राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली तसेच वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणालीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते विमोचन.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

उभय प्रणालींच्‍या माध्‍यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्‍यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली तसेच वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणाली या माध्‍यमातुन वनांचे शाश्‍वत व्‍यवस्‍थापन, संरक्षण, संवर्धन तसेच मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन करणे सहज सुलभ व्‍हावे यादृष्‍टीने आयसीटी प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विकसित करण्‍यात आलेल्‍या या उभय प्रणाली अतिशय महत्‍वाच्‍या आहेत. या माध्‍यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्‍यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल असा विश्‍वास राज्‍याचे वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

दिनांक १७ ऑगस्‍ट २०२२ रोजी मंत्रालयात राज्‍य योजना संनियंत्रण प्रणाली व वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणालीचे विमोचन व कार्यान्‍वयन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या उपक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. राज्‍याच्‍या वनविभागात सन २०१२ पासून आयसीटी प्रकल्‍प कार्यान्‍वीत आहे. या प्रकल्‍पाअंतर्गत वनांचे शाश्‍वत व्‍यवस्‍थापन, संरक्षण, संवर्धन व त्‍यास संलग्‍न असलेल्‍या विविध विषयांचे माहिती व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी प्रणाली विकसित करण्‍यात आली आहे.

राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली

वनविभागात राज्‍य योजना अंतर्गत एकूण ५५ योजना असून त्‍यांचे प्रस्‍ताव क्षेत्रीय स्‍तरावरून प्राप्‍त करून घेणे, त्‍यांचे संस्‍करण प्रधान मुख्‍य वनसंरक्षक अर्थसंकल्‍प, नियोजन व विकास यांच्‍या कार्यालयात पूर्ण करून शासनाला सादर करणे व शासन स्‍तरावरून प्रस्‍तावाला मान्‍यता देवून शासन निर्णय निर्गमित करणे व त्‍या अनुषंगाने अर्थसंकल्‍पीय प्रणालीवर वितरीत केलेला निधी यांची माहिती एकत्ररित्‍या प्राप्‍त व्‍हावी या उद्देशाने राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली तयार करण्‍यात आली आहे. विभागीय कार्यालयापासून मंत्रालय स्‍तरापर्यंत कागद विरहीत प्रस्‍ताव सादर करण्‍याची सुविधा, प्रस्‍ताव संनियंत्रणाकरिता प्रदर्शने फलक सुविधा, प्रस्‍ताव सादर करण्‍यासंबंधी तसेच अनुदान विनियोग संबंधी अधिका-यांना नियमित एसएमएस सुचना पाठविण्‍याची सुविधा ही या प्रणालीची ठळक वैशिष्‍टये आहेत.

वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणाली

मागील काही वर्षापासून राज्‍यात वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत सातत्‍याने वाढ होत आहे. प्रामुख्‍याने वाघ व बिबट यांच्‍या संख्‍येत सुध्‍दा मोठी वाढ झाली आहे. जेव्‍हा वन्‍यप्राणी मानवी वस्‍तीत प्रवेश करतात तेव्‍हा मानव-वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी रेस्‍क्‍यु करणे आवश्‍यक असते. त्‍याचप्रमाणे वन्‍यप्राण्‍यांचे रस्‍ते अपघात, खुल्‍या विहीरीत पडणे इत्‍यादी कारणांमुळे वन्‍यप्राण्‍यांचा बचाव करणे आवश्‍यक असते. अशा प्रकारची माहिती एकत्रीतपणे उपलब्‍ध व्‍हावी यादृष्‍टीने वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणाली तयार करण्‍यात आली आहे.

या दोन्‍ही प्रणालींच्‍या विमोचन व कार्यान्‍वयन प्रसंगी प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. प्रविण श्रीवास्‍तव, एफडीसीएमचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. के. पी. सिंग, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (कार्मीक) श्री. विकास गुप्‍ता, मुख्‍य वनसंरक्षक (मंत्रालय) डॉ. रविकिरण गोवेकर, अपर मुख्‍य वनसंरक्षक कांदळवन श्री. विरेंद्र तिवारी, अपर मुख्‍य वनसंरक्षक एफडीसीएम श्री. एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी कॅम्‍पा श्री. शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्‍य वनलसंरक्षक अर्थसंकल्‍प, नियोजन व विकास श्री. प्रदिप कुमार, सामाजिक वनीकरण विभागाच्‍या प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्रीमती सुनिता सिंग, वन्‍यजीव विभागाचे प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. सुनिल लिमये, संचासलक संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान श्री. मल्‍लीकार्जुन, संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वनविभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, कक्ष अधिकारी श्री. वि.श. जाखलेकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *