दर्जेदार शैक्षणिक व्यवस्थेसह उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करा : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

by : Devanand Sakharkar

चंद्रपूर : मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जेवढ्या सहजपणे शिक्षण पोहोचेल तेवढ्या गतीने त्या समाजाची प्रगती होते; आरोग्य हा देखील अत्यंत महत्वाचा घटक असून शिक्षण व आरोग्य हे मानवी जिवनातील अविभाज्य घटक आहेत. म्हणूनच जिल्ह्यात दर्जेदार शैक्षणिक व्यवस्थेसह उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करायला हव्या अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

महानगरपालिकेद्वारा आयोजित आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन व डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेच्या नूतनीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, मंगेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, झाकीर हुसेन उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. शहजाद, राहुल पावडे, मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आझाद गार्डन येथे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत व्हॅक्युम असेस रोड स्वीपर ही अत्याधुनिक मशीन मनपाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी तर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने 49 लक्ष 35 हजार रुपये खर्च करून फॉगर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाढते प्रदूषण, खानपानाची बदललेली व्यवस्था, रासायनिक खतांचा अतिवापरामुळे निर्माण झालेले विषारी अन्न या सर्वांचा सामना करतांना आरोग्य बिघडते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय केले आहेत. महाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा पर्यंत केले जाते तसेच चांदाचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचे वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. चंद्रपूर पुढे गेल्याशिवाय महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून मानले जाऊ शकत नाही. त्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 “आपला दवाखाना” महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 50 हजार होती. ती 5 लक्ष्यापर्यंत वाढविण्यात आली. या योजनेत 5 लाखांमध्ये साधारणतः 900 पेक्षा जास्त आजारांचे ऑपरेशन पूर्ण केल्या जात असल्याचेही ते म्हणाले. विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना निर्माण केली. भारताची खरी संपत्ती ही योगा आहे. या संपत्तीचा उपयोग नागरीकांनी केल्यास दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नसल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारतीय भूमी ही संस्कारी भूमी आहे. जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उत्तम व्यवस्थेसह निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेच्या माध्यमातून उत्तम विद्यार्थी घडावे, ही सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हयात अपघात तसेच विविध कारणांमुळे दिव्यांग मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे दिव्यागांना मदतीचा हात पुढे केल्यास, समाजाची काळजी एकमेकांच्या मदतीने घेता येईल. या आरोग्यवर्धिनी केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावर वेदना तर जाताना सुख व समाधान घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मनपा आयुक्त विपिन पालीवाल म्हणाले, शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात पाहिजे त्याप्रमाणात आरोग्य सुविधा नव्हत्या, याकरीता शासनाने महानगरपालिकेला 12 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केली. त्यापैकी मागील 1 मे रोजी 10 आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण करून जनतेच्या सेवेत रुजू करण्यात आले. शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुन्हा ९ आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर झाली असून यासाठी लागणारे मनुष्यबळ, डॉक्टर, नर्सेस व आवश्यक संसाधने आदींची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

*व्हाट्सॲप चॅटबॉट प्रणालीचे लोकार्पण:*
चॅटबॉटच्या माध्यमातून मनपाच्या विविध योजनांची माहिती घेता येईल, 8530006063 या क्रमाकांवर हाय मॅसेज केल्यास मनपा अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांची माहिती मोबाईलवर प्राप्त होणार आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा विकासाच्या क्षेत्रात पुढे न्यावा, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*दिव्यांग धोरणातंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वितरण:*
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत दिव्यांक लाभार्थ्यांना टक्केवारीनुसार निधी देण्यात येतो यामध्ये 142 लाभार्थ्यांना 12 लक्ष 94 हजार रुपये निधीचे वितरण करण्यात आले.

*बचत गटांना फिरता निधी व नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण:*
बचत गटांना स्थापन होऊन तीन महिन्यानंतर शासनातर्फे प्रतिगट रुपये 10 हजार फिरता निधी देण्यात येतो. यामध्ये, नारी महिला, दृष्टी, सुनिधी, महालक्ष्मी व एकवीरा महिला स्वयंसहायता बचत गटांना 10 हजार रुपये व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

*बचत गटांना व्यवसायाकरीता कर्जाचे मंजुरी पत्राचे वितरण:*
बचत गटांना विविध व्यवसाय करण्याकरीता 10 लाखापर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. तर महानगरपालिकेमार्फत 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. यामध्ये सोफिया महिला स्वयंसहायता बचत गट अंचलेश्वर वार्ड, यांना 3 लक्ष तर गरीब नवाज महिला स्वयंसहायता बचतगट रहमतनगर यांना रु. 2 लक्ष पर्यंतचे कर्जाचे मंजुरी पत्र वितरित करण्यात आले.

*दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता मिळालेल्या कर्जाचे मंजुरी पत्राचे वितरण:*
दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता कर्ज या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते. तर महानगरपालिकेमार्फत रु.25 हजारापर्यंत अनुदान देण्यात येते. यामध्ये राखी कोगंरे यांना 1 लक्ष 50 हजार, रेखा चौधरी यांना 50 हजार तर रति गाडगे यांना 1 लक्षपर्यंत मिळालेल्या कर्जाचे मंजुरी पत्र पालकमंत्र्याच्या हस्ते वितरित करण्यात आले.

0000

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *