वीज निर्मिती केंद्रांचे त्रयस्थ यंत्रणांकडून फायर ऑडिट होणार*

By ÷ Shankar Tadas

*⭕महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट हेल्थ कार्ड मिळणार*

*⭕ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश*

मुंबई : वीज निर्मिती केंद्रांमध्ये बिघाड आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी या सर्व केंद्रांचे त्रयस्थ यंत्रणांकडून फायर ऑडिट करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

आज प्रकाशगड या महानिर्मिती आणि महावितरण कंपनीच्या मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत डॉ राऊत यांनी हे निर्देश दिले.

वीज निर्मिती केंद्रामध्ये आगीच्या घटना व दुर्घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात व अग्नी प्रतिबंधक कन्व्हेअर बेल्टच्या पर्यायाचा विचार करावा,असे निर्देशही ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले.
” गेल्यावर्षी चंद्रपूर व खापरखेडा येथे घडलेल्या आगीच्या घटनेचा अभ्यास करून याची सखोल तपासणी करावी व भविष्यात अशा घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. असे अपघात घडल्यास वीज उत्पादन प्रभावित होऊन राज्याचे नुकसान होते.या घटनांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून फायर ऑडिट करण्यात यावे.याशिवाय प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रात नियमितपणे मॉक ड्रिल घ्यावेत “, असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.

वीज निर्मितीचे दर कमी करण्यासाठी मनुष्यबळ व निर्मिती प्रक्रियेतील घटकांचे सुयोग्य व्यवस्थापन करावे. प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेऊन यात प्रत्येक अधिकार व कर्मचारी यांनी केलेल्या सूचना व अनुभव विचारात घेऊन कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणविषयक अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्यात यावी, जेणेकरून पर्यावरणाला होणारे धोके टळतील, असे डॉ राऊत म्हणाले.

वीज निर्मिती केंद्रात निर्माण होणाऱ्या राखेचे योग्य पध्दतीने उपयोग करून विल्हेवाट करावी. तसेच वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्याचे चांगल्या पद्धतीने उपयोग करावे, असेही ते या यावेळी म्हणाले.

सदर बैठकीस प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

*महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट हेल्थ कार्ड*
महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मासिक आरोग्य तपासणी करून त्यांना स्मार्ट हेल्थ कार्ड देण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिलेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *