



इयत्ता ११ वी च्या वाढीव विद्यार्थी पटसंख्येला मंजुरी द्यावी.
शालेय शिक्षणमंत्र्यांकडे आमदार सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील वर्ग ११ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जुलै महिन्यापासून सुरु झाले असून आगस्ट महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. परंतु अनेक विद्यार्थी १० वी उत्तीर्ण केल्यानंतर प्रथम प्राधान्य विज्ञान शाखा, आय. टी.आय, नर्सिंग, तंत्र शिक्षण, व्यावसायिक शिक्षण घेण्याला देत असतात. ज्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना दरवर्शीच शिक्षणाधिकारी जि.प. कडून वाढीव प्रवेशाची परवानगी देण्यात येते. मात्र यावर्षी शासनाने वाढीव विद्यार्थी संख्येसह तुकडीला मान्यता देण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांचे मार्फत २० विद्यार्थ्यांना तर उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर यांना २० विद्यार्थ्यांना प्रवेश मान्यता देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावे असे सुचविले होते. सदर प्रस्तावास शासन मान्यता देण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले आहे परंतु तीन महिन्याचा कालावधी होऊनही शासनाने वाढीव विद्यार्थी पट संख्येला अजूनही मान्यता प्रदान केलेली नाही. त्यामुळे ज्याविद्यार्थ्यांना इयता ११ वी साठी ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत तेथे प्रवेश क्षमता पूर्ण झाल्यामुळे व अजूनही वाढीव पट संख्येला मंजुरी न मिळाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. वाढीव विद्यार्थ्यांना अनेक कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल या आशेने विद्यार्थी प्रवेशित मुलांसोबत वर्गात बसत असून त्यांचे नाव हजेरी पटावर मात्र संख्या मान्यतेशिवाय घेता येत नसल्याने वाढीव विद्यार्थी पट संख्येला त्वरित मान्यता प्रदान करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
करीता सदर विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर यांचे कडून प्राप्त झालेल्या इयत्ता ११ वी च्या वाढीव विद्यार्थी पट संख्येला मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.