपूर्ण दुनियाच बदलुन टाकली . पानाचंद यांच्या विट्याहून प्रवाशी घेऊन आटपाडीला येणाऱ्या खाजगी प्रवाशी गाड्यातील प्रवाशांच्या सामानाच्या हमाली बरोबर अनेक कामांनी जीजीने आपल्या जीवनाला आकार दिला. माझी माँ – आई, माझ्या वडिलांना हाक मारताना “अहो या अर्थाने, *”अजी “,* *”सुने क्या जी ,* अशी हाक मारायची . लहानपणी तीच हाक माझ्या कानावर जीजी अशी ऐकू यायची. तेच शब्द वडिलांना उच्चारत मी बडा झालो . माझ्या मागच्यांनीही माझीच री ओढल्याने शेजारी पाजार्‍याबरोबर पै – पाहुणे असे हजारोंचे जीजी बनलेले *माझे भाग्य* मरे पर्यत जीजीच बनून अंताला गेले . भल्या पहाटे उठून बाजारला जाणारे जीजी, बीना अन्न पाण्याचे दुपारपर्यत बाजार धुंडायचे . घरी आल्यावरच्या पोटपुजेनंतर सुरु होणारा कष्टाचा प्रवास रात्री उशीरा कातड्यांना मीठ लावण्यानंतरच थांबायचा . कापण्यासाठी आणलेल्या जनावरांचे चारा पाणी, दारी असणाऱ्या नोकर चाकरांचे संगोपन, मल – मुत्र, लेंड्या, चारवट, कचऱ्याची दुर लावावी लागणारी विल्हेवाट , कापलेल्या मटनाची विक्री, गिहाईकांची हांजी हांजी करताना , प्रसंगी ग्राहकाकडून होणारे अपमान, फुकट अथवा उधारीच्या गोंडस नावाखाली होणारी पिळवणूक, प्रसंगीची दादागिरी या सर्वांतून माझे जीजी, टांगलेले बोकडाचे मांस विकत होते की शैक्षणीक सामाजीक,आर्थिक दृष्ट्या स्वतःला उलटे टांगून स्वतः चे जीवन हळू हळू संपवत होते . हेच मला सतत सतवायचे .
२५ – ३० वर्षे सरपंच असणाऱ्या करगणीच्या आण्णासाहेब पत्की या ब्रम्हवृदांला माझे जीजी अंतरीच्या ओढीने भावायचे आणि तितकीच वर्षे सरपंच असलेल्या खरसुंडीच्या सीतारामबापू गुरव – पुजारी यांनाही ते आपलेच वाटायचे . करगणी खरसुंडीतल्या बाजार, यात्रेतल्या जीजीच्या दुकानदारीने सहज पन्नाशी पार केली होती . आय ३३३ या क्रमांकाने १९७२ ला माझ्या घरात बसविलेली पीठाची गिरणी, ती विकेपर्यत म्हणजे १९८७ पर्यत श्री . नारायण रंगनाथ देशपांडे या नावानेच होती . येणारे प्रत्येक बील याच नावचे असायचे . प्रारंभापासून विकेपर्यत नारायणराव देशपांडे आण्णा यांनी पाहीजे त्या ठिकाणी सह्या देऊन गिरणीची १५ वर्षे साजरी केली होती. आमच्याशी असलेला जिव्हाळा दाखवून दिला . चहाची अपेक्षा नसणाऱ्या आण्णासाहेब पत्की, सितारामबापू पुजारी, नारायणराव देशपांडे वगैरे अशा मान्यवर असामींना माझे जीजी आपले वाटायचे . तालुक्याचे नेते बाबासाहेब देशमुख यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून माझे वडिल तालुकाभर ओळखले जायचे . जात पात धर्मा पलीकडची निस्पृह वाटचाल करताना माझे जीजी, सर्वांना आपलेच वाटायचे . प्रत्येक सण उत्सवात हिरीरीने भाग घेणाऱ्या माझ्या जीजीने, *पापाभाई* या नावाने मोठी ओळख निर्माण केली . स्वसमाजाच्या चार – आठ आण्याच्या वर्गणीसाठी, जीजीच्या लहानपणी अनेक वेळा त्यांच्या परिवाराला समाजातून बहिष्कृत व्हावे लागायचे . शिवीगाळ, अपमान सहन करायला लागायचा . आणि ज्यांच्याकडून अशा शिक्षा भेटल्या, त्या परिवाराच्या पुढच्या पीढीना मोठा आधार देण्याचे काम माझ्या जीजीने सर्व विसरून केले . स्वतः ला मिळणार्‍या अनेक महत्वाच्या जागा , अनेक घरदांज पैसे वाल्यांना नाममात्र पैशात मिळवून देऊन त्यांच्या कडून झालेल्या अपमानाची परतफेड सन्मानाने करताना माझे जीजी इन्सान बनले . वेळ प्रसंगी या धुरीणांवर आलेल्या संकटावेळी माझे जीजी, हे संकट पळवून लावण्यात यशस्वी झाले . स्वत :च्या घरात, लहानाच्या मोठ्या करीत सांभाळलेल्या, परधर्मीय मुलींची लग्ने जीजींनी लावून दिलीच . तथापी अनेक गरीबांच्या लग्नात जीजीने केलेली सर्व प्रकारची मदत अनेक नवरा नवरीचे जीवन सार्थकी लावणारी ठरली . प्रत्येकाच्या अंत्ययात्रेत त्यांच्या घरची व्यक्ती बनून अंत्यविधी साठी जीजीची चाललेली धडपड *पापा* नावाला सार्थकी ठरवायची . निरागस बाळापासून वडिल आणि वडिलधार्‍यापर्यत आपुलकी , आस्थेचा शब्द हा *पापा* असतो . त्याचाच प्रत्यय आपल्या कृतीतून माझे जीजी द्यायचे . लहानग्या पासून थोरांपर्यत आजाऱ्या पासून निराधार सर्वापर्यन्त भरभक्कम आधार माझे जीजीच असायचे. अनेक प्राण्याना जीवापाड जपणाऱ्या माझ्या घरात एकादा दुसरा अपवाद वगळता दोन चार परकी माणसे रोजच जेवायला असायची . मागायला आलेल्या प्रत्येकाला भाकरी, भाजी, कपडे, लत्ता, पैसे द्यावे तर ते माझ्याच घरानेच . गरजूना मदत करावी, हे सर्व धर्मीय तत्वज्ञान सांगते . माझ्या घरी हे दान धर्माचे सोपस्कर रोजच पार पाडले जाते आहे . हे केवळ अन केवळ जीजी नावच्या आमच्या अवलिया मुळेच . ईद च्या शिरखुर्म्याची पातेली च्या पातेली रिकामे करणारे माझे घर, अनेकांना मांसाहार देताना ५० – १०० किलो मटनाची सहज व्यवस्था करीत असे . मोहरमची फकीरी मागताना किंवा रिवायत म्हणताना अथवा सर्वांसमवेत डफड्यावर नाचताना, धुला धुला चा गजर करताना, हे जीजी नावाचे गारूड शेकडोंचा ठाव घेणारे भारदस्त व्यक्तीमत्व भासायचे .
जीजी च्या जीवनात आलेल्या अनेक संकटावर मात करण्यासाठी, जीजीचा चांगुलपणाच नेहमी उपयोगी आला . आटपाडीच्या तलावाचे निर्माण चालु होते . त्याकाळी माझे जीजी सायकलवरून दोन तीन बोकडे कापून नेऊन तिथल्या मजुर – मुकादम वगैरेंना विकायचे . बरेच महिने हा सिलसिला चालु होता . त्यातून तिथे काम करणाऱ्या सर्वांशी जीजी ची आपूलकी, ओळख निर्माण झाली होती . एके दिवशी तेथील कामगारांच्यात मोठी मारामारी झाली . त्यातून अनेक जण तुरुंगात गेले . अनेकांना जामीनही मिळाला . मात्र विजापूरच्या *नारायणराव* नामक मुकादमाला मात्र कोणीच जामीन व्हायला पुढे आले नाही . काही दिवसानंतर या नारायणराव यांनी त्यांचा हा निरोप माझ्या वडिलांपर्यत पोहोचविला . वडिलांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता तात्काळ जामीन होत नारायणराव ना सोडवले . नंतर तलावाचे काम पूर्ण करून हे सर्व जण आप आपल्या गावी जाऊन विसरीही पडले . दोन दशकानंतर विजापूरच्या माझ्या आत्याचे सासरे – आणि नवरा यांनी काढलेल्या सावकारी कर्जाने त्यांच्या वाड्यावर लिलावाची नामुष्की ओढवली होती . ४०० रुपये मुळ कर्ज असलेले व्याजासह २५०० रुपयापर्यत पोहोचले होते . आत्याच्या घरच्यांची वाडा सोडविण्याची ऐपत राहीली नव्हती . या वस्तुस्थितीच्या आटपाडीस आलेल्या पत्राने सगळेजण चिंतातूर, हवालदिल बनले होते . जवळचे दोनशे रुपये घेऊन या संकटाला सामोरे जाण्यासाठी विजापूरला गेलेल्या जीजीना, पैशाअभावी काही मार्गच सुचत नव्हता . विजापुरातल्या तीन दिवसाच्या वास्तव्यानंतर आटपाडी तलावावरील मुकादम नारायणराव विजापूरकर यांची जीजीना आठवण झाली, त्क्षणी त्यांनी आपल्या डायरीतून पत्ता शोधून काढून नारायणराव यांचे घर गाठले . नारायण रेस्टॉरंट नावच्या हॉटेलच्या गल्यावरील मुलीला आटपाडीहून पापा खाटीक आला आहे असा निरोप देण्यास सांगीतला . निरोप पोहोचताच आंघोळ करीत असलेले नारायणराव उघड्या अंगाने धोतर नेसत बाहेर आले . वडिलांच्या हातात हात देत स्वागत करत, त्यांना नाष्टा करण्यास सांगून, कपडे पुर्ण परिधान करून पुन्हा बाहेर आले . आणि माझ्या जीजीना विजापूरला येण्याचे कारण विचारले . बहिणीच्या घरावर लिलाव आल्याचे आणि परवाच्या दिवशी तो असल्याचे जीजीनी नारायणराव यांना सांगून लिलाव काढणाऱ्या सावकारांची नावे सांगीतली . सावकारांची नावे ऐकून संतप्त झालेल्या नारायणरावांनी त्या दोन्ही सावकार भावांना तातडीने बोलावून आणण्यासाठी माणसे धाडली . अर्ध्या तासानंतर नारायणरावांपुढे येवून उभे राहीलेल्या सावकारांच्या अंगावर चप्पल फेकून, हरामखोराने माझ्या घरावर, मामाच्या घरावर लिलाव आणला की रे ! म्हणत शिव्यांचा भडिमार केला . कोणालाच काही समजेना . गांगरलेले सावकार नारायणरावांना , आम्ही काय केले ते फोडून सांगा, मामा आमची चुक असेल तर आम्ही पाय धरतो अशी विनवणी केल्यावर नारायणराव यांनी, महिबूब रतनपारखे च्या वाड्यावर लिलाव कोणी आणला आहे . हे विचारताच, ते दोघे सावकार म्हणाले, आम्हीच !. त्यावर रतनपारखेचा वाडा माझ्या बहिणीचा वाडा आहे . आणि हरामखोरांनो, तुम्ही तर माझे सख्ख्ये भाचे आहात, तुम्ही माझ्याच घरावर लिलाव आणलात. असे नारायणराव म्हणताच त्या सावकार भाच्यानी, आम्ही चुकलो मामा, म्हणत नारायणरावांचे पाय धरले . आणि व्याज एक पै न आकारता मुळ रकमेतही ५० रुपये कमी घेऊन हा लिलाव रद्द करण्यास, आणि तो वाडा पुन्हा रतनपारखेंच्या नावे करण्यास भाग पाडून नारायणराव यांनी जीजी नावच्या माणसातल्या माणसाची माणूसकी वाढीस लावली होती . असाच दुर्धर लिलावाचा प्रसंग माझ्या आजोळच्या पंढरपुरच्या वाड्यावरही आला होता . वडिलांच्या आत्यांच्या घरात, माझीही आत्या माझ्याच सख्या मामांना दिली होती . माझी आई या सात मामांत एकुलती एक . हा ही लिलाव जीजींच्या चांगूलपणाच्या वागण्यातून मुळ रकमेवर रोखून, वाडा राखला गेला होता . जीजीच्या आपुलकीच्या संबधातून आटपाडीचे त्या काळचे सरपंच नाना पाटील यांची सडेतोड भूमिका या कामी कारणी आली होती .
माझ्या, माझ्या भावाच्या परिवारावर, आमच्या मुलाबाळांवर, सुना लेकी जावयांवर अपार प्रेम करणाऱ्या जीजींचा, माझी मुलगी रुक्सारजहाँ जीव की प्राण होती . आणि माझी मुलगी आजोबांवर माझ्या जीजीवर अपार प्रेम करायची . रुसलेल्या रुक्सारला जीजीच मनवायचे . आणि रागावून उपाशी झोपलेल्या जीजींना उठवून दोन घास चारण्यात माझी रुक्सारच कामी यायची . पाचही नातवाला प्रत्येकी २० रुपये देणारे जीजी रुक्सार साठी १०० रुपये देवून वेगळा न्याय करायचे . तथापि सर्वच नातवंडे जीव की प्राण असलेल्या जीजींना आटपाडीतल्या विधवा बहिणीचा परिवार, लहानग्या भावाचा परिवार नेहमीच आपलाच भासायचा . आप्त स्वकियासह जोडलेल्या शेकडो वर निर्व्याज प्रेम करणारे जीजी, ३ वर्षापूर्वी मोहरमच्या सातवीला अर्थात शनिवार दि . ७ सप्टेंबर २०१९ ला त्यांना आंघोळ घालत असताना माझ्याशी बोलत बोलत गेले . शाहीर जयंत जाधव च्या डोळ्यासमोर च्या मृत्यूनंतर माझ्या जीजीचा माझ्या समोर बोलत बोलत झालेला मृत्यू भयानक वेदना देवून गेला . उभे आयुष्यभर कष्ट करीत, श्रमालाही लाजायला भाग पाडणाऱ्या या माझ्या दैवताने मायेने, प्रेमाने जोडलेल्या सर्व धर्मीय शेंकडो माणसांची प्रचंड दौलत आमच्यासाठी त्यांनी मागे ठेवली आहे . माझ्या जीजीचे बालपण, त्यावेळी आम्ही या जगात नसल्याने पाहू शकलो नाही . तथापि ३ वर्षापूर्वी जन्माला आलेल्या मुजम्मील अर्थात अली आणि ९ महिन्यापूर्वी या जगात आलेल्या झीशान नावाच्या भावाच्या व माझ्या नातवाच्या रुपाने, माझे जीजीच पुन्हा आमच्यात आल्याचा भास होतो आहे . या चिमुकल्यांचे निरागस हास्य, सततचे प्रसन्न भाव, कोणाकडेही जाण्याच्या, स्वच्छंदी हसण्याच्या, तासनतास मांडीवर – खांद्यावर बसण्याच्या, अली आणि झीशानच्या या स्थितीत मला माझे जीजीच दिसताहेत . अली – झीशानच्या येण्याने पुन्हा आमचे घर आनंदाने ओसंडून वहात आहे . घर भरून जीजीचाच वावर असल्याचे अली – झीशानचे अस्तित्व दाखवून देत आहे . पुनर्जन्म आहे का नाही हे मला बघायचे नाही, अजमावयाचे नाही . अली, झीशानच, माझे जीजी आहेत, जीजीच आमचे अली, झीशान आहे . हे विधात्या तुझे करोडो करोडो आभार . आमचे जीजी पुन्हा आमच्यात पाठविल्या बद्दल .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *