मुसळधार पावसामुळे उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. भातशेती करपली.नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.


लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 21 जुलै रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये काही दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. या पावसामूळे शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला होता . मात्र अतिवृष्टी, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आता संकटात सापडला असून उरण मधील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. तर उरण मधील अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून भातरोपे करपून गेली आहे. त्यामुळे लागवडीसाठी परत दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

संपूर्ण उरण तालुक्यात भातशेती केली जाते. विशेषतः उरण तालुक्यात सर्वाधिक भातशेती करण्याचे प्रमाण पूर्व विभागात आहे. तर अनेक ठिकाणी फळबागांची लागवड केली गेली आहे. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील खोपटे, पिरकोन, आवरे, वशेणी, कळंबुसरे,चिरनेर, मोठी जुई, बोरखार, कोप्रोली, सारडे,वेश्वि,वशेणी पाणदिवे,दिघोडे आदि ठिकाणी भातशेतीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.शेतामध्ये छोटे छोटे गादी वाफे करून त्यावर भात बियाणांची पेरणी करतात. त्यानंतर भाताची रोपे आवटणी पद्धतीने संपूर्ण शेतात टाकून भाताची लागवड केली जाते.मात्र सतत पडणाऱ्या पाऊसामुळे पाउसाचे पाणी शेतात तसेच साचून राहत आहे त्यामुळे पेरणी केलेल्या बिया कूजून चालले आहेत. यामूळे शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत वाया जात आहे. सततच्या मुसळधार पाऊसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. सतत पडणा-या पाउसामुळे पीक घेता येत नसल्याने यंदाची भातशेती ओसाड राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुसळधार पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे कूजलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना त्वरित न्याय दयावा अशी मागणी उरणमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here