” विधवा प्रथा निर्मूलनासाठी व्यापक जनप्रबोधनाची गरज ” .* *सुनिल दबडे ( जेष्ठ साहित्यिक ) गोमेवाडी ता. आटपाडी .

लोकदर्शन 👉 राहुल खरात

 

*__________________________*
महाराष्ट्र हे देशामध्ये पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात होऊन गेले हे सांगताना सर्वांची छाती अभिमानाने फुलून येते . महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले , राजर्षी शाहू महाराज , परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर , धोंडो केशव कर्वे , र . धों.कर्वे , पंडिता रमाबाई या सर्वांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य वेचले . साधु संतांनी माणुसकीचा विचार दिला . महिलांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून सर्वच थोर पुरुषांनी आपला देह झिजविला .
तरी अजूनही समाजामध्ये खुळचट रूढी परंपरा पाळल्या जात असल्यामुळे माता भगिनींना मरणयातना भोगाव्या लागत आहेत .
त्यातीलच एक परंपरा / प्रथा म्हणजे विधवा प्रथा . विधवा प्रथा ही शहरांपेक्षा ग्रामीण भागांत खुप मोठ्या प्रमाणात पाळली जाते . पती निधनानंतर पत्नीचे कपाळावरचे कुंकू पुसले जाते , हातातल्या बांगडया फोडल्या जातात , गळ्यातले मंगळसूत्र काढले जाते , पायातली जोडवी काढली जातात . आयुष्यभर भुंडं कपाळ घेऊन अवघडल्या सारखं तिला जगावं लागतं . तिला पांढऱ्या कपाळाची म्हणून हिणवलं जातं . सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांपासून कोसभर दूर तिला ठेवलं जातं . चांगलंचुंगलं खाणंपिणं , लेणं नेसणं , घडाघडा बोलणं , समाजात बिनधास्त वावरणं हे तिनं करायचं नसतं असा सगळा अलिखित नियम तिच्या बाबतीत प्रथा परंपरेने घालून दिल्यामुळे तिला उरल्यासुरल्या आयुष्यात मन मारून जगावं लागतं .
पांढऱ्या कपाळाची म्हणून सतत हिनवलं जातं , हिचं तोंड बघितल्यावर काम होत नाही . बऱ्याच वेळेला अवदसा कुठली असं तिला घरच्या कडून टोमणे खावे लागतात . ग्रामीण भागांत सतत तिला बघून नाक मुरडले जाते सतत पाण्यात बघितले जाते . माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच काढून घेतला जातो . वखवखलेल्या नजरा तिच्या भोवती गिधाडा सारख्या घिरट्या घालत असतात . पूर्वीच्याकाळी पतीचे निधन झाल्यावर त्याच्या चितेवरच पत्नीला आपलं जिवन संपवावं लागत होत . ही सतीची चाल नंतर बंद झाली . पण विधवा प्रथा मात्र सुरुच राहिली .
एकिकडे विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे माणसाचं आयुष्य सुसह्य झाल्याचं विचारवंत दावा करताहेत . माणूस चंद्रावर पोहोचला आहे . मंगळावरील फेऱ्या सुरुच आहेत . तर दुसरीकडे अंधश्रध्दांचा प्रभाव, रुढीपरंपरांचा / प्रथांचा दबाव यामुळे तयार झालेला माणसांचा स्वभाव माणसालाच घातक ठरत आहे .
विधवा प्रथा ही विधवा महिलांना घातक ठरणारी अमानवी प्रथा आहे . या प्रथेमुळे विधवा महिलांना होणारा अमानुष त्रास कमी व्हावा म्हणून सध्याही अनेकजण प्रयत्न करीत आहेत . लोककलावंत, शाहीर , कवी , साहित्यिक , व्याख्याते , प्रवचणकार , किर्तनकार, पत्रकार यांच्यासहीत समाज प्रबोधन करणारे अनेकजण महिलांच्या बाबतीत असणाऱ्या खुळचट प्रथांविरुध्द आपापल्या परीने चांगलं काम करीत आहेत .
विधवा माता भगिनींच्या दबलेल्या हुंदक्यांना वाट मोकळी करून देणारा दिवस अखेर उगवला . पुरोगामी महाराष्ट्राचं मराठी पाऊल पडते पुढे असा अनुभव सगळ्यांनी घेतला .
