जीवनाच्या प्रारंभी अक्षर मात्रांचा श्रीगणेशा करून देणारे पहिलीचे गुरुजी यांचा जागतिक पुस्तक दिनी केला यथोचित सन्मान

लोकदर्शन 👉 राहुल खरात


*⭕पलूस च्या शिवाई प्रबोधन वाचनालयाचे संस्थापक हिम्मतराव मलमे यांचा अनोखा उपक्रम*

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.या दिवशी पुस्तकांचे महत्त्व, वाचनाचे महत्त्व, लिखाणाचे महत्त्व याबाबत विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम होत असतात.याच जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र संचलित शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चे मुख्य प्रवर्तक तथा संघटनेचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे यांनी त्यांना इयत्ता पहिली ला शिकवणारे शिक्षक,जीवनाच्या प्रारंभी अक्षर मात्रांचे ज्ञान करून देऊन आदर्श वळण लावणारे जि.प.शाळा शिवाजीनगर चे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भानुदास माळी गुरुजी यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्या वाचनालयात निमंत्रीत करून शाल,श्रीफळ,पुस्तक भेट देऊन यथोचित सन्मान केला.आपल्या वयाच्या ७७ व्या वर्षी चाळीस वर्षापूर्वी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्याने आपल्या जीवनात प्रगती करुन,शिक्षकी पेशा पत्करुन आपल्या घरी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एक हजार पेक्षा जास्त पुस्तकांचे संकलन करुन वाचकांना ज्ञानाचे दालन खुले करुन देतोय हे पाहून गुरुजी भारावून गेले.याप्रसंगी अत्यंत गरिब परिस्थितीला सामोरे जाऊन हिम्मतने केलेल्या प्रगतीबद्दल गुरुजींनी प्रसंशोद्गार काढले. प्रारंभी भारतीय संविधानासह काही निवडक पुस्तकांचे पूजन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भानुदास माळी गुरुजी, नगरसेवक दिलीपराव जाधव,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व व वाचन चळवळ यावर वैभवराज शिरतोडे,मारुती शिरतोडे,नगरसेवक दिलीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात वाचनालयाचा लाभ घेणाऱ्या संदेश वाघाटे,बाल वाचक विभास गळंगे,महिला वाचक सौ.कल्पना मलमे आदी वाचकांचा प्रातिनिधीक स्वरूपात पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. ह्या अनोख्या कार्यक्रमास पलूस नगरपरिषदेचे सन्माननीय नगरसेवक दिलीपराव जाधव, सम्राट टेक्नो इन्स्टिट्यूटचे मोरे सर,आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे सोशल मीडिया प्रमुख महेश मदने,संघटक पिरगोंडा पाटोळे, प्रतिक पाटोळे,धर्मेंद्र पाटील,विघ्नेश जाधव,वाचक विभास गळंगे,वरदराज मलमे,नैतिक मदने,कृष्णा केसकर , सौ कल्पना मलमे सह वाचक व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिम्मतराव मलमे यांनी केले तर आभार महेश मदने यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *