एकोना कोळसा खदान आंदोलन प्रकरण ; मनसे कार्यकर्त्यांसह ४१ व्यक्तिंवर गुन्हे दाखल

⭕*काम द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या – बेरोजगारांची मागणी*

लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : तालुक्यातील एकोना वेकोली खदानीत काम करणा-या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्याचे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात त्यांच्यासह इतर मनसे कार्यकर्ते व ग्रामस्थ मिळून ४१ व्यक्तिंवर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. व नंतर त्यांना कलम १४९ जा.फौ. अन्वये सूचना पत्र देऊन जबाब नोंदवून सोडण्यातही आले. गरीब, गरजू स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी न्यायोचित मार्गाने आंदोलन करूनही कंपनीने दबाव तंत्राचा वापर करून आंदोलनकर्त्यांवर जाणूनबुजून खोट्या केसेस दाखल केल्या असल्याचे सांगत कंपनी प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीच्या विरोधात संघर्ष करण्याचा इशारा रोडे यांनी दिला आहे.
एकोना वेकोली कंपनीत काम मिळावे, यासाठी स्थानिक एकोना, मार्डा येथील बेरोजगारांची भटकंती सुरू असताना त्यांना डावलून कंपनीने हेतुपुरस्सर परप्रांतीय लोकांना रोजगार दिला आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्यात यावा, यासाठी मनसेच्या वतीने गरीब, गरजूंच्या न्यायोचित मागणीसाठी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी, वेकोली प्रबंधक, लोकप्रतिनिधी, प्रशासनाला गेल्या तीन महिन्यापासून पाठपुरावा केला गेला. या संदर्भात ३० नोव्हेंबर २०२१ ला कंपनीला दुसरे निवेदन देण्यात आले, तरी देखील परप्रांतीयांना कामावर ठेवून स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात आले. अखेर या अन्यायकारक निर्णयाविरोधात स्थानिक भूमिपुत्रांचा संयम सुटला. बेरोजगार, प्रकल्पग्रस्त गावक-यांनी मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात २ फेब्रुवारी २२ रोजी महालक्ष्मी कंपनी समोर आंदोलन पुकारत ठिय्या मांडला होता. या आंदोलनात मनसे पदाधिका-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी मनसे नेते मनदीप रोडे यांनी सांगितले की, मनसे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी संघर्ष करीत असते. कंपनीने स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार न दिल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असेही ते म्हणाले. यावेळी शेतमजूर व गावकरी यांचे प्रतिनिधी, वेकोली अधिकारी के. एल. पी. एम. आय. एल. एल. पी. जे. व्ही. ( महालक्ष्मी ) चे मॅनेजर यांची आंदोलकांच्या मागणी संदर्भात उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे कार्यालयात बैठक घेण्यात आली. मनसेच्या निवेदनाची दखल घेण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी वेकोलीच्या दबावाखाली प्रशासन झुकले. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेच्या नावावर आंदोलनकर्त्यांना अंधारात ठेवून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जवळपास ४१ व्यक्तिंवर भादंवी कलम १४३, ३४१, ३४२, ४४८, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या संदर्भात कलम १४९ जा.फौ. अन्वये मनसे पदाधिकारी मनदीप रोडे यांना सूचना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यामुळे मनसे पदाधिकारी मनदीप रोडे, कार्यकर्ते व एकोना- मार्डा परिसरातील महिला – पुरुषांनी आज वरोरा पोलीस स्टेशनला भेट देऊन आपली आपबिती कळविली.
वेकोलीतील महालक्ष्मी कंपनी पैश्याच्या जोरावर ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामीण जनप्रतिनिधी यांना वारंवार भेटून रितसर कामाची मागणी करुन सुद्धा जाणीवपूर्वक ग्रामस्थांना डावलण्यात येत आहे, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. हाताला काम नसल्याने परिसरातील लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. स्थानिक जनप्रतिनिधी याप्रकरणात गप्प आहे. स्थानिक प्रशासन गरीब, गरजू भूमिपुत्रांची बाजू घेऊन कंपनीला दम देण्याऐवजी ग्रामस्थांवरच कारवाई करत आहे, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. स्थानिक प्रशासनाने कंपनीचे मांडलिकत्व स्वीकारले काय? असा संतप्त सवाल मनसे नेता मनदीप रोडे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने एक तर बेरोजगार तरुणांना, प्रकल्पग्रस्तांना काम द्यावे नाहीतर आत्महत्येची परवानगी द्यावी, असे निवेदन राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारीसह विविध विभागाच्या ४० सक्षम अधिकाऱ्यांना देणार असल्याचे मनदीप रोडे यांनी प्रस्तृत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *