वनहक्क व्यवस्थापनाचा ‘सोसोखेडा पॅटर्न’ !

लोकदर्शन ÷ अविनाश पोईनकर
‘मेळघाट म्हणजे कुपोषण’ सहसा अशीच चर्चा असते. त्यापलिकडेही ब-याच सकारात्मक बाबी येथे आहेत. अफाट नैसर्गिक सौंदर्य सातपुडा पर्वतरांगानी या परिसराला बहाल केले. स्थानिक आदिवासी कोरकू समाजाचं पारंपारिकत्व अजूनही येथील ग्रामीण भागात जिवंत आहे. त्यातच वनहक्क कायद्याने मेळघाटाला बळ दिले. जल, जंगल, जमीनीने येथील आदिवासींना खरे स्वातंत्र बहाल केले. यातून काही गावे प्रगतीच्या मार्गावर रुढ झालीत.

सोसोखेडा हे त्यातीलच एक गाव. १०१ कुटुंबाची वस्ती. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात जवळपास ६०० लोकसंख्येचं हे पुर्णत: आदिवासी गाव आहे. अनुसुचित जमाती व ईतर पारंपरिक वन निवासी कायदा २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अंतर्गत २०१२ मध्ये या गावाला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आला. वन खंड क्र.१२८८ मध्ये ४०५.३९ हेक्टर वनजमीनीची मालकी ग्रामसभेला मिळाली.

२०१२ मध्ये केंद्र शासनाने सामुहिक वनहक्क तर बहाल केला पण त्यानंतर यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही. हे चित्र काही अपवाद वगळता देशभराचे आहे. २०२० पर्यंत सामुहिक वन हक्क काय व कशासाठी गावाला दिला ? हे देखील गावातील वन हक्क समिती सोडून इतर गावक-यांना माहिती नव्हती. गडचिरोलीत लेखामेंढा येथे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा व मोहन हिराबाई हिरालाल यांच्या नेतृत्वात वनहक्क व्यवस्थापनाचं माॅडेल उभं झालं. व्यवस्थापनातून गावांना रोजगार तर उपलब्ध झालाच मात्र करोडो रुपयांची बांबू, तेंदू व जैवविविधतेतून उलाढाल झाली. त्यापुढे एक पाऊल टाकत चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव गावाने व्यवस्थापनाची दमदार अंमलबजावणी विजय देठे या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनात करुन ग्रामसभा व गावाला सक्षम केले. खरेतर सामुहिक वनहक्काने आदिवासींच्या जगण्याला व अभिव्यक्तीला दिलासा देणारे हे दिपस्तंभासारखे उदाहरणे ठरली.

मेळघाटाचा अभ्यास दौरा म्हणून या परिसरात फेरफटका करतांना सोसोखेडा या गावाला भेट दिली. याआधी मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून गडचिरोलीत प्रयोगशील कामाची चमक दाखवणारा स्वामी डुरके हा तरुण समाज प्रगती सहयोग संस्थेअंतर्गत वनहक्क व्यवस्थापनावर काम करतोय. स्वामी हा मुळचा गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातल्या. त्यामुळे आदिवासी आणि जंगल हे विषय त्याला नव्हे नाहीत. अतिशय विनम्र, शांत आणि अभ्यासू स्वभावाने तो या गावात रुळला. येथील लोकात विश्वासाची ज्योत पेटवली आणि वनहक्क व्यवस्थापनाचा ‘सोसोखेडा पॅटर्न’ यशस्वी केला.

डोंगर टाका मका, ढा टाका !
ढा टाका मका, आबुन टाका !
(जंगल आहे तर पाणी आहे. जंगल आणि पाणी आहे तर आपण आहोत.) हा आदिवासी कोरकू समाजाचा नारा सोसोखेड्यात यंदा बुलंद झाला. अख्खं गाव एकत्र आलं आणि ५००० वृक्षांची लागवड सामुहिक वनहक्काच्या जागेवर श्रमदानातून केली. रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करुन येथेच गावक-यांना पहिल्यांदा काम मिळाले. कामासाठी स्थलांतरित झालेले लोक पुन्हा गावात परतले. गावक-यात प्रचंड विश्र्वास निर्माण झाला. जंगल संवर्धनातून श्वाश्वत विकासाचे उद्दिष्ट नजरेसमोर आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्वामी डुरके या तरुणाचे प्रयत्न व गावक-यांचे सहकार्य लक्षात घेतले. अधिका-यांनी गावांना भेटी देवून वनविभागाला सत्कार्यास सुचना दिल्या. समाज प्रगती सहयोग संस्था, वन विभाग व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समीती सोसोखेडा यांनी वन संवर्धनाचा आदर्श पुढे रेटला.

मेळघाटातील परिसरात शिक्षणाचे वातावरण अजूनही फारसे नाही. ग्रामीण भागात तर उच्चशिक्षित फार मोजक्या प्रमाणात दिसतात. वर्षभरापासून या गावात वनहक्क काय ? त्यापासून आपल्याला काय मिळेल ? याबाबत अभ्यासगटासारखी विधायक चर्चा गावक-यात झाली. या अगोदरच्या यशस्वी गावांच्या कहाण्या व चित्रफिती गावातील ग्रामभेने बघितल्या. यातून लोकांत जनजागृतीचा आशावाद तयार झाला. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. वनजमीनीचा संशोधन नकाशा काढण्यात आला. सिमांकन करण्यात आले. आराखड्यात रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. गावक-यांना रोजगार उपलब्ध होईल, हा यामागचा शुद्ध हेतू. डोंगरभाग असल्याने समतल व विलग चरचे काम ७५ हेक्टरात केले. यातून ४५ दिवस गावक-यांच्या हाताला काम मिळाले. कामांचा पहिल्या दिवशी ११२ लोक मजूर म्हणून होते. बघता बघता चौथ्या दिवशी २२७ लोक कामावर आले. जे लोक कामासाठी बाहेरगावी गेले होते ते परत येवून गावातच रोजगार हमीच्या कामात गुंतले. यातून गावाचे रोजगारासाठीचे स्थलांतरण थांबले. कामांच्या माध्यमातून लोक जुडत गेले. जे काम आधी झाले नाही, असे काम होऊ लागल्याने गावक-यांचा वनहक्काबाबत विश्वास वाढू लागला.

वनहक्काच्या जंगल क्षेत्रात गौणवनोपज नसले तरी वृक्षारोपन करुन वनौपज मिळवू शकतो, हे अभ्यासातून ग्रामसभा व वनहक्क व्यवस्थापन समीतीच्या लक्षात आले. श्रमदानातून ५००० वृक्षारोपण करुन संवर्धन करण्याचे गावाने ठरवले. कुटुंब संख्येनूसार प्रत्येक कुटुंबाने ५० खड्डे खोदायचे व रोपांची लागवड करायची, असे नियोजन केले. विविध मिश्र प्रजातींची रोपटे वनविभागाने उपलब्ध करुन दिली. १६ जुलै हा महाश्रमदानाचा दिवस ठरवला. पहिल्याच दिवशी १७० लोक जमले. तीन दिवसात ५००० खड्डे प्रमाणानूसार खोदून पूर्ण केले. या गावाला तत्कालीन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी मिताली सेठी (भा.प्र.से) व वैभव वाघमारे (भा.प्र.से) यांनी भेटी देवून वृक्षारोपण केले. छोट्याशा गावात मोठे अधिकारी आल्याने गावक-यांना उर्जा मिळाली. पावसाच्या वातावरणातच २०० पेक्षा जास्त गावक-यांनी वृक्षलागवड व सिड्स बाॅल टाकण्याचा कार्यक्रम हाती घेतला. गावातील महिलांनी घर बसल्या साधारणता २००० सीड्स बॉल बनवून वनजमीनीत टाकले. सामुहिक वनहक्क मिळालेल्या क्षेत्रात कु-हाडबंदी व चराईबंदीचा निर्णय ग्रामसभा व वनहक्क व्यवस्थापन समीतीने घेवून त्यांची अंमलबजावणी केली. ग्रामसभा व वनहक्क वनहक्क व्यवस्थापन समीतीचे नारायन मावस्कर, राधा बेटेकर, कृष्णा कळके, कुंजीलाल सावरकर, सोनाली सावरकर, मनाजी सावरकर, संतुलाल बेटेकर, बिसराम सावरकर, साबूलाल मवस्कर व ग्रामस्थांनी परिश्रमातून मेळघाटात सोसोखेड्याचा व्यवस्थापनाचा पॅटर्न हिरवा केला.

मेळघाटातील आदिवासी कोरकू समाजात प्रचंड सामर्थ्य आहे. ते ओळखून त्यांना त्यांच्या हक्क व अधिकाराची जाणिव करुन दिली तर स्वावलंबनाची क्रांती दूर नाही. स्वामी डुरके या तरुणाने या गावाला दाखवलेली दिशा व गावक-यांना परिश्रमाचा झालेला साक्षात्कार उद्याच्या उज्ज्वल सोसोखेड्याची नांदी आहे, एवढे निश्र्चित !

अविनाश पोईनकर, चंद्रपूर
संपर्क – ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *