तृतीयपंथीयांना लाभार्थी बनवून तहसील कार्यालयाने जपले सामाजिक भान*

लोकदर्शन *राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : तृतीयपंथीयांबद्दल नेहमीच समाजाच्या विविध थरात तिरस्काराची, हेळसांड करणारी वृत्ती दिसून येते तसेच त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणेच लोक वागतात पण तहसीलदार रोशन मकवाने यांनी प्रशासकीय यंत्रणा राबवत तृतीयपंथीयांना शासकीय योजनेचे लाभार्थी बनवून सामाजिक भान जपल्याने परिसरात कौतुक केले जात आहे.
समाजाच्या विविध वर्गासाठी, दुर्लक्षित घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत पण त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना कितपत मिळतो, असा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना ( तृतीयपंथीयांना ) लाभ देण्याच्या उद्देशाने तहसीलदार मकवाने यांनी नायब तहसीलदार मधुकर काळे यांना मार्गदर्शन करून व शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने यांच्या मदतीने वंचित तृतीयपंथीयांचा शोध घेतला. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सूर्यकांत पाटील व महसूल सहाय्यक मधुकर दडमल यांनी यात्रा वार्डातील तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन रेखा नायक किन्नर (वय ५५ वर्षे ) यांना संजय गांधी निराधार योजना व कल्पना नायक किन्नर (वय ७७ वर्षे ) यांना श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला व लाभ तात्काळ मंजूर होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार केला. त्याचप्रमाणे मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत सदर लाभार्थ्यांच्या निवडणूक ओळखपत्रातील दुरुस्तीचा नमुना – ८ हे अर्ज भरून घेण्यात आले व कोव्हीड – १९ लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देत त्यांना लसीकरणासाठी उद्युक्त करण्यात आले. तहसील कार्यालयाने दुर्लक्षित तृतीयपंथीयांच्या उत्कर्षासाठी टाकलेले पाऊल ” सबका साथ ,सबका विकास ” या प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी निश्चितच सहाय्यक ठरेल, असे मत परिसरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here