त्याचे असे झाले . राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृत्ती शताब्दीचे औचित्य साधले गेले . कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव केला . हेरवाड ग्रामपंचायतीच्या या सुधारणावादी कामाची दखल राज्य सरकारने घेतली . हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घेऊन विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव करावा असे परिपत्रक राज्य सरकारने १७ मे रोजी काढले . हेरवाड पाठोपाठ माणगाव , ढोरखेड, बलगवडे, लेंगरे , चिंचणी , इनामधामणी , तांबवे, जकातवाडी अशा अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा निर्मूलनाचे ठराव केले . सुधारणावादी वारं राज्यात घुमू लागलं . राज्यात दररोज कुठे ना कुठे असे ठराव होत असल्याचे दिसून येत आहे .
काही ग्रामपंचायतींनी तर आणखी एक सुधारणावादी पाऊलपुढे टाकले आहे . विधवा पुर्नविवाहाचे ठराव केले जात आहेत . विधवांच्या पुर्नव सणाबाबत चर्चा होऊन अंमल बजावणीच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत . गावच्या गाव एकत्र येऊन विधवा प्रथा निर्मूलनाची शपथ घेत आहेत .
हळूहळू विधवा प्रथा निर्मूलनाचा कायदाही तयार होईल . शासनाच्या परिपत्रकाची / कायदयाची कठोर अंमलबजावणी होणं आवश्यक आहेच . कायद्याचा धाक पाहिजेच. बालविवाहाचा कायदा झाला परंतु अनेक महाभाग हा कायदा धाब्यावर बसविताना दिसून येतात . कठोर अंमल बजावणी गरजेची आहे .
विधवा प्रथा निर्मूलनासाठी जनप्रबोधन गरजेचे आहे. आटपाडी येथील लताताई बोराडे ह्या गेली ३० वर्षे विधवा प्रथा निर्मूलनाचे काम करीत आहेत . वयाच्या १९ व्या वर्षी आणि लग्नाच्या २५ व्या दिवशी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला . त्यानी स्वतः सौभाग्य अलंकार पुन्हा परिधान केले आणि समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला . करमाळ्याचे प्रमोद झिंजाडे हे देखील गेल्या काही वर्षांपासून विधवा प्रथा निर्मूलनाचे चांगले काम करीत आहेत . महाराष्ट्रात महिलांना समानतेची सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून गेली कित्येक वर्षे अंनिस ही संघटना महिलांबाबतीतल्या खुळचट प्रथांविरुद्ध लढा देत आहे .
विधवा प्रथा निर्मूलनासाठी लोक सहभाग खुप महत्वाचा आहे . लोकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे . लोकांची परंपरागत बुरसटलेली मानसिकता बदलण्यासाठी प्रबाधन गरजेचं आहे . गावात , वाडीवस्तीवर विधवा प्रथेबाबत प्रबोधन करता येईल . शासकीय परिपत्रकाप्रमाणे ग्रामपंचायतींचा वाटा यामध्ये खुप महत्वाचा आहे . प्रबोधन करताना लोक कलावंत , कवी लेखक , व्याख्याते , सामाजिक कार्यकर्ते , सामाजिक संघटना तसेच मोठ्या प्रमाणात महिलांचीही मदत घेता येईल . विधवा महिलांचा पुर्नविवाह आणि पुर्नवसन शासनाकडून केले गेल्यास खऱ्या अर्थाने या प्रथेचे निर्मूलन होणार आहे . विधवा महिलांना मानसिक आधार देवून त्यांच्या पाठीमागे सर्वांनीच खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे . हे करत असताना बुरसटलेल्या विचार सरणीच्या काही जणांकडून महिलांची कुचेष्टा होऊ शकते , त्यांना टोमणे मारले जाऊ शकतात . त्याचा परिणाम महिलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो . हे होऊ नये म्हणून प्रभावी जनप्रबोधन गरजेचंच आहे . .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *