” चैतन्याच्या मोहरांतून बालकुमारांत संस्कारांची पेरणी ” . प्राचार्य,सुनील दबडे

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

कळत – नकळतपणे मुलांवर जे जे चांगले ठसविले जाते , ते ते संस्कारांत मोडते . संस्कार मोठ्यांच्या आचरणांतून बालकांमध्ये झिरपत झिरपत जातात . संस्कारांतून संस्कृत्ती घडते . संस्कृत्तीतून राष्ट्राची उभारणी होते .
समाजामध्ये बालकांमध्ये मोठ्यांच्या आचरणातून दिले गेलेले संस्कार समाज घडणी साठी केव्हाही चांगलेच ..!
आज समाजांमध्ये विविध ठिकाणी संस्कार केंद्रांमार्फत बालकुमारांवर संस्कार केले जात आहेत . घरांघरांत आणि शाळां शाळांत बालकुमारांवर संस्कार केले जात आहेत . वाचन, भजन , किर्तन , प्रवचन , व्याख्याने तसेच अशा विविध माध्यमांतून बालकुमारांत संस्कार ठसविले जात आहेत .
बालकुमारांमध्ये संस्कारांची पेरणी करण्यात कवी / लेखकही मागे नाहीत . अनेक लेखक बालकुमारांसाठी चांगले लेखन करून त्यांच्यामध्ये संस्कारांची पेरणी करीत आहेत . हे चित्र खुपच आशादायक आहे . यामध्ये खास बालकुमारांसाठी लेखक डॉ . रविंद्र कानडजे यांनी ” चैतन्याचा मोहर ” . हा कथासंग्रह लिहीला आहे . या पुस्तकातून बालकुमारांमध्ये संस्कारांची पेरणी करण्याचा डॉ . कानडजे यांचा प्रयत्न आहे .
हे पुस्तक राजुरा ( बु.) , मुखेड , जि . नांदेड येथील गणगोत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे . पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ बालकुमारांना आकर्षित करणारे आहे . मुखपृष्ठावर बालकुमारांचे व निसर्गाचे मनमोहक चित्र आहे . मलपृष्ठावर अशोक कोळी यांनी पुस्तकाबद्दल चांगला अभिप्राय लिहीला आहे . पुस्तकाची किंमत ७५ रुपये आहे .
पुस्तकाचे लेखक उच्चशिक्षीत असून सध्या ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत . सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे . त्यांचा मूळचा पिंड शिक्षकाचा असल्यामुळे त्यांना बालकुमारांच्या तसेच तरुणांच्या मानसिकतेचं खुप
चांगलं आकलन आहे .
बालकुमारांना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी व त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावी म्हणून हे पुस्तक लिहीले असल्याचे मत डॉ . कानडजे यांनी या पुस्तकातील आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे .
या पुस्तकांमध्ये एकूण १३ कथा आहेत . सर्वच कथांतून ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्यात आली आहे . खेड्यांतील शेती माती , डोंगर कडा , ओढे , झाडी पशु पक्षी , घरे, घरांतील कर्ती माणसे , पाळीव प्राणी यांचे वर्णन या पुस्तकांतून करण्यात आले आहे . लेखनाची भाषा सरळ साधी सोपी असून ती बालकुमारांना समजेल अशी आहे . खेड्यांबद्दल प्रेम निर्माण करणाऱ्या या कथा आहेत . प्रेमभाव हे या सर्वच कथांचे केंद्र आहे . स्वावलंबन, थोरामोठ्यांचा आदर , पशुपक्षी प्राण्यांबदल प्रेम , एकूणच निसर्गाबद्दल प्रेम , शिक्षणाचे महत्व , निकोप कुटुंब व्यवस्था , देशभक्ती आदी विविध मूल्यांची शिकवण पुस्तकातील प्रत्येक कथेतून दिसून येते .
आजच्या अस्वस्थ समाज व्यवस्थेच्या काळात ” चैतन्याचा मोहर ” . या पुस्तकासारखी अधिकाधिक पुस्तकांचे लेखन लेखकांच्य हातून होणे ते बालकुमारांपर्यंत पोहचविणे , त्या पुस्तकांचे पारायण करणे हे खुपच गरजेचे आहे .
आज घरांघरांतील संवाद कमी होत चालले आहेत . मोबाईलच्या विळख्यात घरं सापडली आहेत . सुसंवाद संपून वाद वाढत आहेत . अनेक घरं, घरातली पोरं बरबादीच्या मार्गावर आहेत . अशा घरातील बालकुमार तोंड मिटून, हाताची घडी घालून घरातल्या या सगळ्यांकडे पाहत आहे . बालकुमारांचे बालपण हरवत आहे . घरपण संपत चालले आहे . अशावेळी बिघडलेली ही व्यवस्था बालकुमारांच्या हातांत पुस्तके देऊन, पुस्तकांचे वाचन करून नीट करता येऊ शकते . पुस्तके विकत घेऊन त्या पुस्तकांचे आधी घरांघरांतील जाणत्यांनी वाचन करणे आवश्यक आहे . अशा पार्श्वभूमीवर डॉ. रविंद्र कानडजे यांनी बालकुमारांसाठी केलेला प्रयत्न खुपच कौतुकास्पद आहे .
अनेक कुटुंबे आपलं घरपण टिकवून आहेत . विविध माध्यमांतून बालकुमारांत संस्कार केले जात आहेत . पण हे प्रयत्न अधिकाधिक वाढणे आवश्यक आहेत .
जपान आणि रशिया या देशांनी आपापल्या देशांत नाविन्यपूर्ण प्रयोग केला होता . त्या देशांनी बालकुमारांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके तेथील साहित्यिकांना लिहायला सांगितली होती . साहित्यिकांना सर्वतोपरी सहकार्य करून लेखनासाठी प्रोत्साहन दिले होते . मग साहित्यिकांनी बालकुमारांसाठी लेखन केले . ही पुस्तके बालकुमारांच्या हाती देण्यात आली पुस्तकांचे पारायण झाले . वीस वर्षानंतर सर्व्हे झाला . अनेक प्राध्यापक, इंजिनिअर, डॉक्टर , वकील घडले . पण माणूस घडण्यासाठी या पुस्तकांचा खुपच चांगला उपयोग झाल्याचे सव्हेअंती दिसून आले . आपल्या महाराष्ट्रात आणि देशात असा प्रयोग झाला तर किती बरे होईल .. असो … :
आपले साहित्यिक समाजसेवेचे हे काम बिन बोभाटपणे करीत आहेत . डॉ . कानडजे यांचे बालकुमारांसाठीचे प्रामाणिक प्रयत्न असेच वाढत राहोत . त्यांच्याहातून दर्जेदार लेखन होवो . या शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *