‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गॅझेटिअरचे प्रकाशन

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून प्रथमच मराठीत तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा गॅझेटिअरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित झाले आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरित्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना ठेवण्यात आले होते. बल्लारपूर येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरुप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरिती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भुगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकींग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भुत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्यात आल्याचे गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले.

‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेनिमित्त देशभरातून येणा-या खेळाडूंना चंद्रपुरचे वैभव, सांस्कृतिक वारसा व इतिहास तसेच प्रेक्षणीय स्थळांची माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेनुसार ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ ही हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचेही प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *