बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील समस्‍यांचे त्‍वरीत निराकरण करा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदअर्शन👉शिवाजी सेलोकर

*⭕जिल्‍हाधिकारी व महत्‍वाच्‍या विभाग प्रमुखांबरोबर घेतली बैठक.*

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात निरनिराळया विभागात अनेक समस्‍या आहेत. या सर्व समस्‍या त्‍वरीत सोडविण्‍यात याव्‍या असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अनेक विभागांच्‍या प्रमुखांबरोबर बैठक आयोजित करण्‍यात आली होती. ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने महाऔष्‍णीक विद्युत केंद्र, महावितरण, वेकोलि, जिल्‍हा परिषद, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*पोंभुर्णा नगर पंचायतशी संबंधित सिटी सर्व्‍हे ताबडतोब करावा*

पोंभुर्णा नगर पंचायतशी संबंधित सिटी सर्व्‍हे ताबडतोब करावा, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे परत पाठवू नये, सहाय्यक अनुदान पूर्वीप्रमाणेच द्यावे, रिक्‍त पदे तातडीने भरावी, घरकुल पाणीपुरवठा योजना नगर पंचायत कडून काढून जिल्‍हा परिषदेला जोडणे अशा अनेक विषयांवर आ. मुनगंटीवार यांनी तातडीने उपाययोजना करण्‍यास सांगीतले.

*खाण प्रभावित क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करा*

वेकोलिशी संबंधित भटाळी, किटाळी, सिनाळा शी संबंधित अनेक समस्‍यांवर विस्‍तृत चर्चा झाली. यात भटाळीसाठी नविन पोल टाकणे, ओव्‍हरबर्डन कमी करणे या अशा अनेक विषयांवर लवकरात लवकर तोडगा काढण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी वेकोलि अधिका-यांना दिले.

*बफर झोन क्षेत्रातील शेतकऱ्यांची अतिक्रमणे काढू नये*

वनविभाग बफर झोनमध्‍ये अनेक वर्षांपासून राहत असलेले रहिवासी यांची घरे व शेती याचे अतिक्रमण जबरदस्‍तीने काढत आहे. ज्‍यामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्‍ये असंतोष आहे. त्‍यामुळे गावाक-यांना त्‍यांची प्रमाणपत्रे तयार करण्‍यासाठी वेळ द्यावा व तोपर्यंत त्‍यांची अतिक्रमणे काढू नये असे स्‍पष्‍ट निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

*वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या लोकांना देण्‍यासाठी हवी असलेली रक्‍कम त्वरित द्यावी*

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या लोकांना देण्‍यासाठी हवी असलेली रक्‍कम वनविभागाकडे उपलब्‍ध नसते ती ताबडतोब उपलब्‍ध करून द्यावी. तसेच बांबु कारागीरांना बांबु मोफत देता येईल काय याचा अभ्‍यास करून याचा अहवाल लवकरात लवकर मला द्यावा, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

*थकित विज बिलापोटी पथदिव्यांचे विज कनेक्शन कापू नये*

महावितरण कंपनी गेल्‍या काही दिवसांपासून विधानसभा क्षेत्रातील तसेच जिल्‍हयातील ग्राम पंचायतींच्‍या पथदिव्‍यांचे कनेक्‍शन बिल न भरल्‍यामुळे खंडीत करीत आहे. याआधी २०२१ पर्यंतचे बिल ग्रामविकास विभाग भरत आलेला आहे. यापुढेही ग्रामविकास विभागाने हे बिल भरावे व तोपर्यंत खंडीत असणारा विज पुरवठा त्‍वरीत सुरू करावा असे स्‍पष्‍ट निवेदन आ. मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ तथा ग्रामविकास व महावितरण कंपनीच्‍या सचिवांबरोबर बैठक घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

*महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे सीएसआर निधीचे थकित पैसे त्वरीत द्यावे*

महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे सीएसआर निधीचे पैसे गेल्‍या तीन वर्षांपासून दिला गेला नाही. त्‍यामुळे विकासाची अनेक कामे खोळंबलेली आहे. ज्‍यामध्‍ये आरो मशीनची देखभाल व दुरूस्‍ती या व अशा अनेक कामांचा खोळंबा झालेला आहे. जी गावे प्रकल्‍पग्रस्‍त आहेत तेथील युवकांना प्राधान्‍याने आपल्‍याकडील कंपन्‍यांमध्‍ये सामावून घ्‍यावे असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

*कळमना व मानोरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे उदघाटन ४ जुलै रोजी करावे*

कळमना व मानोरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे उदघाटन ४ जुलै रोजी करावे, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना दिले. पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयासाठी १५ काल्‍पनीक पदांची मंजूरी अजून शासनाकडून न आल्‍यामुळे त्‍यांचे उदघाटन लांबणीवर पडत आहे. यासाठी शासनस्‍तरावर पाठपुरावा करून याची लवकरात लवकर मंजूरी मिळवावी असे निर्देश जिल्‍हा शल्‍च चिकीत्‍सक यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले.

बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी उपमहापौर राहूल पावडे, महावितरणचे मुख्‍य अभियंता देशपांडे, अधिक्षक अभियंता सौ. चिवंडे, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महा‍व्‍यवस्‍थापक साबीर, महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता पंकज सपाटे, वनविभागाचे गुरूप्रसाद, प्रशांत खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्‍करवार, जिल्‍हा परिषदेच्‍या अतिरिक्‍त मुख्‍याधिकारी श्रीमती गौरकार, उपमुख्‍य अधिकारी कपील कलोडे, मजिप्राचे अधिकारी, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक निवृत्‍ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी गहलोत, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता नितनवरे, भाजपा जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, रामपाल सिंह, चंद्रपूर तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, अल्‍का आत्राम, माजी जि.प. सदस्‍य गौतम निमगडे, पोंभुर्णा नगर पंचायत अध्‍यक्षा सौ. सुलभा पिपरे, उपाध्‍यक्ष अजित मंगळगिरीवार, नामदेव आसुटकर, विलास टेंभुर्णे, सुभाष गौरकार, राकेश गौरकार, अनिल डोंगरे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *