भविष्यात होणा-या सर्वच निवडणूकीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ बहिष्कार घालणार. ♦️ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या मान्य होत नसल्याने कोणत्याही निवडणूकीत मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय. ♦️ग्रामसभेत झाला ठराव पास.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि. १० स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ लोटला.तरिही उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा सुविधापासून आजही वंचित आहेत. शासनाकडे वर्षानुवर्षे शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने तसेच संप , आंदोलने, निदर्शने करून सुद्धा वर्षानुवर्षे हनुमान कोळीवाड्याच्या ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुक्रवार दि ३ मार्च २०२३ रोजी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ग्रामसभेतही ठराव पास करण्यात आला आहे.

 

दिनांक १२ नोव्हेंबर १९८२ रोजी मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या कडील गोपणीय शासन ठरावात शेवा कोळीवाडा गावठाण चार पाच वर्षांनी जेएनपीटी बंदर प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यासाठी लागणार आहे. त्यासाठी शेवा कोळीवाडा गावचे योग्य पुनर्वसन शासनाने करावे व त्याकरीता जेएनपीटी बंदर व्यवस्थापन फंड देईल आणि पुनर्वसीतांच्या रोजीरोटीसाठी बंदर प्रकल्पात शिक्षण प्रशिक्षण देऊन प्रत्येक कुटूंबास नोकरी देण्याची हमी प्रशासनातर्फे देण्यात आली होती. त्या हमीच्या अनुपालनाची जबाबदारी मा. जिल्हाधिकारी रायगड यांची होती. जेएनपीटीने पुनर्वसनासाठी फंड कमी दिल्याने मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी उरण तालुक्यातील मौजे बोरीपाखाडी येथील १७ हेक्टर जमिनीपैकी ९१ गुंठयात शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटूंबांना हनुमान कोळीवाडा येथे आजतागायत संक्रमण शिबीरात ठेवलेले आहे.शासन १९८२ ते १९८५ चे शेवा कोळीवाडा गावाचे गव्हरमेंट नॉर्मनुसार १७ हेक्टर जमिनीत मंजूर असलेले पुनर्वसन करत नसल्याने आणि पुनर्वसनाच्या व रोजीरोटीसाठी नोकरीच्या नावाने फसवणूक करून शासन व जेएनपीटी वेळकाढुपणा आणि विसरवण्याचा गेली ३८ वर्षे प्रयत्न करत आहे. भारताच्या संविधानानुसार कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने पुनर्वसनाचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडून सोडविला नसल्याच्या निषेधार्थ दिनांक ०३ मार्च २०२३ रोजीच्या ग्रामसभेत येणा-या पंचायत समिती, जिल्हा परीषद रायगड, विधानसभा व लोकसभा निवडनुकीत मतदान न करण्याचा एकमताने निर्णय घेऊन ठराव मंजूर केलेला आहे.या ठरावा बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त,विभागीय आयुक्त कोकण विभाग,पोलीस आयुक्त नवी मुंबई,जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद,तहसील कार्यालय उरण, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून माहिती दिली आहे.अशी माहिती ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी व उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *