संकटांच्या स्वीकाराने घडली मतिमंदांची जीवनरेखा

By : Pravin Mudholkar *महिलादिन विशेष*

चंद्रपूर :

साहसी व्यक्तीच्या जीवनात संकटाचेही सोने होते. अशाच एका ध्येयवेड्या महिलेचा थक्क करून सोडणारा जीवन प्रवास खास महिला दिनानिमित्त.

कुटुंबात मतिमंद अपत्य जन्माला येणे ही फार क्लेशकारक घटना. आपल्या कुटुंबात सुदृढ बालक जन्माला यावे, त्याच्या बाललीलांनी घराचे गोकुळ व्हावे ही सर्वच पालकांची अपेक्षा. परंतु लागोपाठ दोन मतिमंद अपत्य जन्माला येणे, त्यांचे पालनपोषण, त्यांच्या उपचारांसाठी जीवापाड प्रयत्न, शिक्षणासाठी शाळा पालथ्या घालणे आणि प्रवेश न मिळाल्यामुळे स्वतः मतिमंदांसाठी शाळाळ आपल्या मतिमंद मुलांच्या स्मृती जपण्यासाठी चंद्रपूर जवळील धीरज ग्राम, ताडाळी येथे ‘ स्विकार ‘ मतिमंद मुलांची निवासी शाळा सुरू करून त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या श्रीमती रेखाताई पिंपळशेंडे या मतिमंदांसाठी जीवनरेखा ठरल्या आहेत.
1977 मध्ये रेखाताईंचा विवाह मोरेश्वर पिंपळशेंडे यांच्याशी झाला. 1978 मध्ये पहिला मुलगा जन्माला आला. त्यानंतर त्यांना दोन अपत्य जन्माला आले. हे दोन्ही मतिमंद होते. 1980 मध्ये जन्माला आलेल्या धीरजला मतिमंदत्वासोबत हृदयात छिद्र होते. पिंपळशेंडे दाम्पत्याने त्याच्या उपचारासाठी अतोनात पैसा खर्च केला. अत्याधुनिक दवाखान्यात नेऊन त्याला बरे करण्यासाठी डॉक्टरांना साकडे घातले. परंतु पदरी निराशा आली. तरीही त्यांनी हिंमतीने संकटांचा सामना केला. अपघातात पडल्याने धीरज चे माकडहाड सरकले. त्यावर शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 2011 मध्ये धीरजने जगाचा निरोप घेतला. संपूर्ण पिंपळशेंडे कुटूंबात तीन पिढ्यांपासून मुलगी नव्हती. शीतलच्या रूपात ही उणीव भरून निघाली. पण हे सुख देखील क्षणिक ठरले. 5 वर्षे शीतलच्या शरीराची हालचाल निष्क्रिय होती. वैद्यकीय निदानातून शितलला मतिमंदत्वासोबत दम्याचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. चंद्रपूर येथील डॉ. मुठाळ यांनी नागपूर येथे डॉ. सरनाईक यांचेकडे पाठविले. त्यांनी केलेल्या निदानातून शीतलला एकच फुफ्फुस असल्याचे निष्पन्न झाले. तसेच दुसरे फुफ्फुस देखील अपुरे विकसित झाल्याचे सांगितले. रेखाताईंनी आपले एक फुफ्फुस देण्याची तयारी दर्शविली. पण डॉक्टरांनी नकार देत त्यांना दिल्ली येथील पटेल चेस्टमध्ये पाठविले. त्यावेळी दिल्ली येथे निवास आणि भोजनाची व्यवस्था करून तत्कालीन खासदार मा. हंसराज अहिर यांनी मदत केली होती. तेथील तज्ञांनी तपासणी करून सांगितले की असे रूग्ण लाखांमध्ये एखादे असून हे अल्पायुषी असतात. शीतल केवळ 6 महिने जगेल असे डॉक्टरांनी सांगितले. तीला दम्याचा आजार देखील होता. दम्याचा झटका आल्यानंतर तीचा श्वास अटकत असे त्यावेळी तीची तडफड पाहू शकत नसल्याने रेखाताई स्वतःला लपवून घेत असत. त्या झटक्यातून बाहेर आल्यावर रेखाताई शीतलला जवळ घेऊन तीची स्वच्छता करून देत. शीतलच्या पायाला एकापाठोपाठ फोड येत असत. अशा अनेक वेदनांचे ओझे सोसत वयाच्या 33 व्या वर्षी शितलनेही या जगाचा निरोप घेतला. अनेक संकटे आणि त्यातून आलेली हताशा यामुळे मोरेश्वर पिंपळशेंडे यांचे 2013 ला हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. घरात एकच मुलगा , नैराश्य आणि एकटेपणामुळे त्या डीप्रेशनमध्ये गेल्या. या काळात त्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेची अवस्था दयनीय झाली होती. विध्यार्थी अनेक समस्यांनी ग्रस्त झाले होते. विध्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर अशी शाळा बंद केली पाहिजे असा त्यांनी विचार केला आणि नुतनीकरणाचा प्रस्ताव थांबविला. पुढे काही हितचिंतकांनी त्यांचे मतपरिवर्तन करून शाळेत लक्ष देण्यास प्रोत्साहित केले. धीरज आणि शीतलला मतिमंदांच्या शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे पिंपळशेंडे दाम्पत्याने आपल्या पदरीची सर्व कमाई खर्च करून संस्थेची उभारणी केली. यासाठी रेखाताईंनी मंगळसूत्र विकले. तसेच धीरजच्या वाट्याला आलेली दोन एकर जमीन संस्थेसाठी दीली. घरचेच दोन विध्यार्थी व नातेवाईकाला शिक्षक आणि रेखाताई यांनी सेविका बनून या संस्थेची सुरुवात केली. पुढे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. रेखाताईंना त्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. सरकारी यंत्रणेची अडवणूक, भ्रष्टाचार, कामचुकारपणा या समस्या असतांना देखील केवळ नववी उत्तीर्ण असलेल्या रेखाताई प्रचंड आत्मविश्वासाने कार्य करीत आहेत. समाजात मतिमंद लोकांची होणारी हेळसांड पाहता यांच्या सक्षमीकरणासाठी मतिमंदांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. स्वतः च्या मुलांच्या मतिमंदत्वाचे दुःख विसरून समाजातील मतिमंदांना दिशा दाखविणारी ही माय माऊली मतिमंदांसाठी जीवनरेखा बनली आहे.

#womenday #mahiladin #rekhapimpalshende #swikar

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *