…आणि अमेरिकेने अख्खं जहाजच गायब केलं, डोकं भंडावून सोडणारं रहस्य!*

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

युद्ध म्हटलं, की लढाऊ वाहनं आली, त्यावर होणारे हल्ले आले, आणि युद्धात सहभागी राष्ट्रांनी एकमेकांची विमानं, रणगाडे, युद्धनौका वगैरे गोष्टी नष्ट करणं सुद्धा ओघाने आलं. मात्र, एखाद्या राष्ट्राने युद्धाचा भाग म्हणून स्वतःचीच युद्धनौका गायब केल्याचं तुम्ही ऐकलंय का?

होय, हे असं घडलंय. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र मानल्या जाणाऱ्या अमेरिकेने हा असा प्रताप केलाय. तोदेखील साध्यासुध्या युद्धात नव्हे, तर आजवर जगात झालेल्या सर्वात भयंकर युद्धात; म्हणजेच दुसऱ्या महायुद्धात!

आता तुम्ही म्हणाल, स्वतःचीच युद्धनौका गायब करण्याचा प्रकार त्यांनी केलाय, म्हणजे तो त्यांच्याच बचावासाठी असणार. हा अंदाज तुम्ही बांधत असाल, तर तो अगदीच बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणाल, यात नवल ते काय?

पण मंडळी, ही फारच आश्चर्याची बाब ठरते, कारण हे जहाज ज्यापद्धतीने गायब झालं, जिथे सापडलं आणि या सगळ्या प्रकाराचे जे परिणाम पाहायला मिळाले ते भयानक होते. एवढंच नाही.

संपूर्ण जहाजच गायब झालेलं असणारी ही घटना, आज ७० वर्षांचा काळ लोटला तरीही एक न उलगडलेलं कोडंच ठरते. चला तर मग जाणून घेऊया, या अनोख्या प्रयोगाबद्दल!

फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट नक्की होता तरी काय?
अमेरिकेने जे जहाज गायब केलं, ते जहाज हिटलरच्या, म्हणजेच नाझी सैन्याच्या रडारवर होतं, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. अमेरिकेचं हे जहाज उध्वस्त करण्याचं नाझी सैन्याने ठरवलं होतं. त्यांच्यापासून जहाजाचा बचाव करण्यासाठी काही ना काही करणं आवश्यक होतं.

खरंतर त्यावेळी सगळेच देश, आपापली युद्धसामग्री जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. तब्बल १२०० टन वजन असणारी USS Eldridge ही अमेरिकेची युद्धनौका त्यावेळी फिलाडेल्फिया डॉकयार्डला होती.

हा विचित्र प्रयोग फिलाडेल्फिया इथे करण्यात आलेला असल्यानेच, त्याला फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. ही युद्धनौका गायब करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगाचा वापर करण्यात आला.

विजेपासून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून हे जहाज रडारवरून गायब करण्याचा चंग अमेरिकन सैन्याने बांधला होता. हे जहाज दिसेनासं व्हावं यासाठी चक्क प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोल टेस्ला याची मदत घेण्यात आली होती.

असा रंगला प्रयोग…
USS Eldridge च्या चहूबाजूंनी विजेचा प्रवाह निर्माण करण्यात आला. या विजेच्या प्रवाहाचा विद्युतदाब फारच मोठा आणि भयानक होता. ४४० व्होल्टचा झटका, हा शब्दप्रयोग तर आपण अनेकदा ऐकतो, मात्र फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या विद्युतप्रवाहाचा दाब ३० लाख व्होल्ट इतका महाभयानक होता.

या प्रवाहाचा अपेक्षित फायदा झाला. त्यातून निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम म्हणून ते जहाज रडारवर दिसेनासं झालं.

जहाजाच्या आजूबाजूने हिरव्या रंगाचा धूर दिसू लागला होता. रडारवरून गायब झालेलं हे जहाज हळूहळू दिसेनासं होऊ लागलं. अमेरिकेचा प्रयोग यशस्वी झाला आणि USS Eldridge अदृश्य झालं.

जहाज गायब तर झालं पण…
USS Eldridge गायब करायचा प्रयोग यशस्वी झाला होता, हे जहाज, त्यातील सैनिकांच्या अख्ख्या तुकडीसह अदृश्य झालं होतं. पण अमेरिकन सैन्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. याचं कारण होतं, जहाज परत आणण्याचा अयशस्वी प्रयत्न!

हे जहाज परत आणण्याचा प्रयत्न अमेरिकन सैन्याने निकोल टेस्ला यांच्या मदतीनेच केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. अदृश्य झालेलं जहाज पुन्हा दिसण्याची चिन्हच दिसली नाहीत, तेव्हा मात्र सैन्य बावचळलं.

तेवढ्यात त्यांना माहिती मिळाली, की गायब झालेलं USS Eldridge फिलाडेल्फिया डॉकयार्डपासून तब्बल ३०० किमी दूर सापडलं आहे. यूएस नेव्हीकडून मिळालेली ही माहिती फक्त अमेरिकन सैन्यच नव्हे, तर टेस्लाला सुद्धा बुचकळ्यात पाडणारं ठरलं.

जहाजाने केलं टाइम ट्रॅव्हल?
आम्ही आधीच सांगितलं त्यानुसार, ‘जहाज गायब कसं झालं?’, ‘नेमकं काय घडलं होतं?’, हे आजही न उलगडलेलं कोडं आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरत नाही. मात्र याविषयी काही अंदाज बांधले जातात.

USS Eldridge फिलाडेल्फिया इथून गायब होऊन, व्हर्जिनियाला पोचलं होतं. ही अशी घटना घडलेला टेस्ला यांचा प्रयोग फारच भयानक मानला जातो.

असं म्हटलं जातं, की हे जहाज टाइम ट्रॅव्हल करून १९४३ मधून थेट १९८३ च्या कालखंडात पोचलं होतं. जहाजात असणाऱ्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला.

सुदैवाने जे मेले नाहीत, त्यांचं सुद्धा मानसिक संतुलन बिघडलं होतं. शास्त्रज्ञांनी या घटनेला टेलिपोर्टेशन म्हणजेच टाइम ट्रॅव्हलचं नाव दिलं.

अशी झाली या थियरीची सुरुवात…
असं म्हणतात, की एका शास्त्रज्ञाला १९५५ साली एक गुप्त पात्र मिळालं. या पत्रात या प्रयोगाविषयी आणि त्याच्या भयंकर परिणामांविषयी माहिती मिळाली. त्यामुळेच हे सत्य जगासमोर आलं असं मानलं जातं.

मात्र अमेरिकन सैन्याने असा प्रयोग झाला होता, ही गोष्ट कधीही मान्य केलेली नाही. या प्रयोगाविषयीचे १०० टक्के ठोस पुरावे अस्तित्वात नसल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे.

*त्यामुळेच आजही काही मंडळी ‘फिलाडेल्फिया एक्सपरिमेंट’ ही एक दंतकथा असल्याचं सांगतात. तर काहींच्या मतप्रवाहानुसार, हा प्रयोग म्हणजे एक आजही न सुटलेलं, गूढ कोडं आहे.*

*विचारवेध – साहेबराव माने. पुणे. 9028261973*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *