20 वर्षांपासूनचे बंद रुग्णालय 15 दिवसांत उभारले – रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अभूतपूर्व कार्य

By Shankar Tadas
– 300 बाधितांवर होणार उपचार

कोलार, 17 मे
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील रुग्णालये तुडुंब भरली आहेत. अशातच बाधितांना दिलासा देण्यासाठी देशभरातील विविध सामाजिक संस्था पुढे आल्या. रा. स्व. संघाचे असंख्य स्वयंसेवकही या संकटात अहोरात्र सेवा देत आहेत. आता संघाच्या स्वयंसेवकांनी कर्नाटकच्या कोलार गोल्ड फिल्ड येथील सुमारे 20 वर्षांपासून बंद असलेले रुग्णालय अवघ्या 15 दिवसांत उभारले असून, येथे एकाचवेळी 300 कोरोना बाधितांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
स्वयंसेवकांना या कार्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांचीही मोलाची साथ लाभली. प्राणवायू आणि खाटांच्या कमतरतेमुळे बाधितांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी या बंद रुग्णालयाची नव्याने उभारणी करण्याचे ठरविले. सतत 15 दिवस परिश्रम घेतले. रुग्णालयाची व्यवस्थित डागडुजी केली आणि आवश्यक त्या सर्वच सुविधा उपलब्ध केल्या. रुग्णालयाचे नूतनीकरण करून, संपूर्ण परिसरही स्वच्छ केला.
हे कोविड सेंटर बंगळुरूपासून 100 किमी दूर आहे. या केंद्राच्या डागडुजीसाठी 300 स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कोलार जिल्ह्यातील भाजपाचे खासदार एस. मुनीस्वामी यांनी याबाबतची माहिती दिली. पूर्वी या रुग्णालयात खाणीमध्ये काम करणार्‍यांवर उपचार केले जायचे. 2001 मध्ये ते बंद पडले. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे कोविड केंद्रात रूपांतर करण्याची कल्पना समोर आली आणि काम सुरू झाले, असे मुनीस्वामी यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांकडून 30 कॉन्सन्ट्रेटर्स उपबल्ध
या रुग्णालयात 300 खाटांची व्यवस्था असली, तरी सध्याच्या स्थितीत 220 बाधितांवर उपचार करण्यात येत आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथा नारायणा यांच्याकडून 30 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध होणार आहेत, असे ते म्हणाले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *