मराठी राजभाषेच्या सन्मानासाठी वचननाम्यात दिलेल्या वचनांची मराठी भाषा दिनी पूर्तता करावी : आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याच्या वचनाची मुख्यमत्र्यांना करून दिली आठवण

सन २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या
वचननाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार व इतर काही वचने राज्यातील जनतेला देण्यात आली होती. येत्या मराठी भाषा दिनी या वचनांची पूर्तता करून माय मराठीचा सन्मान करावा अशी मागणी माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या बाबत मुख्यमंत्री तसेच मराठी भाषाविभाग मंत्री यांना पत्रे पाठवली आहेत.सन २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेतर्फे वचननामा प्रसिध्‍द करण्‍यात आला. या वचननाम्‍यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार असे वचन महाराष्‍ट्रातील जनतेला देण्‍यात आले आहे. अद्याप या वचनाची पुर्तता झालेली नाही. मराठीचे पुरातन दस्‍तावेज, ऐतिहासिक व सांस्‍कृतीक महत्‍व जाणून घेवून देश विदेशातील विविध भाषांमध्‍ये देवाण-घेवाण करण्‍यासाठी जागतीक मराठी विद्यापीठ निर्माण करणार असे वचन सुध्‍दा देण्‍यात आले आहे. मराठी विद्यापीठ निर्माण करण्‍याची घोषणा मा. मराठी भाषा विभाग मंत्री यांनी विधानसभेत केली. मात्र या घोषणेबाबत प्रत्‍यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.

त्‍याचबरोबर मराठी भाषेची गोडी युवांमध्‍ये निर्माण व्‍हावी म्‍हणून इयत्‍ता १० वी व १२ वी मधील मराठी भाषा परिक्षेत ८० टक्‍क्‍याहून अधिक गुण प्राप्‍त करणा-या विद्यार्थ्‍यांना विशेष शिष्‍यवृत्‍तीने सन्‍मानित करण्‍याचे वचन सुध्‍दा वचननाम्‍यात देण्‍यात आले आहे. मात्र या वचनाची देखील पुर्तता झालेली नाही.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत. या विशेष दिनाचे औचित्‍य साधुन वरील वचने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने निर्णय जाहीर करावा आणि माय मराठीचा यथोचित सन्‍मान करावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *