जलविद्युतनिर्मिती म्हणजे काय ?

लोकदर्शन 👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

 

पाणी उंचावरून नेहमीच समुद्रपातळीकडे झेपावत असते. मग हा वेग पातळीनुसार वाढतो वा मंदावतो. जेव्हा ही पातळी खूप उंच असेल तेव्हा या वाहणाऱ्या पाण्याच्या जोराचा वापर करून जलविद्युतनिर्मिती केली जाते. उंच डोंगरमाथ्यावर असलेले धरणाचे पाणी प्रचंड आकाराच्या पाइपमधून बांधलेल्या जलविद्युतगृहातील जनित्रावर सोडले जाते. या पाण्याच्या ताकदीने ही अवाढव्य जनित्रे फिरतात व विद्युतनिर्मिती होते. संपूर्ण भारतात अशा स्वरूपाचे प्रकल्प एकूण विजेच्या ६ टक्के वीज निर्माण करून आपली गरज भागवतात. कोयना प्रकल्प हा त्यातीलच एक आहे. कोयनानगर येथे धरण बांधून तेथील पाणी पाईपमधून वीस किमी दूरवरील पोफळी येथे वाहून नेले जाते. या दरम्यान असलेल्या जवळजवळ सरळ उताराचा परिणाम म्हणून या पाण्याचा वेग व ताकद गुरुत्वाकर्षणाने वाढते व त्यापासून खूपच मोठय़ा प्रमाणात वीज निर्माण होते. मुळशी येथे धरण बांधून तेथील पाणी खोपोली येथेपर्यंत असेच खोलवर वाहून आणले जाते व तेथील विद्युतनिर्मिती केंद्र चालवले जाते.

पाण्याच्या साठ्याची पातळी व जनित्राची पातळी यात फरक जितका जास्त तितकी वीजनिर्मिती अधिक करता येऊ शकते. यात आणखीही एक बाब ध्यानात ठेवावी लागते. वीज ही बाराही महिने लागणारी गोष्ट आहे. तिचा वापरपण रोज दिवसा जास्त व रात्री कमी होत जातो. पाण्याचा साठा मात्र फक्त पावसाळ्यातच होणार असतो. पाण्याचा सर्वच साठा वापरण्यायुक्त नसतो तर धरणात साठत जाणारा गाळ लक्षात घेऊन पाणी घेण्याची जागा ठरवावी लागते. यामुळे जलविद्युतनिर्मितीचे गणित फार थोड्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते. अन्य ठिकाणी तिचा वापर पूरक म्हणून वा साखळीयंत्रणेचा (Grid) भाग म्हणूनच करावा लागतो.
पूरक वापर म्हणून, साखळीयंत्रणेचा भाग म्हणून जेव्हा जलविद्युत वापरली जाते, तेव्हा जगात काही ठिकाणी एक गमतीदार योजना वापरली जाते. पाण्याच्या साठय़ातून जनित्रावर कोसळणारे पाणी पुन्हा साठवले जाते. रात्रीच्या वेळी जेव्हा अन्यत्र विजेचा वापर अगदी कमी असतो, तेव्हा इतरत्र निर्माण झालेली, पण न वापरली जाणारी वीज वापरून हेच पाणी याच जनित्रांचा पंपासारखे उलटा वापर करून मूळ साठ्यात पाठवले जाते. वीज साठवून ठेवता येणे अवघड असल्याने रात्रीच्या वेळी नको असलेली, वाया जाणारी, स्वस्त उपलब्ध असणारी वीज वापरण्याची ही पद्धत आहे. यासाठी फार मोठे तांत्रिक बदल करण्याची गरज पडत नाही, तर फक्त योग्य वेळी व योग्य तितका वेळ यंत्रणेच्या वीजपुरवठा नियंत्रणाची दिशा बदलण्याची गरज असते.
याखेरीज खूप उंचावरून पाण्याचा वा नदीचा प्रवाह लांबवर वाहत जाणार असेल, तर विविध पातळ्यांवर जलविद्युतनिर्मिती केंद्रे उभारता येतात. भाक्रानांगल येथे किंवा सरदार सरोवर या प्रकल्पात ही योजना राबवली जाईल. टेनेसी व्हॅली योजना या पद्धतीतच काम करते. लांबवरचा विचार करता जलविद्युत ही स्वस्त पडते. देखभाल कमी लागते. पण सुरुवातीचा भांडवली खर्च खूपच मोठा असतो. जलविद्युत केंद्र उभारताना बांधाव्या लागणाऱ्या धरणांमुळे विस्थापितांची संख्या नेहमीच मोठी असते. त्यामुळे त्याला समाजाचा विरोध होतोच; पण औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे होणारे वातावरणातील प्रदूषण आसपासच्या गावांवर विपरीत परिणाम करत असतेच. त्यातून निर्माण होणारी प्रचंड प्रमाणावरची राख, काजळी, धुर यांची विल्हेवाट लावणे हाही एक फार मोठा प्रश्न म्हणून काही वर्षांनी उभा राहतो. दूरगामी विचार करून कशाला सामोरे जायचे हे ठरवणे सोपे मात्र नक्कीच नाही.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*’सृष्टी विज्ञानगाथा’ या पुस्तकातून*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *