तुमगावात सरकारी यंत्रणा व जनप्रतिनिधींना गावबंदी..!!

by : Rajendra Mardane

वरोरा : शेतकरी विरोधी नितीच्या विरोधात तुमगांवातील शेतकरी व गांवकऱ्यांनी शासना विरुद्ध एल्गार पुकारला आहे. शासकीय कर्मचारी व जनप्रतिनिधींसाठी गावबंदी घोषित करून तीव्र आंदोलन केले. यावेळी शासकीय पदाधिकारी यांच्या कामचोर वृत्तीच्या निषेधार्थ शासकीय यंत्रणेला काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी शाळा व शासकीय कार्यालय बंद होती. गावबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या बंद पडल्या त्यामुळे एकूणच गावातील कामकाज प्रभावित झाले.
तालुक्यातील तुमगांव परिसरातील शेतकरी, नागरिक शेती विषयक नैसर्गिक व कृत्रिम आपदेपासून त्रस्त आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, शासकीय स्तरावर अनेकदा निवेदन देऊन सुद्धा सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. संविधानिक पदावर असलेल्या जनप्रतिनिधी, शासकीय पदाधिकारी यांच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर तुमगांव येथील शेतकरी व गांवकऱ्यांनी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला. गावात शासकीय कर्मचारी व जनप्रतिनिधींसाठी गावबंदी जाहीर करीत याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. शासनाच्या विरोधात ” धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो”, ” गारपीटाची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे”, ” शासन मुर्दाबाद, शेतकरी जिंदाबाद”, “कामचुकार अधिकारी यांचा निषेध असो”, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे “, ” डामरीकरणाचे काम झालेच पाहिजे” अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
गांवकऱ्यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या शासनाला व संविधानिक पदावर असलेल्या जनप्रतिनिधींना कळवित याबाबत सतत पाठपुरावा केला. तुमगांव येथील शेतकरी, गांवकऱ्यांच्या निवेदनानुसार मागील जुलै २०२३ पासून तुमगांव व आसपासचा परिसर शेतीविषयक व नैसर्गिक व कृत्रिम आपदेपासून त्रस्त आहे, कित्येक वर्षांपासून अपूर्ण बांधकाम झालेल्या पाझर तलावामुळे अंदाजे १५० एकर जमीन दरवर्षी पूरबुडी मध्ये जाते व शेतकऱ्यांना या शेत जमिनीमध्ये एक रुपयाचे उत्पन्न होत नाही. तरीही शासनाने साधा एक ही रुपया आपदा म्हणून शेतकऱ्यांना आजपर्यंत दिला नाही. पंतप्रधान पिक योजनेपासूनही अधिकांश शेतकरी वंचित आहेत. शेतमालाला भाव मिळाला नाही. गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असतांना थातूरमातूर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. महागाई वाढली आहे. पहिलेच शेतकऱ्यांची स्थिती एकदम बिकट असतांना शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष काही केले नाही. शेतकऱ्यांची स्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे येणाऱ्या मार्च महिन्यात पीक कर्ज शेतकरी कुठून व कसा भरणार? अतिरिक्त दबाव व शासनाच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास मजबूर होत आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध नाही. शासनाच्या शेतकरी विरोधी नितीला कंटाळून अखेर तुमगांव येथील शेतकरी व गांवकऱ्यांनी सभा घेऊन सरकारी यंत्रणा मधील सर्व कर्मचारी व इतर सरकारी आवश्यक बाबींवर गांवबंदीचा निर्णय घेतला. गांवकऱ्यांनी गावांत येणाऱ्या मार्गाच्या मधोमध बैलगाड्या आडव्या केल्याने गावातून होणारी वाहतूक खोळंबली. गावबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला सुद्धा परत जावे लागले. गावातील शाळा, ग्राम पंचायत व इतर सरकारी कार्यालय बंद असल्याने कामकाज प्रभावित झाले. या गावबंदीचे लोन परिसरातील काही गावांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. सरपंच दुर्गा तोंडाने, पुरषोत्तम पुनवटकर, महादेव बोटाने,शिवाजी डोये,पंढरी उपरे,दिलीप घारे, वासुदेव चिकटे,गोविंदा काळे, आशिष भुते, प्रकाश वैद्य, गणेश डोये, बंडू पाकमोडे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे कळते.

*निवडणूकीवर बहिष्कार ; मतदान न करण्याचे आवाहन*
मागील अनेक वर्षांपासून गावांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. तुमगांव व लगतचा परिसर शेतीविषयक नैसर्गिक व कृत्रिम आपदेपासून त्रस्त आहे. वारंवार निवेदने देऊन ही सरकार दखल घेत नाही. सरकारला जागे करण्यासाठी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या विरोधात गांवकऱ्यांचा संघर्ष मागण्या पूर्ण होत पर्यंत सुरू राहणार. यावरही शासनाने मनमानी केली व गांवकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर येणाऱ्या निवडणूकीवर सुद्धा बहिष्कार घालू.
– *डॉ. विवेक तेला*
*सामाजिक कार्यकर्ता*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *