रोज तेच तेच काम करुन कंटाळा येतो, थकल्यासारखे वाटते? मेंदूला तरतरी देण्याचा 1 सोपा उपाय.

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

रोज उठायचं, आवरायचं, घरातली कामं करायची आणि घाईघाईत ऑफीसला पोहोचायचं…दिवसभर ऑफीसचं काम करुन पुन्हा धावत घरी यायचं आणि घरातली कामं…यामुळे तुमचे शरीर मेंदू पार थकून गेला असेल तर एक सोपा उपाय… रोज तेच तेच काम करुन कंटाळा.

ठराविक प्रमाणात ताण घेणे आपल्यासाठी फायद्याचे असते मात्र हा ताण जास्त झाला तर मात्र शरीर आणि मनासाठी तो घातक ठरतो.
मेंदू ताजातवाना राहण्यासाठी, मेंदू रिचार्ज करायचा असेल तर मेंदूला थोडासा ताण देण्याची गरज असते.
सकाळी झोपेतून उठलो की घरातली कामं, स्वयंपाक, ऑफीस…परत संध्याकाळी घरी आले की स्वयंपाक, आवराआवरी आणि झोपणे. रोज उठून तेच रुटीन. वीकेंडची वाट पाहावी तर एक किंवा दोन दिवसांच्या सुट्टीतही असंख्य कामांची यादी तयारच असतेॅ. सतत वेगवेगळ्या प्रकारचे ताण, तेच तेच काम करुन आपल्याला फार कंटाळा येऊन जातो. एकवेळ अशी येते की काहीच करावेसे वाटत नाही आणि शरीर, मन, मेंदू सगळे पूर्ण थकल्यासारखे वाटते. लांब कुठेतरी जास्त दिवसांसाठी ट्रीपला जावे असे आपल्याला वाटते. पण सुट्ट्या, इतर गोष्टी मॅनेज होत नसल्याने तेही राहून जाते. पण मन आणि मेंदू तरतरीत असेल तर आपण फ्रेश राहतो आणि रोजचा दिवस कुढत जगण्यापेक्षा आपण समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घेऊ शकतो.

आता आपला मेंदू रिचार्ज करण्याचीअशी कोणती पद्धत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. या सवयीचा आपण नियमितपणे अवलंब केला तर आपल्य़ाला फ्रेश वाटेलच पण सतत येणारा कंटाळा दूर होण्यास मदत होईल. ‘द योगा इन्स्टीट्यूट’च्या डॉ. हंसाजी राजेंद्र यासाठी एक मस्त उपाय सांगत आहेत. हा उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास तुमचा दिवसभरातील बराचसा ताण कमी होण्यास तर मदत होईलच पण तुमची कामे झटपट झाल्याने तुमच्या हातात आरामासाठी थोडा जास्तीचा वेळ राहील आणि त्या वेळात आपण आपल्या आवडीची एखादी गोष्ट अगदी सहज करु शकू. आवडीची गोष्ट केल्याने आपला थकवा कदाचित दूर पळून जाईल आणि मेंदू आपोआपच तरतरीत होण्यास मदत होईल.

कोणतही काम ठराविक वेळेत पूर्ण करा.

आपण दिवसभरात असंख्य गोष्टी करत असतो. या सगळ्या गोष्टी ठराविक वेळेत पूर्ण केल्या तर आपल्याला दिवसाचा वेळ नक्कीच पुरु शकतो. मग ते आंघोळ करणे असो किंवा खाणे, झोपणे, स्वयंपाक करणे यांपैकी अगदी काहीही असो. ठरलेले काम ठराविक वेळेच्या आत पूर्ण केले तर आपला बराच वेळ वाचू शकतो आणि त्यामुळे आपल्याला इतर गोष्टींचा ताण न येता त्या गोष्टी अगदी सहज पूर्ण होतात. प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ ठरवा आणि त्याच वेळात ती गोष्ट पूर्ण होईल याकडे आवर्जून लक्ष द्या.

असे केल्याने काय होईल ?

आंघोळीसाठी ५ ते ७ मिनीटे, खाण्यासाठी १५ ते २० मिनीटे, ऑफीसच्या ठरलेल्या कामांसाठी सुरुवातीचे २ तास अशी प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित केल्याने आपण स्वत:लाच ठराविक वेळेत एखादे काम पूर्ण करण्याचे चॅलेंज देतो. आव्हान देणे हे मेंदूसाठी एकप्रकारचे खाद्य असते. एखादे काम तुम्ही काही दिवस ठरलेल्या वेळेत म्हणजे दोन तासांत पूर्ण करत असाल तर काही दिवसांनी हेच काम तुम्ही १.५ तासात करायला हवे. त्यामुळे आपण स्वत:ला आव्हान देतो आणि आपला मेंदू तरतरीत राहण्यास नकळत मदत होते.
मेंदूसाठी एनर्जी बूस्टींग महत्त्वाचे…
सुरुवातीला तुम्हाला २ तासाचे काम १.५ तासांत पूर्ण करण्यात अडचणी येतील. पण हळूहळू सवयीने तुम्हाला हे करणे जमेल. यामुळे मेंदू नकळत ताजातवाना राहण्यास मदत होईल. म्हणून मेंदू रिचार्ज करायचा असेल तर मेंदूला थोडासा ताण देण्याची गरज असते. असे करणे आपल्यासाठी एनर्जी बूस्टर म्हणून काम करेल. हा थोडासा ताण आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला विकास हवा असेल तर थोडा ताण घ्यावा लागेल. भविष्यात तो निश्चितपणे तुमच्या फायद्याचा ठरेल. ठराविक प्रमाणात ताण घेणे आपल्यासाठी फायद्याचे असते मात्र हा ताण जास्त झाला तर मात्र शरीर आणि मनासाठी तो घातक ठरतो.

संकलन – साहेबराव माने.
पुणे 9028261973ु

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *