लोकदर्शन 👉मोहन भारती
जिवती (ता.प्र) 20 : राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी, अपूर्ण विकासकामे आणि सरकारच्या अपयशी धोरणांमुळे गंभीर संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नसताना उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नसून जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी जिवती येथे काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने ‘शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला. जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे व तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
मोर्चामध्ये आदिवासी व गैरआदिवासी पट्टेधारकांना पाठविण्यात आलेल्या नोटिसा व पट्टे रद्द करण्याचे आदेश तात्काळ स्थगित करणे, सातबारावर वारसांची नोंद करणे, कुमारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणे, हरिभाऊ राठोड यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेणे, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी जन्म दाखल्याची अट रद्द करणे, वीज मीटर बिलवाढ रद्द करणे, मनरेगा योजनेत कोणताही बदल करू नये, शेतमालाला हमीभाव लागू करणे, कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी, वाढती महागाई रोखणे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, जलजीवन मिशनसह विविध विकासकामांतील अपयशाची चौकशी करणे आणि जनविरोधी निर्णय मागे घेणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
राज्य सरकार शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने हा जनआक्रोश उफाळून आला असल्याचे नेत्यांनी सांगितले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांच्यासह काँग्रेसचे व मित्र पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी, कामगार, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





