जठर म्हणजे काय ?

लोकदर्शन 👉अनिल देशपांडे

दि १३ फेब्रुवारी ÷ आपण खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाचा पहिला मुक्काम जठरात असतो. खाल्लेला पदार्थ अन्ननलिकेतून जठराच्या वरच्या अंगास येऊन पोहोचतो. जठर ही एक स्नायूंची पिशवीच आहे. लंबाकार, गोलाकार, तिरकस अशा तिहेरी विणींचे स्नायू या सुमारे सेंटीमीटर लांब पिशवीच्या विविध प्रकारच्या हालचाली करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या हालचालींमुळे खाल्लेले अन्नपदार्थ येथे पिळवटले, भरडले, घुसळले जातात व एकजीव होतात. विविध पाचक रस या ठिकाणीच अन्नपदार्थात मिसळले जातात. जठाराच्या अंतस्त्वचेखाली असलेल्या सूक्ष्म ग्रंथींतून जठररस पाझरतो. त्यात हायड्रोक्लोरिक अॅसिड, रेनिन व पेप्सीन असे घटक असतात.
रेनीनमुळे दुधातील केसिनच्या गुठळ्या होतात व त्याचे दह्य़ात रूपांतर होते. पेप्सिनची प्रक्रिया अाम्ल माध्यमात होत असते. अन्नातील प्रथिन द्रव्यांवर त्याचा परिणाम होतो व त्यांचे रूपांतर पेप्टोन व प्रोटिओझमध्ये केले जाते. जठरात आलेले अन्न सुमारे तीन ते चार तास राहून हळूहळू पुढे पक्वाशयात सरकते.
जठरामध्ये एका वेळी १२०० घन सेमी इतका अन्नसाठा मावू शकतो. वरच्या अंगाला म्हणजे अन्ननलिका जिथे उघडते त्याच्या काही सेंटिमीटर वरच्या पातळीवर जठाराचा उंचवटा येतो. अन्न गिळताना गिळली जाणारी हवा किंवा घुसळताना निर्माण झालेले गॅसेस येथे जमतात. आपण जेवल्यावर ढेकर देतो, ती ही हवा बाहेर पडल्यामुळेच.
जठरामध्ये सतत आम्ल स्रवत असते. पण काहींच्या बाबतीत याचे प्रमाण अल्प होते किंवा वाढते. अल्प झाल्यास पचनाच्या तक्रारी, रक्तक्षयाचा एक प्रकार किंवा कॅन्सरची सुरुवात अशाची शंका डॉक्टर घेतात. आम्लाचे प्रमाण मानसिक ताण, धूम्रपान, मद्यपान यांमध्ये वाढते. त्यामुळे सतत जळजळणे, घशाशी आग होणे, पित्ताच्या उलटय़ा, पोटात दुखणे या तक्रारी सुरू होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास यांचे रूपांतर जठरव्रणात होण्याची शक्यता असते. जठरात शिरकाव केलेले हेलिकोबॅक्टर जातीचे जंतू यामध्ये उपद्रवकारी कामगिरी करतात.
जठराची संपूर्ण तपासणी बेरियम मीलसारखे क्ष-किरणांमध्ये दिसणारे द्रव मिश्रण पाजून केली जाते. तसेच आता एन्डोस्कोपी पद्धतीत जठराची संपूर्ण दृश्य तपासणी करणे सहज शक्य होते.
अतिलठ्ठपणा जठराला चाप लावून त्याचा आकार कमी केला जातो. खाण्याचे पदार्थ सामावण्याचा आकार कमी झाल्याने अशा व्यक्तींचे वजन कमी होत जाते.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*’सृष्टी विज्ञानगाथा’ या पुस्तकातून*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *